Sunday, 29 July 2018

संकल्प

मी केलेल्या संकल्पांची यादी केली तर पानेच्या पाने भरतील, पण त्यातील पूर्ण किती झाले असे विचारले तर मात्र मला डोके खाजवावे लागणार हे नक्की. असे नाही की सगळेच अपूर्ण राहिले, पण १००% केलेला संकल्प पूर्ण झाला असे किमान अजून तरी घडले नाही. आणि अजूनही मी संकल्प करणे सोडलेही नाही. आजकाल मला संकल्प करण्याचं व्यसनच लागलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. म्हणजे दर दिवसाआड मी एखादा संकल्प करतो. अर्थात तो ऑफिस मधून घरी जाईस्तोवर बऱ्याचदा विसरलेलाही असतो. पण जर कधी चुकून लक्षात राहिलाच तर माझा आळशीपणा त्याला पूर्ण होऊ देत नाही. तसे पूर्ण न झालेले संकल्प सांगायचे झाले तर... मला व्यायाम करून बॉडी बनवायची होती, क्रिकेट खेळताना किमान एकदा तरी विरुद्ध टीमच्या प्लेअरचा कॅच पकडायचा होता, आयुष्यात एकदा तरी तमाशातील सवाल जवाब लाईव्ह पहायचा होता, किमान एकदा तरी शाळा / कॉलेजमध्ये असताना किमान एका विषयात तरी पहिले यायचे होते, शाळेत असताना एकदा तरी वर्गातील मुलांवर दादागिरी करायची होती... पण साला नशीबच पांडू... बरेच प्रयत्न केले पण यश काही मिळाले नाही.

आजही मी माझ्या अशाच एका अपूर्ण राहिलेल्या संकल्पाबद्दल बोलणार आहे. हा संकल्प बहुतेक विद्यार्थी त्यांच्या शाळा / कॉलेजच्या दरम्यान करतात. काही जण तर त्यानंतरही करतात. त्यातील काहींना यश येते तर काहींच्या नशिबी फक्त निराशा येते. माझ्यासारखी... हा संकल्प म्हणजे इंग्रजांच्या भाषेत फाडफाड बोलणे.

ज्या ज्या वेळेस एखादया चिकण्या पोरीला फोनवर इंग्लिश मध्ये बोलताना पाहतो, त्यावेळेस तर मला हा संकल्प हटकून आठवतो. मला अजूनही आठवते... सर्वात प्रथम हा संकल्प मी इयत्ता ९वी मध्ये केला होता. कारण होते आमच्या वर्गाची मॉनेटर. ती दिसायला जशी सुंदर होती तशीच ती खूप हुशारही होती. आता तुम्हीच सांगा, सगळेच काय एकसारखे असतात का? पण तिला हे कुणी सांगावे? ती आमच्या कडून इंग्लिशचे स्पेलिंग पाठ करून घ्यायची. तसा मी कोणत्याही शिक्षकाला घाबरत नव्हतो, पण तिला घाबरायचो. त्या दिवशी तारीख वार काय होता हे आता आठवत नाही पण आमचे इंग्रजीचे सर काही कारणांनी रजेवर होते आणि वर्गावर यायला इतर कुणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे मग आमच्या शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी तिलाच आमचा वर्ग तो पूर्ण तास सांभाळण्यास सांगितले. झाले... माकडाच्या हातात कोलीतच मिळाले. तिने लगेच एकेकाला स्पेलिंग विचारणे चालू केले. एकेकाला उभे करून स्पेलिंग विचारले जात होते. समजा त्याने बरोबर सांगितले की त्याच्या पुढच्या पासून दुसरे नाहीतर जोपर्यंत बरोबर स्पेलिंग येत नाही तोपर्यंत तेच चालत राहायचे. माझा नंबर आला आणि तिने एकदम अवघड स्पेलिंग विचारले... गर्लचे... म्हटलं बोंबला... तसचं मनातल्या मनात स्पेलिंग बनवलं आणि सांगितलं... garl.

“चूक..., जा पुढे जाऊन उभा रहा.!!!” आता न जाऊन सांगतो कुणाला? गुमान समोर जाऊन उभा राहिलो. माझ्यानंतर अजून ६ जण माझ्या शेजारी उभे राहत गेले. आणि तेवढ्यात आमचे उपमुख्याध्यापक पोळ सर वर्गावर आले. आम्ही तिथे का उभे आहोत याची त्यांनी विचारणा केली. अर्थात आम्ही कसले सांगतोय... पण तिने लगेच सांगितले...

“सर... यांना गर्लचे स्पेलिंग येत नाही...” अस्सा राग आला मला... पण बसलो शांत.

“अरे येड्यांनो... बाकी काही आले नसते तरी चालले असते रे... पण तुमचे तर गर्लशीच वावडे...” अर्थात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातील खोच काही नीटशी समजू शकली नाही.

“चला हात पुढे करा...” चांगल्या सणसणीत दोन छड्या खाल्ल्या आणि जागेवर जाऊन बसलो. माझ्या शेजारी बसणारा संदीप्या हसत होता. खूप राग आला मला त्याचा... आणि तिचा सुद्धा... लगेच ठरवले, परत अशी वेळ येवू द्यायची नाही. तसा संकल्पच केला. घरी आल्या आल्या रॅपीडेक्स इंग्लिश स्पिकिंगचे पुस्तक हातात घेतले. पहिले दोन तीन पाने वाचून झाली आणि इंग्रजीतले काळ माझ्या पुढे काळ बनून आले. झालं... सगळं अवसान गळालं... अर्थात तो पर्यंत गर्लचं स्पेलिंग मात्र पाठ केलं होतं.

दहावीला रट्टा मारून कसातरी इंग्लिश विषयात काठावर पास झालो. कॉलेजला आलो त्यावेळेस आपण पूर्वी काही संकल्प केला होता हे पूर्णपणे विसरलो होतो. १२वी पास होऊन एफ वायला आलो आणि कॉलेज सुरु झाले. काही दिवसांनी उशिरा प्रवेश घेऊन रुपाली वर्गात दाखल झाली. एकदम पहिल्या नजरेतच आवडली आपल्याला. पण ती इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी असल्याने बऱ्याचश्या वेळेस तिचे संभाषण इंग्रजीतच असे. त्यामुळे पुन्हा एकदा मला माझा संकल्प आठवला आणि अडगळीत टाकलेले रॅपीडेक्स पुन्हा डेस्कवर आले. मग मित्रांबरोबर इंग्रजीत बोलण्याचा सराव सुरु झाला. जवळ जवळ १५/२० दिवस हे सगळे सुरळीत चालू होते पण नंतर तिचे आमच्याच वर्गातील एका मुलाबरोबर अफेअर चालू झाले असे ऐकले आणि मुडच गेला. साला आपले नशीबच पांडू...

त्यानंतर टी वायला आलो. वर्षाअखेरीस तोंडी परीक्षा असते आणि त्या वेळेस बाहेरून येणारे सर इंग्रजीत प्रश्न विचारतात असे मला समजले आणि तोंडचे पाणीच पळाले. मनात म्हटले... ही इंग्रजांची भाषा काय आपल्याला धड जगू देत नाही... पण पर्याय नव्हता. त्यामुळे परत एकदा संकल्पाची आठवण झाली आणि तोंडी परीक्षेच्या ८ दिवस आधी, परत रॅपीडेक्स वर आले. पण या वेळेस मात्र पुस्तकाबरोबर त्याची फाटलेली पाने चिटकवण्यास फेविकॉलही बाहेर काढावा लागला. पुन्हा एकदा परत पहिल्या पासून अभ्यास चालू झाला. कारण फक्त इतकेच होते की जर सरांनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर किमान समजला तर पाहिजे. तोंडी परीक्षेचा दिवस उजाडला. माझा नंबर आला. मी जरा घाबरत घाबरतच सरांपुढे हजर झालो. माझा नंबर खुपच मागे असल्यामुळे आणि वेळही संपत आल्यामुळे सरांनीही अगदी जुजबी प्रश्न शुद्ध मराठीत विचारले आणि आवरते घेतले. झाले... परत एकदा रॅपीडेक्स पुस्तका सारखाच माझा संकल्पही अडगळीत गेला.

नंतर नोकरीच्या वेळेस इंटरव्यू साठी आणि इतर २/३ वेळेस परत संकल्पाची आठवण झाली, पण त्यापलीकडे काहीच घडले नाही. आताही मधून मधून त्याची आठवण येते. खास करून जर कुणी फेसबुकवर इंग्रजीत एखादी पोस्ट टाकली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती मुलगी असेल तर संकल्प आठवतो. मग कधी कधी फक्त लाईक करून तर कधी एखादी कमेंट कॉपीपेस्ट करून वेळ मारून नेतो. पण अजूनही मी हार मानलेली नाही... अजूनही या पूर्ण न झालेल्या संकल्पाला मनातून काढून टाकलेले नाही. आता माझ्याकडे रॅपीडेक्सचे पुस्तक नाहीये, पण त्याची जागा बऱ्याच ebook, VCD English Speaking Cources यांनी घेतलेली आहे. अजूनही मी मधून मधून त्याच्या अभ्यासाला बसतो. पण तितक्यात आठवते की जर आज साईट अपलोड झाली नाही तर पैसे मिळणार नाहीत. म्हणून परत त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कामांचा क्रम लावला जातो आणि नंतर त्या सीडी बाजूलाच पडतात. पुन्हा जेंव्हा कधी संकल्पाची आठवण येईल त्यावेळेस मदतीला धावून येण्यासाठी. अजून तरी हा संकल्प अपूर्णच आहे पण पुढे नक्कीच कधीतरी तो पूर्णत्वास जाईल अशी कुठेतरी एक आशाही आहेच.

No comments:

Post a Comment