माझ्या आईला एक सवय होती. एक तारखेला माझ्या वडिलांचा पगार होण्याच्या
आधी तिची महिनाभरात लागणाऱ्या वस्तूंची आणि खर्चाची यादी तयार असायची. पैसा
हातातही आलेला नसायचा आणि तिची वाटणी पूर्ण झालेली असायची. बरे एकदा का
वाटणी झाली, की मग ती रक्कम त्याच खर्चासाठी वापरली जायची. त्यात सहसा बदल
झालेला मला तरी आठवत नाही. अपवाद फक्त तिला महिन्याला तिच्या खर्चासाठी
मिळणाऱ्या पैशांचा. ते पैसे कधी तृप्ती कधी मकरंद तर कधी मी, आमच्यासाठीच
राखीव असल्यासारखे होते.
तिची तीच सवय बरीचशी माझ्यातही आलेली
आहे. भले पैसे कितीही असोत. ते ज्यासाठी ठरवले आहेत त्यासाठीच खर्च करायचे
हेच मी करत आलो आहे. पण ही सवय तिला काय किंवा मला काय, उपजत नव्हती.
त्यासाठी तिच्या आयुष्यात घडलेली एक घटना कारणीभूत होती. तीच घटना आज इथे
सांगणार आहे.
माझ्या आईला चित्रपट पाहण्याचा खूपच नाद होता. अगदी
नोकरी करत असताना आणि नसतानाही. हातात पैसे आले की त्यातील बरेच पैसे तिचे
चित्रपटाच्या तिकिटातच खर्च होत. त्यावेळेस नाशिकमध्ये चित्रपटाचे तिकीट दर
होते १ रुपया दहा पैसे.
त्या दिवशी गुरुपोर्णिमा होती. आईची शाळा
साडेअकरा वाजता सुटली. तिच्या पर्समध्ये एक रुपया होता. तिने मनात ठरवले की
आधी बाबाजींकडे जावे. त्यांना दक्षिणा म्हणून हा एक रुपया द्यावा आणि मग
घरी जावे. तिने शाळेच्या पायऱ्या उतरल्या आणि तेवढ्यात तिला तिची मैत्रीण
मंगल मावशी भेटली.
“अगं तुझ्याकडेच येत होते मी...” मंगल मावशी म्हणाली.
“का?” आईने विचारले.
“अगं... दामोदरला राजेश खन्नाचा पिक्चर लागलाय... चल जाऊ...”
“नाही गं... एकतर माझ्याकडे फक्त एक रुपया आहे. आणि तो मला बाबाजींना द्यायचा आहे.” आईने असमर्थता दर्शवली.
“ए... काय गं तू पण? बाबाजींना तू नंतर दे पैसे. तसेही तू त्यांना कुठे
कबुल केले आहेस? माझ्याकडे माझ्या तिकिटाचे पैसे आहेत. उरला प्रश्न फक्त १०
पैश्यांचा. ते माझ्या मावशीकडून घेऊ... चल...” मंगल मावशीने म्हटले आणि
आईच्या मनात आले. ‘खरंच... बाबाजींना काय माहित असणार? आपण उद्या परवा देऊ
त्यांना पैसे आणि आज पिक्चर पाहून येऊ.’
“बरं... चल... फक्त आधी
घरी जाऊन आईला सांगावे लागेल.” आई तयार झाली. दोघीही आजीला सांगण्यासाठी
घरी निघाल्या आणि वाटेतच कुठूनशे बाबाजी त्यांच्यासमोर दत्त म्हणून हजर
झाले.
“महारानी... मेरा पैसा देव...” त्यांनी हसत म्हटले. त्यांना
समोर पाहताच आई गोंधळली. तिला काय बोलावे हेच समजेना. तसेही तिने फक्त मनात
ठरवले होते. प्रत्यक्षात ती असे काही म्हणाली नव्हती.
“क्यू... तुमको चित्र देखने जाना है?” बाबाजींनी पुढचा प्रश्न केला.
“हो बाबाजी...” काहीशा नापसंतीनेच तिने सांगितले.
“मुझे वो कूछ पता नही... मुझे मेरा पैसा दो...” बाबाजींनी आपले टुमणे
चालूच ठेवले. मंगल मावशी तर अगदी गप्पच होती. शेवटी आईने एकदा मंगल
मावशीकडे पाहिले आणि अगदी नाखुषीनेच पर्स मधून १ रुपया काढून बाबाजींच्या
हातात दिला.
“क्यू महारानी... नाराज हो?” बाबाजींनी विचारले.
“नाही बाबाजी...” आईने म्हटले. बाबाजींनी खिशात हात घातला. खिशातून १० पैसे काढले आणि १ रुपया १० पैसे आईच्या हातात ठेवले.
“लो... मुझे मेरा पैसा मिल गया, अब ये तुम्हारे लिए... जावो चित्र देखो...
लेकीन एक बात हमेशा याद रखो. अगर किसीको कुछ कबूल करो तो उसे निभाओ... बात
बहोत छोटी है, पर है बडे कामकी... जावो...” असे म्हणत बाबाजी जसे अचानक
आले तसेच अचानक निघूनही गेले.
त्या दिवसांपासून आईला ही सवय लागली.
आणि तिने सांगितलेल्या या घटनेने माझ्यातही ती सवय हळूहळू रुजली. अर्थात
मला प्रत्येक वेळेस असे करणे शक्यच होते असे नाही. पण तरीही माझा प्रयत्न
मात्र तोच असतो. जी गोष्ट ज्याला कबूल केली, ती त्याला द्यायचीच. प्रसंगी
आपल्या फायद्याशी तडजोड करावी लागली तरी चालेल पण वचनपूर्ती झालीच पाहिजे.
No comments:
Post a Comment