Friday, 20 July 2018

फुटबॉल

माझा आवडता मैदानी खेळ आहे क्रिकेट. हे आतापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. इतके बोललो आहे मी त्याबद्दल. पण २० वर्षांपूर्वी मी फुटबॉल देखील खेळलो आहे, हे मात्र अजून कुणालाच माहिती नाही. ज्यांना माहिती आहे ते आता माझ्या संपर्कात नाहीत. पण मला क्रिकेटच का आवडते हे तरी माहिती आहे का कुणाला? नाही ना? सांगतो की मग... आपल्याला काय प्रॉब्लेम नाही खरे बोलण्यात. तसेही सध्या माझे सत्याचे प्रयोग चालू आहेत...
मी जेव्हा मैदानावर असतो त्यावेळेस माझ्या टीमचे प्लेअर माझ्याशी खूप चांगले वागतात. मला नेहमी अशा ठिकाणी उभे करतात जिथे तीन तास खेळात असूनही, तीन चेंडूही येत नाहीत. बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी सावलीच असते. गोलंदाजी तर मला देतच नाहीत. कारण ? अहो ऊन असते ना तिथे. मला त्या उन्हाचा त्रास झाला तर? फलंदाजीचा तर विचारच नको. कारण आमचे खेळाडू लवकर आउटच होत नाहीत. चुकून कुणी आउट झालेच आणि मला फलंदाजीची संधी मिळालीच तर माझ्यामुळे ते धावचीत होतात... म्हणजे सामना संपवून मी परत सावलीतच. आता क्रिकेट संघाचा हिस्सा असूनही जर आपल्याला काही कष्ट पडत नसतील, तर तो खेळ का नाही आवडणार? पण आज मला क्रिकेट बद्दल बोलायचेच नाहीये मुळी. फुटबॉल बद्दल सांगणार आहे मी.
अजूनही आठवतो तो दिवस. वर्ष १९९४ची ही गोष्ट. त्यावेळेस माझे ग्रॅज्युएशनचे दुसरे वर्ष चालू होते. आमच्या वर्गात एक नवीनच मुलगा आला होता. ज्यो डिसुजा नांव त्याचं. खूप छान स्वभावाचा होता तो. त्याचा आवडता खेळ म्हणजे फुटबॉल. कॉलेज सुटले की तो लगेच फुटबॉल घेऊन ग्राउंडवर असायचा. ( हो... कॉलेज सुटले असेच म्हणायचो आम्ही. कारण आमचे कॉलेज म्हणजे फक्त गणवेश नसलेली शाळाच होती. ) त्या दिवशी ज्यो घाईघाईतच वर्गाबाहेर पडला. तसा तो नेहमीच घाईत असायचा. जाताना त्याचा धक्का मला लागला आणि मी त्याला हटकले.
अबे... इतक्या घाईत कुठे निघालास?”
अरे... जिमखान्यातून फुटबॉल घेऊन ग्राउंडवर जायचे आहे.” त्याने उत्तर दिले आणि मी डोक्यावर हात मारून घेतला.
चल येतोस का फुटबॉल खेळायला?” त्याने विचारले.
हेहेहे... तुला मी गाढव वाटलो की बोकड?” त्याच्या प्रश्नांचे सरळ उत्तर देता मी प्रतिप्रश्न केला.
अरेऽऽऽ, फुटबॉल खेळण्याचा आणि या प्राण्यांचा काय संबंध?” त्याने गोंधळून विचारले.
काय संबंध म्हणजे? शाळेत असताना मला माझ्या मास्तरांनी सांगितले आहे. लाथा मारतात ते गाढव असतात आणि ढुशा मारणारे बोकड. अन तुमच्या त्या खेळात तर प्रत्येक जण एकतर त्या चेंडूला लाथा मारतो नाहीतर ढुशा मारतो. मग तूच सांग... संबंध कसा नाही?”
च्यायला... तुझ्याशी डोकं लावणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे.”
आयला... म्हणजे तू बोकड... कारण तू लाथा मारता डोकं आपटतो आहेस... ह्या ह्या ह्या...”
अरे पापी माणसा... तू नाही सुधारणार कधीच...” तो पुरता वैतागला. माझ्या मित्राची ही एक चांगली गोष्ट होती. तो कुणालाच शिव्या द्यायचा नाही. सहसा चिडणारा; पण कुणी खूपच चेष्टा करायला लागला की त्याचं हे नेहमीचं वाक्य. त्याच्या तोंडून हे वाक्य आलं म्हणजे आपण समजून घ्यायचं, आता हा काहीच बोलणार नाही. संभाषण संपलं याचंच ते द्योतक होतं. त्याप्रमाणे तो पुढे निघाला आणि मग काहीतरी आठवल्यासारखे करून परत फिरला.
मिलिंद... आज खेळायला चलंच तू... आम्ही खेळतो त्याच वेळेस तुझ्या छावीचे कॉलेज सुटते. रस्त्याने जाताना काही वेळेस आमचा खेळ पहातच घरी जाते ती.” त्याने सांगितले.
आयला... खरंच?”
हो... अगदी खरं. पाहिजे तर तू आज ये आणि पहा.” त्याने असे सांगितल्यावर आता त्याच्या शब्दाला मान नको का द्यायला. फक्त त्याने इतक्या आपुलकीने बोलावले म्हणून मी जायचे ठरवले. नाहीतर आपल्याला काय कोणी छावी बिवी नव्हती. शप्पथ... आपण काय तशातला मुलगा आहे का?
त्याच्या बरोबर ग्राउंडवर गेलो. बरोबर अजून एकदोन मित्रांनाह घेतलं. कारण ज्यो खेळणार आणि आपण काय फक्त एकटे उभे राहायचे? त्यांचा खेळ चालू झाला. बरोबर १०/१२ मिनिटांनी सायन्स कॉलेज सुटले. सगळे विद्यार्थी बाहेर पडले. घोळक्या घोळक्याने ग्राउंड शेजारच्या रस्त्यावरून घरी निघाले. तेवढ्यात ज्यो ज्या मुलीबद्दल बोलत होता ती देखील तिच्या मैत्रिणींबरोबर रस्त्याने जाताना दिसली. म्हणजे माझे बिलकुल लक्ष नव्हते. माझ्या बरोबर असलेल्या मित्रांनी मला दाखवले. मी कशाला पाहील ना? जर ती आपली... ( स्वतःसाठी वापरलेले आदरार्थी बहुवचन आहे हे ! उगाच भलता संशय नको. ) छावीच नाही तर? असो... कुणी का असेना ती. आपल्याला काय करायचे? तर ती खरेच समोर चाललेला फुटबॉलचा खेळ मन लावून पहात होती. तिचे लक्ष खेळाकडे... माझे लक्ष तिच्याकडे... म्हणजे... ज्यो म्हणतो ते खरे आहे की नाही हे पाहण्यासाठीच फक्त. अगदी नजरेआड होईस्तोवर ती फुटबॉलचा खेळ पहात होती.
दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्या सुटल्या ज्योला गाठले.
आज मी पण येतो खेळायला.” मी त्याला सांगितले.
तू आणि फुटबॉल? तू गाढव आहेस कि बोकड?” त्याने प्रश्न केला. साला हे मित्रही ना... आधी आमंत्रण देतात आणि आमंत्रणाचा स्वीकार केल्यावर टोमणे मारतात. पण जाऊद्या. फुटबॉलने आपले शरीर तंदुरुस्त राहते असे सकाळीच डॉक्टरांनी सांगितले होते मला... रस्त्यात भेटून. त्यामुळे मी ज्योच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. अर्थात त्यानेही मग तो विषय वाढवला नाही.
फुटबॉल खेळण्याचा तो माझा पहिलाच दिवस. फुटबॉलबद्दल मला अजून एक माहिती आहे. फुटबॉल खेळण्यासाठी बूट घालावे लागतात. मी आदल्या दिवशीच संध्याकाळी बुटांची खरेदी केली. माझ्या आईला तर आश्चर्यच वाटले. एरवी चप्पलच्या ऐवजी स्लीपर घालणाऱ्या मुलाने एकदम बूट खरेदी केले तर आश्चर्य वाटणारच ना. तसा फुटबॉल हा खूपच सोप्पा खेळ. एक अगदी मोठ्ठा हवेचा चेंडू. जमिनीवर ठेवायचा आणि लाथेने उडवायचा. हाय काय नी नाय काय. माझा पहिलाच दिवस असल्यामुळे ज्योने मला फुटबॉलला कशी किक मारायची हे सांगायचा प्रयत्न केला. पण इतकी सोपी गोष्ट काय शिकायची असते? तेवढ्यात सायन्स कॉलेज सुटले. माझे लक्ष परत घोळक्यांकडे. आणि मला ती दिसली. लैच भारी दिसत होती यार. चांगल्याला नेहमी चांगले म्हणायचे असते. आपली संस्कृतीच आहे ती.
ज्यो... गोलकिपर थांब रे...” मी त्याला आदेशच दिला. त्याने एकदा माझ्याकडे पाहिले. एकदा येणाऱ्या घोळक्याकडे पाहिले आणि नीट नेटसमोर जाऊन उभा राहिला. मी एक अंदाज घेत जमिनीवर बॉल ठेवला. आईशप्पथ सांगतो... फुटबॉल एवढा जड असेल असे मला बिलकुल वाटले नव्हते. आदल्या दिवशी ज्यो जशा पद्धतीने फुटबॉल खेळत होता त्याच प्रमाणे मी काही पावले मागे गेलो. आता फक्त दुरून पळत यायचे आणि फुटबॉलला किक मारायची. पण ज्योने गोल आडवला तर? मग ठरवले. इतकी जोरात किक मारायची की त्याला भीतीच वाटली पाहिजे बॉल आडवायची. ठरले तर. असेच करायचे.
एकदा आकाशाकडे पाहिले. ( बरेच जण असेच करतात ) मग रस्त्याकडे पाहिले. ती... माझ्याकडेच पहात होती. अगदी तन्मयतेने. मनात अगदी गुदगुल्या झाल्या. मी स्टार्ट घेतली. पळत आलो आणि एक जोरदार किक बॉलला मारली इतकेच मला आठवते. नंतर काही वेळ तर मला काय घडते आहे हेच समजले नाही. डोळे उघडले त्या वेळेस निळेशार आकाश दिसत होते. मग हळूहळू एकेक करत माझ्या मित्रांचे चेहरे दिसू लागले. हळूहळू आवाजही ऐकू येऊ लागला.
कारे... लागले का खूप?” एका मित्राने विचारले.
च्यायला... लागलेच असेल ना? इथे काय गवत आहे का? अगदी मुरमाची जमीन आहे.” माझ्या ऐवजी दुसऱ्या मित्रानेच उत्तर दिले. तेवढ्यात एकाने हात देऊन मला उठवले. मी सगळ्यात आधी फुटबॉलकडे पाहिले. त्याची जागा मुळीच बदलली नव्हती. मी तो ज्या स्थितीत ठेवला होता त्याच स्थितीत अजूनही होता. समोर पाहिले तर आता फक्त तीच नाही तर तिच्या मैत्रिणीही माझ्याच कडे पाहून हसत होत्या. मनात म्हटले... हसी तो फसी... पण इतक्या मुलींना आपण कसे सांभाळणार? त्यापेक्षा आपण तिकडे पाहणेच चांगले. आता तर कंबर देखील दुखते आहे हे जाणवले. तेवढ्यात ज्यो तिथे आला.
मिलिंद... खूप छान किक मारलीस तू. फक्त तुला दोनच टिप्स द्यायच्या आहेत. पहिली म्हणजे फुटबॉलला किक मारताना फुटबॉलकडे पाहावे लागते, रस्त्याकडे नाही... आणि दुसरी म्हणजे चामड्याचे बूट घालून फुटबॉल कुणी खेळत नाही.”
त्या दिवसांपासून ते बूट मी आजतागायत एकदाही घातलेले नाहीत. अजूनही ते बूट माझ्याकडे आहेत. खूप धुळीने माखले आहेत. त्याबद्दल वडिलांचे किमान १० वेळेस तरी बोलणे ऐकले आहे. घालायचे नव्हते तर बूट का घेतले? या त्यांच्या प्रश्नांचे उत्तर अजून मी एकदाही समाधानकारक देऊ शकलेलो नाही. आता तुम्ही विचाराल मी ते बूट का नाही घातले परत? कसे घालणार? जाणो... परत कधी फुटबॉल खेळायची वेळ आलीच तर?

No comments:

Post a Comment