आज मला
माझ्या शाळेतील दिवसांची खूप
आठवण येते आहे. खरंच...
काय दिवस होते ते...
केवळ अफलातून... शाळेतील शिक्षक, मित्र,
शाळेच्या बाहेर बसून गोळ्या
चॉकलेट विकणारे मामा या
सगळ्यांशीच एक प्रकारचे
नाते निर्माण झाले होते.
आजही जेंव्हा जेंव्हा त्यांची
आठवण होते त्यावेळेस खूप
छान वाटते. आज जो
प्रसंग मला त्या
निमित्ताने आठवला, तो आहे मी नववीत
असतानाचा...
नुकतीच घटक चाचणी
परीक्षा संपली होती, सरांनी
पेपरचे मार्क सांगायला सुरुवात
केली होती. तसे दोनतीन
पेपरचे मार्क सांगून झाले
होते आणि मला
जी अपेक्षा होती त्यापेक्षा एक दोन मार्क
जास्तच मिळाले म्हणून मी
इतर विषयांचेही मार्क जाणून घेण्यास
आतुर झालो होतो. दुसरा तास
संपला आणि तिसरा
भूगोलाचा तास सुरु झाला. आम्हाला भूगोल
शिकवायला ठाकूर मॅडम होत्या.
खूप छान शिकवायच्या त्या. इतरांसारखेच त्यांनी एकेकाला उभे
करून त्यांचे मार्क सांगायला
सुरुवात केली. एरवी माझा
नंबर आधी असायचा
पण त्या दिवशी मात्र
माझे नांव लवकर पुकारले
जात नव्हते. छातीत धडधड उगाचंच
वाढायला लागली. तसा पेपर
सोपा गेला होता पण
काय सांगता येते? शेवटी
माझे नांव घेतले आणि
त्याबरोबर अजून तीन नावे
घेतली. त्या तिन्ही मुलीच
होत्या. चौघेही आपापल्या जागेवर
उभे राहिलो आणि मॅडम
बोलायला लागल्या..
“मुलांनो, आज या
चौघांना मी यासाठी
उभे केले आहे की
तुम्ही यांच्या पासून काही
शिकले पाहिजे. या चौघांनी
घटक चाचणीत भूगोल या
विषयात पैकीच्या पैकी मार्क
मिळवले आहेत. आता पुढच्या
चाचणीत यांच्या बरोबरच तुम्हीही
असेच मार्क मिळवावेत अशी
माझी अपेक्षा आहे... चला
आता प्रत्येकाने आपले पेपर घेऊन
जा. म्हणजे काय चुकले
आणि काय नाही
हे तुम्हा सर्वांना समजेल.”
आम्ही सर्वजण आपापले पेपर घेऊन
जागेवर जाऊन बसलो. मॅडमनी
पुढचं शिकवायला सुरुवात केली
आणि वीस एक
मिनिटात तास संपल्याची
बेल झाली. मॅडम जशा
वर्गाबाहेर पडल्या, आमचा कल्ला सुरु
झाला. प्रत्येक जण आपले
उत्तर दुसऱ्याशी तपासून पहात होता.
मी जरा जास्तच
खुश. पुढच्या पाच सात
मिनिटात पुढच्या तासाचे सर
वर्गात आले. त्यांच्याही हातात
पेपर होतेच. आल्या आल्या
त्यांनी हातातील डस्टर टेबलवर
आपटले आणि म्हणाले...
“वचवच पुरे..!!! हा वर्ग
आहे की बाजार?”
हे आमचे
जोशी सर... जीवशास्त्र शिकवायचे. बऱ्यापैकी नाकातून बोलायचे. कित्येक
वेळेस बोलताना त्यांच्या नाकाची
खूप विचित्र हालचाल व्हायची. खूप हसू यायचं,
पण हसता येत नव्हतं.
हातातील पेपरचा गठ्ठा खाली
ठेवून पहिलाच पेपर त्यांनी
हातात घेतला. आणि म्हणाले...
“हं... कोणाचा आहे
बरं हा पेपर?
अरे वा... जोशी का...
छान छान... चल जोशी
उभा रहा.”
मनात म्हटलं क्या
बात है... आधीच्या तासाला
माझ्या बरोबर अजून तीन
मुली होत्या पण आता...
मी एकटाच... अगदी ऐटीत
उभा राहिलो. जोशी सरांनी मान
खाली करून चष्म्याच्या वरच्या
बाजूने माझ्याकडे एकवार नजर टाकली.
“हं... तू जोशी
का? बरं... तुझा आवडता
विषय कोणता रे बाळ?”
म्हटलं इतर विषयांचे
नांव घेतले तर सर
चिडायचे म्हणून म्हटले...
“जीवशास्त्र सर...”
मी फक्त
बोलायचा अवकाश हो... सरांचा
चेहरा एकदम बदलला... त्यांनी
माझा पेपर हातात घेवून
त्यांची जागा सोडली आणि
माझ्या जवळ येवून
जोरात माझा कान पिळत
म्हणाले...
“जोश्या, गधड्या... अरे एक
जोशी इथे जीवशास्त्र जीव तोडून शिकवतो आणि
दुसरा जोशी मात्र या
विषयात १० पैकी
१ मार्क मिळवतो? अरे
मला आता जोशी
म्हणवून घ्यायची लाज वाटते...
जीव द्यावासा वाटतो... आणि
तू म्हणतो की जीवशास्त्र तुझा आवडता विषय आहे
म्हणून?”
आईशप्पथ सांगतो... खूप जोरात
कान पिळला होता त्यांनी. तोंडातून फक्त... आंऽऽऽ.... इतकाच
उच्चार फुटला.
“धर हा
पेपर अन् उदया
तुझ्या पालकांना घेऊन ये...
बस..!!!”
पांच मिनिटांपूर्वीची माझी अकड पूर्ण संपली होती. च्यायला... या जीवशास्त्राच्या... साल्याने जीवच घेतला की माझा... वर्ग तोच, दिवसही तोच, मुलंही तेच... त्यांच्या नजरा आताही माझ्याच कडे, पण नजरेतील भाव मात्र बदललेले. वपुंनी त्यांच्या एका कथेत म्हटले आहे की ‘जेंव्हा अनेक नजरा आपल्याकडे रोखून पहात असतात त्या वेळेस त्या नजरेतील कैफ काही औरच असतो...’ आज जर मला ते भेटले असते तर त्यांना नक्कीच सांगितले असते... ‘ज्या वेळेस अशा प्रसंगानंतर त्याच अनेक नजरा आपल्याकडे रोखून पाहतात ना, त्यावेळेस त्या खूप वेदनादायी असतात...’
No comments:
Post a Comment