आजकाल सगळ्यांना multi-tasking ची सवय लागली आहे. म्हणजे मुलं एकीकडे अभ्यास चालू आणि दुसरीकडे
टीव्ही किंवा रेडीओ चालू असा अभ्यास करतात. सरकारी ऑफिसर... एकीकडे पत्ते चालू दुसरीकडे काम(?) चालू.., मिटींगमध्ये... एकीकडे मिटींग चालू... दुसरीकडे मोबाईलवर फेसबुक चालू...
अर्थात ही
सवय मलाही लागली आहे. मी कोणतेही काम करताना आधी गाणे लावतो आणि
मग कामाला बसतो... काम जास्त तन्मयतेनं होतं असा आजपर्यंतचा माझा
अनुभव आहे.
आज कथा लिहायला
बसलो. आधी गाणे चालू केले आणि मग लेखन. आज काहीतरी
वेगळं लिहायचं. आता वेगळं काय लिहायचं हा प्रश्न होताचं म्हणा... ठरलं... आज एखादी भयकथा लिहायची. ज्यात भूत, पिशाच्च, हडळ, खवीस हे सगळेच
असतील. कागद पुढे ओढले आणि केली सुरुवात.
रात्रीचे
३ वाजलेले. गावातील चर्च तसे गावाच्या एका बाजूला. पण
रात्रीच्या निरव शांततेत चर्चच्या घड्याळातील तीन ठोके विरुद्ध बाजूच्या स्मशानातही
अगदी स्पष्ट ऐकू आले. आज गावात तीन मौती झाल्या होत्या. त्यातील एक
जण वय होऊन मेला होता, एकाने आत्महत्या केली होती आणि एक बाळंतपणात
गेली होती. काही तासांपूर्वीच याचं ठिकाणी तिघांचेही अंत्यसंस्कार
करण्यात आले होते. चिता पूर्णपणे विझलीही नव्हती आणि स्मशानाचे
दार करकरत उघडले गेले. एका काळ्या कपड्यातील कापालिकाने स्मशानात
प्रवेश केला. आज त्याला त्याचे ईप्सित साध्य करण्यासाठी
स्मशान जागवायचे होते. तीनपैकी बाळंतीणीच्या चितेसमोर कापालिक फतकल
मारली. बाजूला ठेवलेल्या आपल्या झोळीतून त्यानं लिंबू, गुलाल, नारळ, फुलं, बुक्का, रक्ताची बाटली
आणि कालीकेचा फोटो या गोष्टी बाहेर काढल्या. जवळच पडलेल्या
एका छोट्या दगडाला टेकून त्याने कालीकेचा फोटो उभा केला आणि त्याच्यासमोर बाटलीतील
रक्ताचा सडा शिंपडून इतर वस्तू मांडायला सुरुवात केली. सगळी तयारी
पूर्ण झाल्यावर झोळीतील उदी बाहेर काढून त्याने स्वतःभोवती रिंगण आखले. आता त्याला
त्या सर्व गोष्टी दिसत होत्या, ज्या एरवी माणसाला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
जवळच एका
झाडावर एक हडळ उलटी लटकून भेसूर आवाजात रडत होती. कापालिकाला
हे सगळे दिसत होते पण त्याचे त्याकडे बिलकुल लक्ष नव्हते. ती हडळ त्याचे जराही वाईट
करू शकणार नाही हे तो चांगलेच जाणून होता. त्याने एकवार कालीकेच्या नावाचा जयघोष
केला आणि हातातील गुलाल समोरच्या चितेवर उधळला. प्रचंड मोठा
आवाज होत त्यातून एक आकृती हळूहळू प्रकट होऊ लागली. त्याबरोबर
कोल्ह्याकुत्र्यांच्या विव्हळण्याचे आवाजही ऐकू येवू लागले. हे दृश्य
जर एखादया सामान्य माणसाने पाहिले असते, तर तिथल्या तिथे तो भीतीने गार पडला असता.
पण कापालिकावर त्याचा जराही परिणाम होत नव्हता. आता आकृतीने
हळूहळू स्त्री देह धारण केला होता. या तुच्छ कापालिकाने आपल्याला असे जागवावे
हे त्या आकृतीला बिलकुलच पसंत पडले नसावे. चेहऱ्यावर
अवेळी जगाविल्याचे भेसूर भाव आणि लाल डोळे ताणून त्या देहाने चिरक्या आवाजात सुरुवात
केली...
“आजा सनम मधुर
चांदनी मे हम, तुम मिले तो विराने मे भी आ जायेगी बहार.. लगता नही
है दिल यहां...”
आयला... हे काय झालं? साला मी तर हॉरर स्टोरी लिहितो आहे ना??? च्यायला... म्हणून घरातले मोठे लोकं म्हणतात की “एका वेळेस
फक्त एकच काम करावं....” हाड... सगळं डोसक्यातून
निघून गेलं...
No comments:
Post a Comment