Friday, 20 July 2018

विद्यार्थी

काल माझ्या जुन्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये गेलो होतो. या जागेशी एक खास नातं जोडलं गेलं आहे माझं. जवळपास ७ वर्ष होतो त्या जागेत त्यामुळे असेल कदाचित. माझं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं आणि पहिल्या मजल्यावर लहान मुलाचं पाळणाघर. काही लहान मुलं दरवाज्यातच उभी असायची. त्यांच्याशी गप्पा मारायला खूप छान वाटायचं. त्याच बिल्डिंग मध्ये सगळ्यात वरच्या मजल्यावर कुत्र्याचं पाळणाघर आहे. माझ्या ऑफिसच्या मजल्यावरच दुसऱ्या बाजूला सी.ए. इन्स्टिट्यूट होतं. एका ब्लॉक मध्ये ऑफिस आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये टिचिंग लॅब. तेथील बॅचेस फक्त १ महिना चालायच्या. १०० तासांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम ( ITT ) असतो. त्यातले काही विषय शिकवायला मीही जात होतो. तेवढीच वरची कमाई. तसे तिथे येणारे विद्यार्थी हे मुळातच हुशार, पण तरीही त्यांना हे सक्तीचे ट्रेनिंग तितकेसे रुचत नव्हते. अर्थात सक्ती केली तर हे असं घडणं स्वाभाविकच म्हणा. या एक महिन्याच्या कालावधीत कधी कधी त्या मुलांशी एक मित्रत्वाचं नातं निर्माण व्हायचं. कित्येक वेळेस त्यांच्या इंटरवल मध्ये चहा पिण्यास आम्ही १२/१५ जण बरोबरच जायचो. कधी कधी मग काही जणांबरोबर छोटेखानी ट्रीपही व्हायच्या. एकंदरीत मजा यायची.

सी.ए. ऑफिसमध्ये तशी सारखी वर्दळ. तेथील स्टाफही चांगला होता. पण सी.ए. करणाऱ्या मुलांनी वाह्यातपणा करू नये किंवा सी.ए.चा दर्जा कायम राखला जावा अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. अर्थात तिथे ट्रेनिंगसाठी येणारे मुलं हे बऱ्याचदा नुकतेच १२वी पास करून आलेले असल्यामुळे त्यांच्या वयानुसार त्यांच्यात अल्लडपणा असायचाच. मग स्टाफला थोडे सक्त व्हावे लागे आणि त्यामुळे मुलं स्टाफमधील म्याडमला “डोकोमो” म्हणायला लागले होते. “डोकोमो” यासाठी कारण त्या कॅरीडॉरमध्ये किंवा लॅबमध्ये कुणी गोंधळ घालत आहे का हे सतत डोकावून पहायच्या. त्याच काळातील ही आठवण आहे.

एक दिवस असाच मी माझ्या ऑफिसमधून चहा पिण्यास बाहेर पडलो. कॅरीडॉर मध्ये जुन्या बॅचचे विद्यार्थी भेटले. ते त्यांचे सर्टिफिकेट घ्यायला आले होते. त्यांच्या बॅच बरोबर खूप जवळीक निर्माण झालेली असल्याने तिथेच आमच्या गप्पा चालू झाल्या. आमचा गोंधळही वाढला. मी तर शेजारी बॅच चालू असून दुसरे सर तिथे शिकवत आहेत हेही विसरलो. खरं सांगू का... अशा वेळेस मला माझे कॉलेजचे दिवस आठवतात आणि मी त्यात बाकी इतर सगळे विसरून जातो. आमचा गोंधळ वाढल्यामुळे तो ऑफिसमध्ये ऐकू गेला. एरवी म्याडम डायरेक्ट गोंधळ चालू असलेल्या ठिकाणी जायच्या, पण त्यादिवशी बहुतेक ऑफिसमध्ये कुणीच नसल्यामुळे म्याडम बसल्या जागेवरून उठत ओरडल्या...

“कोण आहे रे तिकडे?”

म्याडमचा आवाज आला आणि पाठोपाठ म्याडम दरवाज्यात आल्या. त्या मानाने कॅरीडॉर लहान असल्यामुळे सगळ्यांची एकच धांदल उडाली. प्रत्येक जण आपण त्यांच्या नजरेस पडू नये यासाठी जीव खावून पळत सुटला. त्यांच्यात सामील झाल्यामुळे इतर कोणताही विचार नं करता मीही त्यांच्याबरोबर पळत सुटलो. दोन जिने उतरून खाली पोहोचलो, त्याच वेळेस दम घेतला. चांगलीच धाप लागली होती. शेवटी वयाचा फरक पडतोच ना? खाली येवून थांबतो न थांबतो तोच समोर दोन सुंदर मुली येवून उभ्या राहिल्या.

“हे काय सर? इतकं कुणाला घाबरून खाली आलात? केवढी धाप लागली आहे तुम्हाला!!!” त्यांनी प्रश्न केला.

मनात म्हटलं... आयला खरंच की..! मी कशासाठी पळालो? मी काय केलं? गोंधळ तर मुलं घालत होते. मी फक्त तिथे उभा होतो. थोडा खजील झालो...

“काही नाही... वरच्या पाळणाघरातलं कुत्रं सुटलं होतं” मी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत उत्तर दिलं.

“बापरे...!!!” दोघींपैकी एक म्हणाली.

आमचे असे बोलणे चालू होते इतक्यात जे माझ्याबरोबर इतका वेळ तिथं गोंधळ घालत होते त्यांच्यातील एक कार्ट मध्येच बचकलं...

“कशाला चाटा मारताय सर? खरं सांगा ना... डोकोमो ओरडत अंगावर धावली ते...!!!”

च्यायला... माझा चेहरा पाहण्यासारखा झाला. त्या मुलींच्या डोळ्यासमोर बहुतेक तो प्रसंग उभा राहिला असावा... मी पुढे पळतोय आणि डोकोमो पदर खोचून ओरडत माझ्या मागे धावतेय... दोघींच्याही हसण्याचा बांध फुटला.

“हे काय सर? तुम्हीही घाबरतात डोकोमोला?” त्यांनी हसत विचारले.

आता यांवर नाही तरी कसं बोलणार? त्यातून पोट्टे तिथंच उभे... परत काहीतरी पचका केला असता. म्हणून नीट शांतीला धरलं. हड यार... हे बावळट पोट्टे ना... जागेवर गोची करतात आपली... म्हणून मोठे माणसं बोलून गेलेत... विद्यार्थ्यांशी ना दोस्ती चांगली... ना दुश्मनी...

No comments:

Post a Comment