Friday, 20 July 2018

देवत्व

आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्यात मोठा बहुमान कोणता असेल तर देवत्व बहाल करण्याचा. एखाद्याने चांगले कार्य केले की लगेच त्याला देवत्व बहाल केले जाते. पण जर त्या व्यक्तींच्या बाजूने विचार केला तर मात्र हा त्यांच्यावर सगळ्यात मोठा केला गेलेला अन्याय असतो असे मला वाटते. श्रीराम असो वा शिवाजी महाराज, श्रीकृष्ण असो वा बाबासाहेब आंबेडकर. या सगळ्यांना लोकांनी देवत्व बहाल केले आणि मग त्यांचे विचार बाजूलाच पडले असे दुर्दैवाने दिसून येते.

रामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर चांगला मुलगा कसा असावा, चांगला राजा कसा असावा, अगदी एका वस्त्रांनिशी घराबाहेर पडूनही आपल्या कर्तुत्वाने आणि जिद्दीने माणूस अगदी समुद्रावरही सेतू बांधू शकतो हे त्याने दाखवून दिले. पण त्याला देवत्व बहाल केले गेले आणि मग त्याचा पराक्रम, जिद्द, नितीमत्ता, राजनीती हे सगळेच गुण झाकोळले गेले. बरे जे लोकं देवाला मानत नाहीत ते राम किती चांगला राजा होता यापेक्षा तो किती सामान्य पती होता हेच दाखविण्यात धन्यता मानू लागले.

श्रीकृष्णाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने अनेक लढाया केल्या. त्याला पराजय काय असतो हेच माहिती नव्हते. पण १७ वेळेस लढाईत हरवून ही जेंव्हा जरासंध अठराव्या वेळेस लढाईला सिद्ध झाला, त्यावेळेस श्रीकृष्णाने आपल्या प्रजेचा विचार करून मथुरा सोडली आणि द्वारका नगरी वसवून आपल्या प्रजेला सततच्या युद्धांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आणि यासाठी त्याला नावं काय मिळाले तर ‘रणछोड’. महाभारताच्या युद्धाच्या वेळीही त्याने समेट घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण युद्धानंतर गांधारीने त्यालाच शाप दिला... का? कारण तो देव होता, त्याला हे युद्ध टाळणे शक्य होते असा तिचा दृढ समज होता. राजनीती, प्रजापालन, कर्म सिद्धांत, पराक्रम या सगळ्यात खरे तर तो अगदी निष्णात होता पण तरीही लोकांनी त्याचे गुण अंगिकारण्यापेक्षा त्याची पूजा करण्यातच स्वतःला धन्य मानले. इतकेच काय तर कित्येक जण त्याला ‘कर्मयोगी’ मानण्यापेक्षा ‘भोगी’ मानण्यातच आपण किती हुशार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात.

हीच गोष्ट अगदी अलिकडील काळातील शिवाजी महाराज यांच्या बाबतीतही आपल्याला दिसून येते. शिवाजी महाराजांनी कधीही उच्च नीच असा भेद पाळला नाही. कोणत्याही धर्माचा त्यांनी दुस्वासही केला नाही आणि कोणत्या एका जातीला खूप महत्वही दिले नाही. त्यांनी युद्ध केले ते रयतेला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून. त्यामुळेच त्यांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माची माणसे होती. तसेच त्यांनी लढताना समोरच्या व्यक्तीकडे पाहिले, त्याच्या जातीकडे किंवा धर्माकडे नाही. त्यांच्यातील पराक्रम, युद्धनीती, नितीमत्ता, निर्णयक्षमता असे कितीतरी गुण अभ्यासण्याजोगे आहेत. पण त्यांच्याही बाबतीत दुर्दैवाने हीच गोष्ट झाली. त्यांनाही देवत्व बहाल करण्यात आले आणि त्यांच्या नावाचा वापर फक्त एकमेकांवर कुरघुडी करण्यासाठी होऊ लागला.

स्वातंत्रोत्तर भारताचा विचार केला तर सगळ्यात पुढे जे नाव येते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या व्यक्तीने सर्व समाज एकत्र कसा येईल आणि समाजाची निकोप वाढ कशी होईल यासाठी आपले जीवन वेचले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाजातील उच्चनीच भेद, जातीव्यवस्था संपुष्टात आणणे आणि देशाच्या विकासासाठी सर्व समावेशकता असणे गरजेचे आहे हा विचार मांडणे हे त्यांच्यातील दूरदृष्टीपणाचे द्योतक आहे. सर्वांगीण प्रगतीवर कोणत्याही एका समाजाची मक्तेदारी नाही हे समजण्यासाठी लोकांना शिक्षण असणे जितके गरजेचे आहे, तितकेच जातींमधील अन्याय्य उतरंड कायमची संपुष्टात आणणेही गरजेचे आहे हे त्यांनी सगळ्याना सांगण्याचा प्रयत्न केला. पण आज होते काय आहे? त्यांचा विचार हा फक्त विचारच उरला आहे. काही जण त्यांचे पुतळे उभारण्यातच धन्यता मानतात आणि काही जण त्यांच्या नावाने राजकारण करण्यात स्वतःला धन्य समजतात.

माझ्या मते याच काय पण अशा इतरही सगळ्या महापुरुषांची पूजा करण्यापेक्षा त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आचरण करणे देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी जास्त गरजेचे आहे. लोकांनी तसेच राज्यकर्त्यांनी राममंदिर उभारण्यापेक्षा रामातील प्रजादक्ष गुण अंगिकारून प्रजेला न्याय, समता, सुरक्षा देणे जास्त गरजेचे आहे. कृष्णाने सांगितलेला कर्मयोग सिद्धांत अंगिकारून त्यानुसार आचरण करणे जास्त योग्य आहे. शिवाजी महाराजांमधील ‘प्रथम समाजाचे कल्याण’ हा गुण अंगिकारून त्यानुसार आपले वर्तन ठेवावे. आणि बाबासाहेबांमधील ‘जातीव्यवस्था निर्मुलन आणि त्यायोगे सामाजिक विकास’ ह्या गुणाचा अंगिकार करावा असे मला वाटते. ज्या दिवशी या गोष्टी अस्तित्वात येतील त्या दिवशी आपला देश खऱ्या अर्थाने पुढारला आहे असे म्हणता येऊ शकेल.

No comments:

Post a Comment