Tuesday, 24 July 2018

फोन

आजकाल माझी कानपूर लाईन जरा विक झालेली आहे. त्यातूनही जर कुणी फोनवर बोलत असेल तर अजून जरा जास्तच. त्यामुळे आजकाल मला माहित नसलेल्या नंबरवरून फोन आला की उगाचच घाबरायला होतं. सगळ्यात पहिली भीती म्हणजे कुणी थकलेले बिल तर मागत नाही ना? ही. अर्थात मी त्या बाबतीत जरा निर्ढावलो आहे. असा फोन आला कि मी सरळ सांगून टाकतो.

“हे पहा... माझ्या स्वतःच्या मालकीची फक्त एक गोष्ट आहे. माझा फोन. पाच वर्षांपूर्वी घेतला तेंव्हा त्याची किंमत अडीच हजार रुपये होती. पाहिजे तर जो पर्यंत मी बिल भरत नाही, तोपर्यंत तुम्ही तो घेऊन जा. बिल भरल्यावर मला परत करा... म्हणजे पैशांचा तकादा लावणाऱ्या लोकांच्या तावडीतून मीही सुटेल आणि माझी वस्तू जप्त करून योग्य कारवाई केली म्हणून तुम्हीही सुटालं... काय?”

माझे हे उत्तर ऐकून खूप जणांनी आता मला फोन करणे सोडले आहे. त्यामुळे ती भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. आता दुसरी भीती म्हणजे समोरची व्यक्ती माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलू लागली तर? अर्थात यासाठी ही मी एक नवीन उपाय शोधला आहे. फोनवर मी “हेल्लो” न म्हणता “रामराम” म्हणतो. अपोआपच समोरची व्यक्ती मराठी किंवा हिंदीत स्वतःच बोलू लागते... हेहेहे... आता उरलेली तिसरी भीती म्हणजे समोरच्या व्यक्तीने बोललेले मला नीट ऐकू आले नाही तर? किंवा नीट समजले नाही तर? या भीतीवर मात्र अजून मला उपाय सापडलेला नाही.

काल असेच झाले. कॉम्प्युटरवर काम चालू होते. ( हो... कधी कधी फेसबुकमधून वेळ मिळाला तर काम देखील करतो मी. ) कामात अगदी तल्लीन झालो होतो आणि इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलवर नजर टाकली. अनोळखी नंबर होता. मनात जरा धडकी भरली. फोन उचलावा कि उचलू नये याचा विचार केला, पण मोबाईलची रिंग काही केल्या बंद होईना. शेवटी धारिष्ट्य केले आणि फोन रिसीव्ह केला. पलीकडून आवाज आला.

“हेल्लो... मिलिंद सर?” कुणीतरी अगदी बारीक आवाजात बोलत होती. म्हणजे ते इतर कुणाला समजू नये म्हणून कुजबुजतात ना... तस्सेच.

“हो... बोलतोय...”

“ते आपलं केलं का?” पलीकडून प्रश्न विचारला गेला. आता या प्रश्नाचा जर संदर्भ माहिती नसेल तर काय काय अर्थ निघू शकतात? त्यातून आवाज असा अगदी बारीक... कुजबुजल्या सारखा. मी गोंधळलो.

“आपलं काही आहे? मग मला कसं नाही माहित?” साला एका पोरीने मला अगदी हळू आवाजात, कुजबुजल्या सारखा, अनोळखी नंबर वरून असा प्रश्न विचारला तर माझा काय समज होणार?

“हो तर... आहेच मुळी... मी आपल्या नेहमीच्या कामाबद्दल विचारते आहे.” तिने तितक्याच हळू आवाजात सांगितले. आता मात्र मी चक्रावलो. खरंच काही वेळेस माणसे असे संदिग्ध का बोलत असावेत?

“नेहमीचे काम? आणि आपण दोघे मिळून करतो?” मी आश्चर्यचकित झालो.

“अहो... हो... आपणाला दोघांना मिळूनच करावे लागते... कुणा एकट्याला शक्य नाहीये...” संभ्रम वाढतच होता.

“काय बोलताय तुम्ही? समजतंय का तुम्हाला?” मी वैतागलो.

“खरे तेच बोलतेय मी... पण तुम्ही असे का विचारीत आहात?” समोरून अगदी थंड आवाजात मला उलट प्रश्न विचारला गेला. शेवटी मनात म्हटलं नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.

“हेल्लो... तुम्ही कोण बोलताहेत ते सांगता का?” शक्य तितक्या सौम्य आवाजात मी विचारले.

“मी प्रिया बोलतेय... xxx कंपनी मधून... माझा आवाज नाही का ओळखला तुम्ही?” तिने असे सांगितले आणि मग माझी ट्यूब पेटली. माझ्या क्लाईन्टच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या म्याडमचा तो फोन होता. आणि त्या म्हणाल्या तसे आम्हाला दोघांना मिळूनच काम करावे लागत होते. साईटवर काय अपडेट करायचे हे त्या सांगत होत्या आणि मी ते बदल करत होतो.

“ओके ओके म्याडम... मेल पाहतो आणि चेंजेस करतो...” असे म्हटले आणि फोन ठेवला. एरवी अशा लहानसहान गोष्टी मी मनावर घेत नाही पण काल मात्र ठरवले, म्याडमसोबत याबद्दल बोलायचेच.

संध्याकाळची वेळ होती. मी म्याडमच्या ऑफिसला पोहोचलो. मी सहसा काम असल्याशिवाय जात नाही त्यामुळे मला पाहून तिथे काम करणाऱ्या स्मिता म्याडमने मला येण्याचे कारण विचारले.

“बोला सर... काय काम आहे?”

“प्रिया म्याडमला भेटायचे आहे.” मी उत्तर दिले.

“ती बँकेत गेली आहे. येईलच १० मिनिटात... मी काही मदत करू शकते का?” त्यांनी आदबीने विचारले.

“नाही... खाजगी काम आहे त्यांच्याकडेच... मी वाट पहातो.” आता खाजगी काम म्हटल्या बरोबर स्मिता म्याडमची उत्सुकता ताणली गेली.

“काही विशेष?” त्यांनी जरासे बिचकत बिचकत विचारले.

“हो... त्यांना एक गोष्ट विचारायची आहे.” मी उत्तर दिले. तितक्यात प्रिया म्याडम तिथे आल्या. त्यांचा ऑफिस मध्ये प्रवेश होतो न होतो तोच स्मिता म्याडमनी त्यांना ओरडून सांगितले.

“प्रिया... तुला भेटायला सर आलेत. तुझ्याकडे काही खाजगी काम आहे त्यांचे...” हे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील मिश्कील हसू माझ्यापासून लपू शकले नाही. स्मिता म्याडमच्या या वाक्यातील खोचकपणा प्रिया म्याडमच्याही लक्षात आला. त्यांनी डोळ्यांनीच स्मिता म्याडमला दटावले.

“बोला सर...”

“एक प्रश्न विचारायचा होता...” मी मुद्दामच जरा हळू आवाजात विचारले.

“हो... विचारा ना...”

“इथे विचारला तर चालेल? जरा खाजगी आहे.” मी सुद्धा आता असेच बोलत होतो ज्याने संभ्रम निर्माण होईल.

“मी बाजूला जाऊ का?” काहीसे मिश्किलपणे स्मिता म्याडमने प्रिया म्याडमला विचारले.

“ए... गप बसं गं...” तिच्याकडे पाहून प्रिया म्याडमने उत्तर दिले. नंतर त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला.

“हे पहा सर... काय विचारायचे ते इथेच विचारा.” त्यांनी जरा मोठ्या आवाजात मला सांगितले.

“पहा हं... तुम्हाला राग तर नाही ना येणार?” मी.

“ते प्रश्न काय आहे त्यावर अवलंबून आहे.” त्यांनी उत्तर दिले.

“ठीक आहे तर. नंतर मला दोष देऊ नका.”

“आता विचारताय की मी सरांना फोन करून सांगू?” त्यांनी मला सरळ सरळ दमच दिला. त्यांचा चेहराही जरासा तापल्यासारखा वाटत होता. आता जास्त ताणने योग्य नव्हते.

“तुम्ही फोनवर इतक्या हळू आवाजात आणि कुजबुजल्या सारखे का बोलतात?” मी माझा प्रश्न विचारला. आधीच त्या बाहेरून वैतागून आल्या होत्या आणि त्यात मी त्यांना असा पांचट प्रश्न विचारला. त्यांचा पारा चढला.

“मी कशीही बोलेन... तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” त्यांनी चिडून विचारले.

“अहो प्रॉब्लेम काय म्हणून काय विचारता? एकतर तुमचा आवाज इतका बारीक आणि नाजूक. माझ्या सारख्याला फोनवर व्यवस्थितपणे तो ऐकू येत नाही. बरे समजा ऐकू आला तरी जर तो ओळखू आला नाही तर तुमच्या बोलण्याचा मला संदर्भच लागत नाही.” मी आता खरे ते सांगितले.

“आज सकाळी देखील तुमचा फोन आला. अनोळखी नंबर वरून आणि तुम्ही म्हणालात काय कि, ‘ते आपलं केलं का?’ आता मला जर तुमचा आवाजच ओळखू आला नाही तर संदर्भ कसा लागणार? आणि संदर्भ लागला नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं?” मी मनातले बोलून टाकले. माझ्या या प्रश्नांवर स्मिता म्याडम मात्र मनसोक्त हसत होत्या. प्रिया म्याडमलाही त्यांचे काय चुकले हे समजून आले.

“तुम्ही माझा आवाज खरंच नाही ओळखला?” प्रिया म्याडमने हसत हसत विचारले.

“अहो... इतक्या हळू आवाजात अमिताभ बच्चन जरी बोलला तरी आपल्याला फोनवर ओळखू येणार नाही...” मी.

“म्हणजे फक्त हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आले होते?” स्मिता म्याडमने मला विचारले.

“हो... बाकी काही नाही... फक्त एवढ्या साठीच...” मी उत्तर दिले.

“अहो सर... मग मला स्पष्ट सांगायचं ना...” प्रिया म्याडम हसत हसत म्हणाल्या.

“अरे वा... असं कसं? तुम्ही हळू बोलतात ते चालतं, तुमचं बोलणं संदर्भ लागला नाही तर समजत नाही हेही चालतं. पण मी मात्र स्पष्ट बोलायचं... वा रे वा... भले बहाद्दर...” मी डायरेक्ट बोलून टाकले आणि मग त्यांच्याकडूनच फुकटचा चहा पिऊन घरी आलो.

आज सकाळी सकाळीच फोन वाजला. मी अर्धवट झोपेत होतो. परत अनोळखी नंबर... फोन उचलला. पलीकडून कुणी मुलगी बोलत होती. आवाज मात्र खूप गोड वाटला फोनवर.

“सर... आज येवू का?”

आयला... आता हे काय नवीन लफडं? पण इतक्या गोड आवाजाला नाही तरी कसे म्हणणार? ‘ये’ म्हणून सांगितलं... पण ती कोण आणि का येणार हे मात्र ती आल्यावरचं समजेल.

4 comments:

  1. खुप धमाल आली
    मस्तच 😂

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर...

      Delete
  2. 😆
    ब्लाॅग साठी शुभेच्छा !

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद...

      Delete