Saturday, 21 July 2018

शिवाशिव

माझी आई खूप धार्मिक होती. पण जेंव्हापासून मला समजायला लागले तेंव्हापासून मी तिला कधीही सोवळेओवळे पाळताना पाहिले नाही. इतकेच काय पण आमच्या घरी गौरीचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच झाला पाहिजे असेही काही बंधन नव्हते. गौरीची सवाष्णही ब्राम्हणेतर असायची. लहान असताना तर काही समजायचे नाही. पण जसजसा मोठा होत गेलो. हळूहळू एकेक गोष्टी समजत गेल्या आणि एक दिवस मी आईला विचारलेच. 

“तू इतका देवधर्म करतेस, तरी तू सोवळेओवळे पाळत नाहीस... असे का?”

त्यावर तिने तिच्या तरुणपणातला एक किस्सा सांगितला. पूर्वी बऱ्याच ठिकाणी चार दिवसांची शिवाशिव पाळली जात होती. माझे आजोळही याला अपवाद नव्हते. त्यावेळेस नाशिकमध्ये हनुमान बाबा ( बाबाजी ) नावाचे एक अवलिया पुरुष रहात होते. ते फक्त पाच घरी भिक्षा मागत. त्या पाच घरांमध्ये माझे आजोळही येत होते. कित्येक वेळेस बाबाजी घरात येत. एक दिवस असेच ते घरी आले त्यावेळेस त्यांना बाहेरच्या खोलीत एक चादर अंथरलेली दिसली. त्यामुळे त्यांनी लगेच त्यावरच फतकल मारली. माझी आजी स्वयंपाकघरात होती. बाबाजींची चाहूल लागताच ती बाहेरच्या खोलीत आली. तिला बाजूला अंथरलेल्या चादरीवर बाबाजी बसलेले दिसले. ती चादर माझ्या आईच्या चार दिवसांसाठी अंथरलेली होती, आणि त्यावरच बाबाजी बसल्यामुळे माझी आजी गोंधळली. मनातून बरीचशी घाबरली देखील. 

“बाबाजी... वहां मत बैठो...” काहीसे घाबरतच तिने बाबांजींना सांगितले.

“क्यू महारानी?” त्यांनी प्रश्न केला.

“वो... बेबीके लिए है...” बाबाजींना ही गोष्ट कशी सांगायची म्हणून तिने मोघम उत्तर दिले. पण आजीच्या चेहऱ्यावरील भाव बाबाजींनी ओळखले. आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

“क्यू... मै क्यू नही बैठ सकता?” त्यांनी उलट प्रश्न केला. पण त्यावर काय बोलावे हेच आजीला समजेना. त्यामुळे ती गप्पंच बसली. आजी काहीच बोलत नाही हे पाहून बाबाजींनीच सुरुवात केली.

“देखो महारानी... मै ये कूछ नही मानता. भगवान का बनाया हुवा ये शरीरधर्म है, फिर ये गलत कैसे हुवा? मेरी मानो तो तुम भी ये कुछ मत मानो...”

बाबाजींच्या या बोलण्यावर आजी तरी काय बोलणार? काही वेळ बाबाजी बसले, चहा घेतला आणि जसे अचानक आले तसेच निघूनही गेले. काही वेळाने आई घरी आली. आजीने सगळा किस्सा तिला सांगितला. 

“बघ आई... आता तर बाबाजीही माझ्या बाजूने आहेत. ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्यासाठी अवडंबर का म्हणून?” आईने आजीला प्रश्न केला. 

“हे बघ बेबी... तू मानत नाहीस ते ठीक आहे. पण उद्या तुला सासरी जायचे आहे. ते कसे मिळते काय माहित? समजा तिथे शिवाशिव पाळली जात असेल तर?”

त्यानंतर आईचे लग्न झाले आणि आजी म्हणाली होती तसेच झाले. आमचे घराणे म्हणजे धार्मिक बाबतीत एकदम कट्टर. त्यातून एकत्र कुटुंबपद्धती. माझे वडील सगळ्यात लहान. त्यामुळे तिथे आईला तिची मते चालवणे शक्यच नव्हते. कालांतराने बदलीच्या निमित्ताने वडिलांनी नाशिक सोडले आणि ते आपोआपच विभक्त झाले. त्यानंतर मात्र आईला तिची मते आचरणे जास्त सोपे झाले आणि आमच्या घरातील शिवाशिव हद्दपार झाली. लहान असताना जेंव्हा कधी नाशिकला मोठ्या घरी येत होतो, त्यावेळेस भिंतीच्या कडेला अंथरली जाणारी चादर श्रीरामपूरला आमच्या घरी मात्र कधीच अंथरली गेली नाही. तसेच श्रीरामपूरचे कावळेही कधी आमच्या घरातील स्त्रियांना शिवल्याचे मला स्मरत नाही.

No comments:

Post a Comment