Saturday, 21 July 2018

पती परमेश्वर

सध्याच्या काळातील माझ्या आईचे आवडते चित्रपट म्हणजे ‘हम आपके है कौन’ आणि ‘कभी ख़ुशी कभी गम’. हम आपके चित्रपटाबद्दल मी समजू शकतो पण मला नेहमी प्रश्न पडायचा, अशी कोणती गोष्ट असेल ज्यामुळे ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपट तिला आवडला असावा? 

“आई... तुला ‘कभी ख़ुशी कभी गम’ हा चित्रपट इतका का आवडतो?” शेवटी एक दिवस मी तिला विचारलेच.

“अरे चांगला आहे की चित्रपट...” तिने मोघम उत्तर दिले. 

“नाही... काहीतरी खास गोष्ट नक्कीच असणार.” मी मुद्द्याला चिकटूनच राहिलो.

“खरं सांगायचं तर मला त्या चित्रपटातील जया भादुरीचे व्यक्तिमत्व आवडते.”

“का? काय खास आहे त्यात?”

“खास म्हणजे... ती अमिताभला चक्क सांगते... ‘पती कितनी गलती करता है, परमेश्वर तो गलती नही करता, फिर पती परमेश्वर कैसे हुवा?’ आणि अमिताभकडे तिच्या या प्रश्नाला उत्तर नसते.” तिने सांगितले आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

“काय रे? का हसलास?” तिने विचारले.

“का म्हणजे काय? तू इतकी धार्मिक पुस्तके वाचतेस आणि तरी म्हणतेस की पती परमेश्वर नसतो म्हणून?” 

“हो... नसतोच मुळी. इतकेच काय पण जे लोक स्त्री कडून अशी अपेक्षा करतात ते फक्त पुरुषप्रधान संस्कृतीचा टेंभा मिरवण्याचा प्रयत्न करतात.” तिने ठासून सांगितले.

“आयला... असं कसं?” मी बुचकळ्यात पडलो.

“असंच आहे. थांब तुला याबद्दलचाच एक किस्सा सांगते.” तिने म्हटले आणि मी कान देऊन ऐकू लागलो. कारण तिची कोणत्याही गोष्टी सांगण्याची कला अगदी अफलातून होती. 

“तुला बाबाजी तर माहितीच आहेत. त्यांच्या एक सेवेकरी होत्या. सीताबाई नावाच्या.”

“हो... तुझ्या बोलण्यात अनेकदा त्यांचा उल्लेख आला आहे.” मी म्हटले आणि आईने किस्सा सांगायला सुरुवात केली.

“हा किस्सा आहे सीताबाईच्या सुनेचा... विमल वहिनींचा. सीताबाई जरी बाबाजींची सेवा करीत असल्या तरी त्या स्वभावाने खूप तामसी होत्या. त्यांचा मुलगा तर कहरच. बाई, बाटली आणि जुगार ही तिन्ही व्यसने त्याला होती. त्याची बायको मात्र खूप साधी, सोज्वळ आणि शांत. दर चार सहा दिवसांनी तो दारू पिवून यायचा आणि विमल वहिनींना मारझोड करायचा. तसे सीताबाईनी त्याला बऱ्याचदा समजावले होते. दोन चार वेळेस बाबाजींनी त्याला धाकही दाखवला पण त्याच्यात काहीही फरक पडला नाही. त्यामुळे विमल वहिनी मात्र खूपच दुःखी असायच्या. एक दिवस मी शाळेतून घरी येत असताना रस्त्यातच त्या भेटल्या. खूप आनंदात होत्या. पहिल्यांदाच मी त्यांना मनमोकळेपणाने हसताना पाहिले.”

---------------

“बेबी... चल पिक्चरला जाऊ आपण.” वहिनींनी म्हटले.

“पिक्चरला? पण माझ्याकडे तर पैसे नाहीयेत.” मी सांगितले.

“अगं... बाबांनी दिले आहेत दोघींचेही पैसे... त्यांनीच सांगितले तुला बरोबर घेऊन जायला.”

“ठीक आहे. पण तुम्हाला माझ्या बरोबर घरी यावे लागेल. आईची परवानगी काढण्यासाठी. कारण मी पिक्चरचे नाव काढले तरी ती भडकेल. तुम्ही विचारले तर मात्र नक्कीच परवानगी देईल.”

“चल तर मग...” विमल वहिनी आणि मी घरी गेलो. आता बाबांनीच पैसे दिले म्हटल्यावर आईने परवानगी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. त्या दिवशी आम्ही पिक्चर पाहिला. हॉटेलात गेलो. मनसोक्त हिंडलो. विमल वहिनी खूप बोलक्या स्वभावाच्या आहेत हे त्या दिवशी मला समजले.

“वहिनी एक विचारू?” 

“हो... विचार की...”

“आज तुम्ही इतक्या आनंदांत कशा?”

“कारण आज मी मोकळी होणार आहे. सगळ्या बंधनातून. आणि यापुढे मी माझ्यासाठी जगणार आहे.” त्यांनी सांगितले.

“म्हणजे?” मी बुचकळ्यात पडले.

“म्हणजे आज संध्याकाळीच मी माहेरी जाणार आहे. कायमची. परत कधीही मी इथे येणार नाही.” त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि मी अवाक् झाले. इतकी शांत आणि साधीभोळी बाई या निर्णयाप्रत जाते हेच माझ्यासाठी खूप आश्चर्याचे होते. 

“वहिनी... हा निर्णय तुम्ही घेतला?” मी विचारले.

“खरे तर हा माझा नाही बाबाजींचा निर्णय म्हणता येईल. त्यांनीच मला सांगितले. तू इथून निघून जा आणि आता यापुढे स्वतःसाठी जग.” वहिनींनी सांगितले आणि मला जास्तच आश्चर्याचा धक्का बसला.

“बाबांनी?”

“हो... काल माझ्या नवऱ्याने पुन्हा एकदा मला मारले आणि मी आज सकाळी बाबांकडे गेले. वाटले त्यांना सगळे सांगावे आणि किमान मन मोकळे करावे. मी त्यांच्यासमोर गेले मात्र आणि त्यांनी म्हटले... ‘और कितना सहेगी तू? वो कभी नही सुधरेगा.’ त्यांनी म्हटले.”

“लेकीन वो मेरा पती है, शायद यही मेरे भाग्य मे लिखा है.” मी बाबांना म्हणाले.

“तेरे नसीब मे सिर्फ उससे शादी करना लिखा था. क्योकी वो तेरे मांबापने कराई थी. उस वक्त तुम्हारे हाथमे कुछ नही था. लेकीन अब ऐसा नही है. जब वो इतनी तकलीफ देता है, फिर भी तू सिर्फ सहती है, इसे नसीब नही कमजोरी कहते है... अब उसे छोड दे और अपने बारे मे सोचना चालू कर. निकल जा इस नरक से. मेरा आशिर्वाद हमेशा तेरे साथ रहेगा.” हे त्यांचे शब्द होते.

“त्यांनीच मला घरी जाण्यासाठीही पैसे दिले आहेत. आणि त्यामुळेच मी आता जी जाणार ती परत कधीही न येण्यासाठीच. तिथे माझे आईवडील आहेतच. पण त्यांच्यावर तरी मी का बोझ बनू? मी माझ्यापुरते कमाऊ शकते. आणि चांगले स्थळ आले तर लग्नही करून मोकळी होणार आहे.” 

--------------------

विमल वहिनींनी जे आईला सांगितलेले ते तिने मला जसेच्या तसे सांगितले.

“आता तूच सांग मला... बाबाजींनी विमल वहिनींना जे सांगितले त्यात काय चूक होते? आणि अशा पतीला परमेश्वर म्हटले तर सैतान कुणाला म्हणावे?” आईने मला प्रश्न केला. अर्थात मी तरी काय बोलणार यावर?

“खरंय आई... शेवटी पती असला तरी तो माणूसच असतो आणि माणसात चांगुलपणा आणि वाईटपणा असणारच. त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याशी जसे वर्तन करेल तसेच त्याला उत्तर द्यावे लागणार. तू म्हणते ते काही खोटे नाही. पती बिलकुल परमेश्वर असत नाही.”

No comments:

Post a Comment