Friday, 20 July 2018

अरसिक

मध्यंतरी श्रीरामपूरला गेलो होतो. अनेक मित्र भेटले. त्यात यशाही भेटला. त्याच्या आईवडिलांनी त्याचे नाव चांगले यशवंत ठेवले होते पण आम्ही मित्रांनी त्याच्या नावाची पार वाट लावली आहे. आवडते आपल्याला अशी वाट लावायला. असो. उगाच विषयांतर नको... तर... काय सांगत होतो मी? अं... आठवलं... यशा भेटला... अनेक वर्षानंतर आम्ही भेटत असल्यामुळे दोघांनाही आनंदाचे भरते आले होते. आधी एकमेकांना टोमणे मारून, शिव्या देऊन झाल्यावर आम्ही माणसात आलो. इकडचे तिकडचे विषय चालू झाले आणि मला न आवडणारा प्रश्न त्याने विचारला.

“मिल्या... साल्या पोरं कितीये तुला?” परत एकदा माझा संताप झाला. ते मोठे माणसे सांगून गेलेत ना... हर एक दोस्त कमीना होता है म्हणून... त्याला यशाही अपवाद नव्हता. माझा चेहरा पडला.
 
“सोड यार तो विषय... दुसरे काहीतरी बोल...” मी वैतागून म्हटले.

“कारे? काय झाले?” तो काहीसा सिरिअस झाला.

“साला इतक्या वर्षात एकाही पोरीने मला पसंत केले नाही... मग लग्न कसे होणार? आणि लग्नच नाही तर पोरांचा संबंधच कुठे येतो?”

“आयला... लैच भारी ना भो...!!!” त्याच्या चेहऱ्यावर ओतू जाणारा आनंद दिसून येत होता. मी मात्र भडकलो. माझ्या चेहऱ्यावरील भाव त्याच्या लगेचच लक्षात आले.

“अरे चिडू नकोस... खरंच तू वाचलास... आणि हे मी अगदी मनापासून बोलतो आहे.” यावेळेस मात्र त्याचा स्वर खरचंच गंभीर होता.

“म्हणजे?” मी गोंधळलो.

“अरे... तुला तर माहितीच आहे... मी लव्ह मॅरेज केले ते...”

“हो... बरोबर... मग?”

“अरे मग काय...? आता वाटते त्यावेळेस या फंदात पडलो नसतो तर बरे झाले असते.” त्याचा चेहरा काहीसा गंभीर दिसत होता.

“का रे?”

“अरे... यात तिची काहीच चूक नाही... खरे तर माझीही नाही...”

“मग?”

“सगळी चूक निसर्गाची आहे...”

“निसर्गाची? ती कशी?” मी त्याच्याकडे आश्चर्याने पहात विचारले.

“कारण निसर्गाने पुरुषाला काही गोष्टी उपजतच दिल्या आहेत. आणि त्यातील एक गोष्ट म्हणजे कालांतराने येणारी अरसिकता. तुला तर माहितीच आहे, आमचे प्रेम जुळले ते आमच्या गाण्यांच्या आवडीमुळे. त्यावेळेस तिने मला विचारले होते...”

“हृदयी जागा, तू अनुरागा, प्रीतीला या देशील का? देशील का?
बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वगार्चे ते रुप ठेंगणे,
शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ?”

आणि त्यावर मी उत्तर दिले होते...

“दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसलीस तू
उरले न आंसू, विरल्या व्यथा ही
सुख होऊनीया आलीस तू”

“मग काय... आमची मने आणि आवडी जुळल्या. आमचे लग्नही झाले आणि दोनेक वर्षे खूप चांगली गेली.”

“हे मला माहित आहे रे? पण मग माशी शिंकली कुठे?”

“दोन वर्षानंतर ऑफिसमधील कटकट, ताण यामुळे माझ्यातील रसिकता कमी होत गेली. बरे आपल्याला मानसिक ताण काय कमी असतात का? बहुतेक त्या दिवशी तिचा मूड होता. मी ऑफिसमधून दमून आलेलो, तिने गळ्यात हात टाकले आणि तिचे गुणगुणणे चालू झाले.”

“मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे,
मोकळ्या केसात माझ्या... तू जीवाला गुंतवावे...”

मी एकतर वैतागून आलेलो आणि त्यात तिचे गुणगुणणे... शप्पथ सांगतो... त्या दिवशी मला तिचा कोमल आवाजही भसाडा वाटला रे... त्याच तिरीमिरीत मी उत्तर दिले...

“आज राणी, पूर्वीची ती प्रीत तू मागू नको,
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको...”

मग काय... पहिली ठिणगी तिथेच पडली. त्यानंतर काही दिवसांचा अबोला सप्ताह सुद्धा साजरा झाला. पण एक सांगू... या बायका ना... बऱ्याच वेळेस स्वतःच अशा वेळी पुढाकार घेतात. खूप कौतुक वाटते मला त्यांचे. तीही या गोष्टीला अपवाद नाही. जवळपास आठ दिवसानंतर तिनेच बोलायला सुरुवात केली.

“कारे दुरावा, कारे अबोला, अपराध माझा असा काय झाला?
नीज येत नाही, मला एकटीला, कुणी ना विचारी, धरी हनुवटीला,
मान वळविसी तू वेगळ्या दिशेला, अपराध माझा असा काय झाला?”

“यार... खरंच... वहिनी खूप समंजस आहेत...” मी म्हटले.

“हो यार... पण साला आपले नशीब खराब असते त्याला कोण काय करणार?”

“म्हणजे?” मी परत गोंधळलो.

“अरे त्या दिवशीही मी असाच वैतागून घरी आलो होतो. त्यामुळे माझे डोके ठिकाणावर नव्हते. मी सुरुवात केली...”

“तोच चंदर्मा नभात, तीच चैत्र यामिनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न आर्तता उरात, स्वन ते न लोचनी
एकांती मज समीप, तीच तूही कामिनी”

“झाले... ती चांगलीच भडकली. तिच्यात किती ताकद आहे हे मला त्या दिवशी समजले. संतापाच्या भरात तिने माझ्या पार्श्वभागावर अशी काही लाथ मारली की मी डायरेक्ट बेडच्या खाली... एक दोन मिनिट तर काय झाले हेच मला समजले नाही, जेंव्हा समजले तेंव्हा भयंकर संताप आला. मी तिरीमिरीतच तिच्याकडे पाहिले तर तिचे डोळे आग ओकत होते. एक तर तीने कराट्यात ब्लॅकबेल्ट मिळविलेला आहे. त्यापुढे आपली डाळ काय शिजणार? उलट आजून दोन चार बरगड्या तुटायच्या, म्हणून शांत बसलो तर तिचा समज झाला की नक्कीच माझे बाहेर लफडे आहे म्हणून मी असा वागतोय. त्या दिवशी फुल राडा झाला आणि ती दुसऱ्या दिवशी गेली माहेरी.”

“आयला... डेंजरच... वहिनी रे... पण जाऊ दे... त्यामुळे तुझा मार तर वाचला...” मी हसत म्हटले.

“अरे शाररीक मार वाचला... पण लोकांचा शाब्दिक मार चालू झाला ना... आता जो उठतो, तो विचारतो... वहिनी कधी येणार? आणि तिचे नाव काढले तरी मला ती किक आठवते. आणि म्हणून मी तुला म्हटले... तुझे लग्न झाले नाही हे लैच भारी झाले म्हणून...”

“अरे पण यात चूक तर पूर्णतः तुझी आहे. मग दोष निसर्गाला का?”

“कारण बहुतांशी पुरुष हे लग्नाच्या काही वर्षानंतर स्वतःच्या बायकोच्या बाबतीत बरेचशे अरसिक बनतात. त्यांची सुंदर बायको त्यांना साधारण आणि इतर साधारण स्त्रिया त्यांना सुंदर वाटू लागतात. अर्थात हे कुणी मान्य करतात, कुणी करत नाहीत हाच काय तो फरक. आणि या गोष्टी बायकांना लगेच समजून येतात. पण तरीही त्या बऱ्याच वेळेस अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचे संसार टिकून राहतात. थोडक्यात संसार टिकण्यात स्त्रीचा वाटा ७०% असतो असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यांच्यातील हा सोशिकपणा त्यांना निसर्गानेच दिला आहे. म्हणजे निसर्गाने आपल्यावर अन्यायच केला नाही का? त्यांना समंजस पणाचा गुण द्यायचा आणि आपल्याला अरसिकपणाचा अवगुण द्यायचा... हे चूक नाही का?”

आता यावर मी तरी काय बोलणार? किमान या बाबतीत तरी मी अनुभवहीन माणूस आहे भो...

No comments:

Post a Comment