Sunday, 29 July 2018

संकल्प

मी केलेल्या संकल्पांची यादी केली तर पानेच्या पाने भरतील, पण त्यातील पूर्ण किती झाले असे विचारले तर मात्र मला डोके खाजवावे लागणार हे नक्की. असे नाही की सगळेच अपूर्ण राहिले, पण १००% केलेला संकल्प पूर्ण झाला असे किमान अजून तरी घडले नाही. आणि अजूनही मी संकल्प करणे सोडलेही नाही. आजकाल मला संकल्प करण्याचं व्यसनच लागलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. म्हणजे दर दिवसाआड मी एखादा संकल्प करतो. अर्थात तो ऑफिस मधून घरी जाईस्तोवर बऱ्याचदा विसरलेलाही असतो. पण जर कधी चुकून लक्षात राहिलाच तर माझा आळशीपणा त्याला पूर्ण होऊ देत नाही. तसे पूर्ण न झालेले संकल्प सांगायचे झाले तर... मला व्यायाम करून बॉडी बनवायची होती, क्रिकेट खेळताना किमान एकदा तरी विरुद्ध टीमच्या प्लेअरचा कॅच पकडायचा होता, आयुष्यात एकदा तरी तमाशातील सवाल जवाब लाईव्ह पहायचा होता, किमान एकदा तरी शाळा / कॉलेजमध्ये असताना किमान एका विषयात तरी पहिले यायचे होते, शाळेत असताना एकदा तरी वर्गातील मुलांवर दादागिरी करायची होती... पण साला नशीबच पांडू... बरेच प्रयत्न केले पण यश काही मिळाले नाही.

आजही मी माझ्या अशाच एका अपूर्ण राहिलेल्या संकल्पाबद्दल बोलणार आहे. हा संकल्प बहुतेक विद्यार्थी त्यांच्या शाळा / कॉलेजच्या दरम्यान करतात. काही जण तर त्यानंतरही करतात. त्यातील काहींना यश येते तर काहींच्या नशिबी फक्त निराशा येते. माझ्यासारखी... हा संकल्प म्हणजे इंग्रजांच्या भाषेत फाडफाड बोलणे.

ज्या ज्या वेळेस एखादया चिकण्या पोरीला फोनवर इंग्लिश मध्ये बोलताना पाहतो, त्यावेळेस तर मला हा संकल्प हटकून आठवतो. मला अजूनही आठवते... सर्वात प्रथम हा संकल्प मी इयत्ता ९वी मध्ये केला होता. कारण होते आमच्या वर्गाची मॉनेटर. ती दिसायला जशी सुंदर होती तशीच ती खूप हुशारही होती. आता तुम्हीच सांगा, सगळेच काय एकसारखे असतात का? पण तिला हे कुणी सांगावे? ती आमच्या कडून इंग्लिशचे स्पेलिंग पाठ करून घ्यायची. तसा मी कोणत्याही शिक्षकाला घाबरत नव्हतो, पण तिला घाबरायचो. त्या दिवशी तारीख वार काय होता हे आता आठवत नाही पण आमचे इंग्रजीचे सर काही कारणांनी रजेवर होते आणि वर्गावर यायला इतर कुणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे मग आमच्या शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी तिलाच आमचा वर्ग तो पूर्ण तास सांभाळण्यास सांगितले. झाले... माकडाच्या हातात कोलीतच मिळाले. तिने लगेच एकेकाला स्पेलिंग विचारणे चालू केले. एकेकाला उभे करून स्पेलिंग विचारले जात होते. समजा त्याने बरोबर सांगितले की त्याच्या पुढच्या पासून दुसरे नाहीतर जोपर्यंत बरोबर स्पेलिंग येत नाही तोपर्यंत तेच चालत राहायचे. माझा नंबर आला आणि तिने एकदम अवघड स्पेलिंग विचारले... गर्लचे... म्हटलं बोंबला... तसचं मनातल्या मनात स्पेलिंग बनवलं आणि सांगितलं... garl.

“चूक..., जा पुढे जाऊन उभा रहा.!!!” आता न जाऊन सांगतो कुणाला? गुमान समोर जाऊन उभा राहिलो. माझ्यानंतर अजून ६ जण माझ्या शेजारी उभे राहत गेले. आणि तेवढ्यात आमचे उपमुख्याध्यापक पोळ सर वर्गावर आले. आम्ही तिथे का उभे आहोत याची त्यांनी विचारणा केली. अर्थात आम्ही कसले सांगतोय... पण तिने लगेच सांगितले...

“सर... यांना गर्लचे स्पेलिंग येत नाही...” अस्सा राग आला मला... पण बसलो शांत.

“अरे येड्यांनो... बाकी काही आले नसते तरी चालले असते रे... पण तुमचे तर गर्लशीच वावडे...” अर्थात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातील खोच काही नीटशी समजू शकली नाही.

“चला हात पुढे करा...” चांगल्या सणसणीत दोन छड्या खाल्ल्या आणि जागेवर जाऊन बसलो. माझ्या शेजारी बसणारा संदीप्या हसत होता. खूप राग आला मला त्याचा... आणि तिचा सुद्धा... लगेच ठरवले, परत अशी वेळ येवू द्यायची नाही. तसा संकल्पच केला. घरी आल्या आल्या रॅपीडेक्स इंग्लिश स्पिकिंगचे पुस्तक हातात घेतले. पहिले दोन तीन पाने वाचून झाली आणि इंग्रजीतले काळ माझ्या पुढे काळ बनून आले. झालं... सगळं अवसान गळालं... अर्थात तो पर्यंत गर्लचं स्पेलिंग मात्र पाठ केलं होतं.

दहावीला रट्टा मारून कसातरी इंग्लिश विषयात काठावर पास झालो. कॉलेजला आलो त्यावेळेस आपण पूर्वी काही संकल्प केला होता हे पूर्णपणे विसरलो होतो. १२वी पास होऊन एफ वायला आलो आणि कॉलेज सुरु झाले. काही दिवसांनी उशिरा प्रवेश घेऊन रुपाली वर्गात दाखल झाली. एकदम पहिल्या नजरेतच आवडली आपल्याला. पण ती इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी असल्याने बऱ्याचश्या वेळेस तिचे संभाषण इंग्रजीतच असे. त्यामुळे पुन्हा एकदा मला माझा संकल्प आठवला आणि अडगळीत टाकलेले रॅपीडेक्स पुन्हा डेस्कवर आले. मग मित्रांबरोबर इंग्रजीत बोलण्याचा सराव सुरु झाला. जवळ जवळ १५/२० दिवस हे सगळे सुरळीत चालू होते पण नंतर तिचे आमच्याच वर्गातील एका मुलाबरोबर अफेअर चालू झाले असे ऐकले आणि मुडच गेला. साला आपले नशीबच पांडू...

त्यानंतर टी वायला आलो. वर्षाअखेरीस तोंडी परीक्षा असते आणि त्या वेळेस बाहेरून येणारे सर इंग्रजीत प्रश्न विचारतात असे मला समजले आणि तोंडचे पाणीच पळाले. मनात म्हटले... ही इंग्रजांची भाषा काय आपल्याला धड जगू देत नाही... पण पर्याय नव्हता. त्यामुळे परत एकदा संकल्पाची आठवण झाली आणि तोंडी परीक्षेच्या ८ दिवस आधी, परत रॅपीडेक्स वर आले. पण या वेळेस मात्र पुस्तकाबरोबर त्याची फाटलेली पाने चिटकवण्यास फेविकॉलही बाहेर काढावा लागला. पुन्हा एकदा परत पहिल्या पासून अभ्यास चालू झाला. कारण फक्त इतकेच होते की जर सरांनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर किमान समजला तर पाहिजे. तोंडी परीक्षेचा दिवस उजाडला. माझा नंबर आला. मी जरा घाबरत घाबरतच सरांपुढे हजर झालो. माझा नंबर खुपच मागे असल्यामुळे आणि वेळही संपत आल्यामुळे सरांनीही अगदी जुजबी प्रश्न शुद्ध मराठीत विचारले आणि आवरते घेतले. झाले... परत एकदा रॅपीडेक्स पुस्तका सारखाच माझा संकल्पही अडगळीत गेला.

नंतर नोकरीच्या वेळेस इंटरव्यू साठी आणि इतर २/३ वेळेस परत संकल्पाची आठवण झाली, पण त्यापलीकडे काहीच घडले नाही. आताही मधून मधून त्याची आठवण येते. खास करून जर कुणी फेसबुकवर इंग्रजीत एखादी पोस्ट टाकली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती मुलगी असेल तर संकल्प आठवतो. मग कधी कधी फक्त लाईक करून तर कधी एखादी कमेंट कॉपीपेस्ट करून वेळ मारून नेतो. पण अजूनही मी हार मानलेली नाही... अजूनही या पूर्ण न झालेल्या संकल्पाला मनातून काढून टाकलेले नाही. आता माझ्याकडे रॅपीडेक्सचे पुस्तक नाहीये, पण त्याची जागा बऱ्याच ebook, VCD English Speaking Cources यांनी घेतलेली आहे. अजूनही मी मधून मधून त्याच्या अभ्यासाला बसतो. पण तितक्यात आठवते की जर आज साईट अपलोड झाली नाही तर पैसे मिळणार नाहीत. म्हणून परत त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कामांचा क्रम लावला जातो आणि नंतर त्या सीडी बाजूलाच पडतात. पुन्हा जेंव्हा कधी संकल्पाची आठवण येईल त्यावेळेस मदतीला धावून येण्यासाठी. अजून तरी हा संकल्प अपूर्णच आहे पण पुढे नक्कीच कधीतरी तो पूर्णत्वास जाईल अशी कुठेतरी एक आशाही आहेच.

Wednesday, 25 July 2018

डोंबारी

खूप दिवसांनी आज जरा मूड लागला होता. टिवल्या बावल्या सोडून मी चक्क पोटापाण्याचा प्रश्न सोडवत होतो... म्हणजे काम करत होतो... तेवढ्यात बाहेर ताशाचा आवाज चालू झाला. आधी साधारण वाटणाऱ्या आवाजाने चांगलाच ठेका धरला. आपसूकच नजर खिडकीतून बाहेर गेली. उन चांगलेच तापले होते. रस्ता नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. प्रत्येक गावाच्या कॉलेज रोडवर दिसणारे चित्र इथेही दिसत होते. तरुण मुले / मुली सुसाट वेगाने गाड्या चालवीत होते. तिथेच रस्त्याच्या कडेला एक डोंबारी बांबूचा त्रिकोण उभारून त्यावर दोरी बांधत होता. वय साधारण पस्तीशीचे असावे. एका बाजूला त्याची बायको आपल्या तान्ह्या बाळाला घेवून उन्हातच बसली होती. त्याचा मोठा मुलगा उभे राहून हातातील ताशावर ठेका धरत लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. बहुतेक तो आठ नऊ वर्षाचा असावा. त्याची लहान बहिण हातात काठी घेऊन आपल्या बापाच्या कामावर नजर ठेवून होती. अगदी काही वेळातच त्याने दोन बांबूचे त्रिकोण उभारून त्यावर दोरी बांधली. एकदा हाताने ती व्यवस्थित पक्की आहे की नाही याची खात्री केली आणि मग आपल्या साडेपाच सहा वर्षे वयाच्या मुलीला त्या दोरीवर चढवले. बॅलन्स सांभाळण्यासाठी हातात काठी दिली आणि त्या मुलीने दोरीवरून चालायला सुरुवात केली.

हे सगळे मी खिडकीतून पहात होतो. आताशा माझे इतर मित्रही माझ्या शेजारी येऊन उभे राहिले. ती मुलगी दोरीच्या मध्यावर आली आणि मग एकाएकी तिचे चालणे थांबले. ताशाचा आवाज जरा जास्तच जोरात येऊ लागला. काही क्षणातच त्या मुलीने त्या दोरीला हेलकावे द्यायला सुरुवात केली. क्षणाक्षणाला दोरीच्या हेलकाव्यांचा वेग वाढतच गेला. इतका वेळ कौतुकाने पहात असलेलो आम्ही, डोळे विस्फारून पाहू लागलो आणि तेवढ्यात माझा एक मित्र अगदी तोंडातल्या तोंडात बोलून गेला...

“आयला... साला थोडी जरी चूक झाली ना....” इतके बोलून त्याने वाक्य अर्धवट सोडले आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एकतर वाहता रस्ता आणि त्यातून भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्या. बरे दोरीच्या हेलकाव्यांचा वेगही बराच. आता मात्र डोके भाणाणले. नाही नाही ते विचार डोक्यात येऊ लागले. तेवढ्यात दुसरा एक मित्र बोलून गेला.

“यार... आपण इतका विचार करतोय पण तिचा बाप मात्र तिथेच उभा राहिलाय. साला त्याला असे जीवघेणे खेळ करायला काय होतंय? या लहान मुलीला काही झाले तर?” अगदी हाच विचार माझ्याही मनात आला. शेवटी आपण त्याला हे बोलायचेच हा विचार करून मी ऑफिसमधून बाहेर पडलो. रस्त्यावर आलो त्यावेळेस ती मुलगी त्या दोरीवर एक सायकलच्या चाकाची रिंग ठेवून त्यावर कसरत करत होती. काही वेळ तिथेच तिच्या कसरती पहात उभा राहिलो. खरे तर तीच्या कसरती पाहण्यापेक्षा जर काही प्रॉब्लेम झाला तर लगेच त्यानुसार हालचाल करणे सोपे जावे हाच मनात हेतू होता. हळूहळू तिथे लोक जमू लागले. अर्थात त्यात शाळेच्या मुलांचीच गर्दी जास्त होती. दोनचार वयस्कर व्यक्तीही होत्या. तेवढ्यात त्या डोंबाऱ्याने त्या मुलीच्या हातात दोन स्टीलच्या डिश दिल्या. काठीच्या आधारे बॅलन्स सांभाळत तिने त्या दोरीवर ठेवल्या आणि त्या डिशमध्ये पाय ठेवून परत तिच्या कसरती चालू झाल्या. इतका वेळ तळपायाने दोरी धरणे शक्य होते पण आता मात्र ते सगळे अशक्यप्राय वाटत होते. ती मुलगी मात्र अगदी निर्भयपणे तिच्या कसरती मन लावून करत होती.

आपण मध्येच काही बोललो आणि ती मुलीचे लक्ष विचलित झाले तर? हा विचार करून मी अगदी शांत उभा राहिलो. जवळपास ५/७ मिनिटात तिचा खेळ संपला आणि त्या डोंबाऱ्याने तिला खाली उतरवले. ती खाली उतरली तशी बरीचशी मंडळी आपापल्या दिशेने निघून गेली. जसे आपण त्या गावचेच नाही. ती मुलगी जेव्हा थाळी घेवून समोर आली त्यावेळेस मी जरासा भानावर आलो. अगदी नकळत हात खिशात गेला. हाताला आलेली नोट थाळीत टाकली. काहीही न बोलता ती मुलगी शेजारच्या व्यक्तीसमोर जाऊन उभी राहिली. एक शब्दही न बोलता जवळपास तिने १०/१२ नोटा गोळा केल्या आणि मग त्या तिच्या आईच्या हातात नेवून दिल्या. तो पर्यंत डोंबारी बांधलेली दोरी सोडून मोकळाही झाला होता.

तेवढ्यात मला आठवले. मी त्या डोंबाऱ्याला बोलायला म्हणून खाली आलो होतो. कोणतीही भीडभाड न बाळगता त्या डोंबाऱ्याजवळ गेलो.

“क्या यार... इतनी छोटी बच्चीसे ऐसे काम करवाते हो?” काहीशा नाराजीने मी म्हटले. त्याने आधी माझ्याकडे पाहिले आणि नंतर फक्त ओशाळल्यासारखे हसला. बोलला काहीच नाही. त्याच्या नजरेतील भाव मात्र मला काही केल्या समजले नाहीत.

“एक छोटीसी गलती भी बहोत भारी पड सकती है...” मी माझे बोलणे चालूच ठेवले. यावरही त्याने काहीही उत्तर दिले नाही. शेवटी मी तरी काय बोलणार? तसाच माघारी वळलो आणि ऑफिसमध्ये आलो. येताना मात्र मनात एक प्रकारचे समाधान होते. मनात आलेली गोष्ट बोलून दाखविल्याचे.

“काय रे... झाली का तुझी समाजसेवा?” एका मित्राने टोमणा मारला. अस्सा राग आला त्याचा.

“साला... तुमच्यासारखे लोकं असतात ना, त्यांचा मला भयंकर राग येतो... स्वतः तर काही करत नाहीतच पण जे दुसरे करतात त्यांनाही टोमणे मारतात.” मी रागात बोलून गेलो. मी भडकलेला पाहून त्याने जरा नमते घेतले.

“अरे पण त्या डोंबाऱ्याला काय म्हणत होतास तू?” त्याने विचारले.

“काय म्हणजे? मी त्याला बोलून टाकले... लहान मुलीकडून असले काम करून घेताना तुला काहीच वाटत नाही का म्हणून...”

“मग? काय म्हणाला तो?” मित्राने विचारले.

“काय बोलणार? गप्पं बसून फक्त माझ्याकडे पाहून विचित्र हसला...” मी वैतागुन उत्तर दिले.

“तुला काही प्रश्न विचारू?” काही वेळ थांबून मित्राने मला विचारले.

“हो... विचार ना...”

“तू त्या लहान मुलीला किती पैसे दिलेस?”

“माहिती नाही... हातात नोट आली ती तिच्या थाळीत टाकली.” मी उत्तर दिले.

“का?”

“अरे एवढीशी पोर ती... दिवसातून किती वेळेस जीवघेणा खेळ करते आपल्या कुटुंबासाठी. आणि तो तिचा बाप... हिला थोड्या थोड्या वेळाने मृत्युच्या खाईत लोटतो. हरामखोर साला... काहीच कसे वाटत नाही त्याला?” मी चिडून बोलत होतो.

“समजा हा खेळ त्या माणसाने केला असता तर तू त्याला इतके पैसे दिले असतेस?” मित्राचा पुढचा प्रश्न आला आणि मी विचारात पडलो. खरंच... दिले असते का मी इतके पैसे?

“अरे बोल ना...” मी काहीच उत्तर देत नाही हे पाहून मित्राने परत विचारले.

“नाही... नसते दिले...” मी प्रामाणिकपणे उत्तर दिले.

“मिळाले उत्तर तुला? तू त्या डोंबाऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे?” मित्र हसत हसत म्हणाला आणि मी गोंधळलो.

“असंच असतं... तो डोंबारी याचमुळे हसला. त्या छोट्या मुलीला असे जीवघेणे खेळ खेळावे लागतात ते तुझ्या सारख्या मानसिकतेच्या लोकांमुळे. मी त्या मुलीला पैसे दिले नाहीत कारण तिला पैसे मिळाले तर ते काम तिला कायमच करावे लागेल म्हणून. ती मोठी झाली की तिची लहान बहिण तिची जागा घेईल. याचाच अर्थ त्या चिमुरड्यांकडून असले जीवघेणे खेळ करून घेतले जातात त्यात तिच्या बापापेक्षा जास्त दोषी तुझ्यासारखे लोकं आहेत. जर हाच खेळ त्या डोंबाऱ्याने केला असता तर मात्र मी त्याला नक्कीच पैसे दिले असते. तू पाहिली ती नाण्याची एक बाजू आणि मी पाहिली ती नाण्याची दुसरी बाजू आहे.” मित्र बोलून गेला आणि मलाच अपराधी वाटू लागले. खरंच काही गोष्टी जशा दिसतात, त्या तशाच असतील असे नाही.

Tuesday, 24 July 2018

फोन

आजकाल माझी कानपूर लाईन जरा विक झालेली आहे. त्यातूनही जर कुणी फोनवर बोलत असेल तर अजून जरा जास्तच. त्यामुळे आजकाल मला माहित नसलेल्या नंबरवरून फोन आला की उगाचच घाबरायला होतं. सगळ्यात पहिली भीती म्हणजे कुणी थकलेले बिल तर मागत नाही ना? ही. अर्थात मी त्या बाबतीत जरा निर्ढावलो आहे. असा फोन आला कि मी सरळ सांगून टाकतो.

“हे पहा... माझ्या स्वतःच्या मालकीची फक्त एक गोष्ट आहे. माझा फोन. पाच वर्षांपूर्वी घेतला तेंव्हा त्याची किंमत अडीच हजार रुपये होती. पाहिजे तर जो पर्यंत मी बिल भरत नाही, तोपर्यंत तुम्ही तो घेऊन जा. बिल भरल्यावर मला परत करा... म्हणजे पैशांचा तकादा लावणाऱ्या लोकांच्या तावडीतून मीही सुटेल आणि माझी वस्तू जप्त करून योग्य कारवाई केली म्हणून तुम्हीही सुटालं... काय?”

माझे हे उत्तर ऐकून खूप जणांनी आता मला फोन करणे सोडले आहे. त्यामुळे ती भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. आता दुसरी भीती म्हणजे समोरची व्यक्ती माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलू लागली तर? अर्थात यासाठी ही मी एक नवीन उपाय शोधला आहे. फोनवर मी “हेल्लो” न म्हणता “रामराम” म्हणतो. अपोआपच समोरची व्यक्ती मराठी किंवा हिंदीत स्वतःच बोलू लागते... हेहेहे... आता उरलेली तिसरी भीती म्हणजे समोरच्या व्यक्तीने बोललेले मला नीट ऐकू आले नाही तर? किंवा नीट समजले नाही तर? या भीतीवर मात्र अजून मला उपाय सापडलेला नाही.

काल असेच झाले. कॉम्प्युटरवर काम चालू होते. ( हो... कधी कधी फेसबुकमधून वेळ मिळाला तर काम देखील करतो मी. ) कामात अगदी तल्लीन झालो होतो आणि इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलवर नजर टाकली. अनोळखी नंबर होता. मनात जरा धडकी भरली. फोन उचलावा कि उचलू नये याचा विचार केला, पण मोबाईलची रिंग काही केल्या बंद होईना. शेवटी धारिष्ट्य केले आणि फोन रिसीव्ह केला. पलीकडून आवाज आला.

“हेल्लो... मिलिंद सर?” कुणीतरी अगदी बारीक आवाजात बोलत होती. म्हणजे ते इतर कुणाला समजू नये म्हणून कुजबुजतात ना... तस्सेच.

“हो... बोलतोय...”

“ते आपलं केलं का?” पलीकडून प्रश्न विचारला गेला. आता या प्रश्नाचा जर संदर्भ माहिती नसेल तर काय काय अर्थ निघू शकतात? त्यातून आवाज असा अगदी बारीक... कुजबुजल्या सारखा. मी गोंधळलो.

“आपलं काही आहे? मग मला कसं नाही माहित?” साला एका पोरीने मला अगदी हळू आवाजात, कुजबुजल्या सारखा, अनोळखी नंबर वरून असा प्रश्न विचारला तर माझा काय समज होणार?

“हो तर... आहेच मुळी... मी आपल्या नेहमीच्या कामाबद्दल विचारते आहे.” तिने तितक्याच हळू आवाजात सांगितले. आता मात्र मी चक्रावलो. खरंच काही वेळेस माणसे असे संदिग्ध का बोलत असावेत?

“नेहमीचे काम? आणि आपण दोघे मिळून करतो?” मी आश्चर्यचकित झालो.

“अहो... हो... आपणाला दोघांना मिळूनच करावे लागते... कुणा एकट्याला शक्य नाहीये...” संभ्रम वाढतच होता.

“काय बोलताय तुम्ही? समजतंय का तुम्हाला?” मी वैतागलो.

“खरे तेच बोलतेय मी... पण तुम्ही असे का विचारीत आहात?” समोरून अगदी थंड आवाजात मला उलट प्रश्न विचारला गेला. शेवटी मनात म्हटलं नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.

“हेल्लो... तुम्ही कोण बोलताहेत ते सांगता का?” शक्य तितक्या सौम्य आवाजात मी विचारले.

“मी प्रिया बोलतेय... xxx कंपनी मधून... माझा आवाज नाही का ओळखला तुम्ही?” तिने असे सांगितले आणि मग माझी ट्यूब पेटली. माझ्या क्लाईन्टच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या म्याडमचा तो फोन होता. आणि त्या म्हणाल्या तसे आम्हाला दोघांना मिळूनच काम करावे लागत होते. साईटवर काय अपडेट करायचे हे त्या सांगत होत्या आणि मी ते बदल करत होतो.

“ओके ओके म्याडम... मेल पाहतो आणि चेंजेस करतो...” असे म्हटले आणि फोन ठेवला. एरवी अशा लहानसहान गोष्टी मी मनावर घेत नाही पण काल मात्र ठरवले, म्याडमसोबत याबद्दल बोलायचेच.

संध्याकाळची वेळ होती. मी म्याडमच्या ऑफिसला पोहोचलो. मी सहसा काम असल्याशिवाय जात नाही त्यामुळे मला पाहून तिथे काम करणाऱ्या स्मिता म्याडमने मला येण्याचे कारण विचारले.

“बोला सर... काय काम आहे?”

“प्रिया म्याडमला भेटायचे आहे.” मी उत्तर दिले.

“ती बँकेत गेली आहे. येईलच १० मिनिटात... मी काही मदत करू शकते का?” त्यांनी आदबीने विचारले.

“नाही... खाजगी काम आहे त्यांच्याकडेच... मी वाट पहातो.” आता खाजगी काम म्हटल्या बरोबर स्मिता म्याडमची उत्सुकता ताणली गेली.

“काही विशेष?” त्यांनी जरासे बिचकत बिचकत विचारले.

“हो... त्यांना एक गोष्ट विचारायची आहे.” मी उत्तर दिले. तितक्यात प्रिया म्याडम तिथे आल्या. त्यांचा ऑफिस मध्ये प्रवेश होतो न होतो तोच स्मिता म्याडमनी त्यांना ओरडून सांगितले.

“प्रिया... तुला भेटायला सर आलेत. तुझ्याकडे काही खाजगी काम आहे त्यांचे...” हे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील मिश्कील हसू माझ्यापासून लपू शकले नाही. स्मिता म्याडमच्या या वाक्यातील खोचकपणा प्रिया म्याडमच्याही लक्षात आला. त्यांनी डोळ्यांनीच स्मिता म्याडमला दटावले.

“बोला सर...”

“एक प्रश्न विचारायचा होता...” मी मुद्दामच जरा हळू आवाजात विचारले.

“हो... विचारा ना...”

“इथे विचारला तर चालेल? जरा खाजगी आहे.” मी सुद्धा आता असेच बोलत होतो ज्याने संभ्रम निर्माण होईल.

“मी बाजूला जाऊ का?” काहीसे मिश्किलपणे स्मिता म्याडमने प्रिया म्याडमला विचारले.

“ए... गप बसं गं...” तिच्याकडे पाहून प्रिया म्याडमने उत्तर दिले. नंतर त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला.

“हे पहा सर... काय विचारायचे ते इथेच विचारा.” त्यांनी जरा मोठ्या आवाजात मला सांगितले.

“पहा हं... तुम्हाला राग तर नाही ना येणार?” मी.

“ते प्रश्न काय आहे त्यावर अवलंबून आहे.” त्यांनी उत्तर दिले.

“ठीक आहे तर. नंतर मला दोष देऊ नका.”

“आता विचारताय की मी सरांना फोन करून सांगू?” त्यांनी मला सरळ सरळ दमच दिला. त्यांचा चेहराही जरासा तापल्यासारखा वाटत होता. आता जास्त ताणने योग्य नव्हते.

“तुम्ही फोनवर इतक्या हळू आवाजात आणि कुजबुजल्या सारखे का बोलतात?” मी माझा प्रश्न विचारला. आधीच त्या बाहेरून वैतागून आल्या होत्या आणि त्यात मी त्यांना असा पांचट प्रश्न विचारला. त्यांचा पारा चढला.

“मी कशीही बोलेन... तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” त्यांनी चिडून विचारले.

“अहो प्रॉब्लेम काय म्हणून काय विचारता? एकतर तुमचा आवाज इतका बारीक आणि नाजूक. माझ्या सारख्याला फोनवर व्यवस्थितपणे तो ऐकू येत नाही. बरे समजा ऐकू आला तरी जर तो ओळखू आला नाही तर तुमच्या बोलण्याचा मला संदर्भच लागत नाही.” मी आता खरे ते सांगितले.

“आज सकाळी देखील तुमचा फोन आला. अनोळखी नंबर वरून आणि तुम्ही म्हणालात काय कि, ‘ते आपलं केलं का?’ आता मला जर तुमचा आवाजच ओळखू आला नाही तर संदर्भ कसा लागणार? आणि संदर्भ लागला नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं?” मी मनातले बोलून टाकले. माझ्या या प्रश्नांवर स्मिता म्याडम मात्र मनसोक्त हसत होत्या. प्रिया म्याडमलाही त्यांचे काय चुकले हे समजून आले.

“तुम्ही माझा आवाज खरंच नाही ओळखला?” प्रिया म्याडमने हसत हसत विचारले.

“अहो... इतक्या हळू आवाजात अमिताभ बच्चन जरी बोलला तरी आपल्याला फोनवर ओळखू येणार नाही...” मी.

“म्हणजे फक्त हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आले होते?” स्मिता म्याडमने मला विचारले.

“हो... बाकी काही नाही... फक्त एवढ्या साठीच...” मी उत्तर दिले.

“अहो सर... मग मला स्पष्ट सांगायचं ना...” प्रिया म्याडम हसत हसत म्हणाल्या.

“अरे वा... असं कसं? तुम्ही हळू बोलतात ते चालतं, तुमचं बोलणं संदर्भ लागला नाही तर समजत नाही हेही चालतं. पण मी मात्र स्पष्ट बोलायचं... वा रे वा... भले बहाद्दर...” मी डायरेक्ट बोलून टाकले आणि मग त्यांच्याकडूनच फुकटचा चहा पिऊन घरी आलो.

आज सकाळी सकाळीच फोन वाजला. मी अर्धवट झोपेत होतो. परत अनोळखी नंबर... फोन उचलला. पलीकडून कुणी मुलगी बोलत होती. आवाज मात्र खूप गोड वाटला फोनवर.

“सर... आज येवू का?”

आयला... आता हे काय नवीन लफडं? पण इतक्या गोड आवाजाला नाही तरी कसे म्हणणार? ‘ये’ म्हणून सांगितलं... पण ती कोण आणि का येणार हे मात्र ती आल्यावरचं समजेल.

Saturday, 21 July 2018

स्वभाव

माझा आजचा स्वभाव आणि काही वर्षांपूर्वीचा स्वभाव यात बराच फरक पडलेला आहे. खास करून जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना तर माझ्यातील हा बदल खास करून जाणवतो. अगदी शुल्लक कारणही मला चिडचिड करण्यासाठी पुरेसं असायचं. हेच नाही तर मी कधी कुणाला चेष्टेत काय बोलून जाईल हे मलाही समजत नव्हतं. ज्यावेळेस लक्षात यायचं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असायची. बरे त्यासाठी माफी मागायची म्हटली तर माझा इगो आड यायचा. या कारणावरून माझे आणि वडिलांचे तर जवळपास दिवसाआड खटके उडत. इतकेच काय तर यासाठी जवळपास ७/८ वेळेस माझी ‘ग्रहशांती’ही केली आहे. पण माझ्यात काहीच फरक पडत नव्हता. घरचेही काहीसे वैतागले होते. त्यात काही जणांनी माझ्या आईला सांगितले की, तो वृश्चिक राशीचा असल्यामुळे त्याच्यात बदल होणे खूप कठीण आहे. त्यामुळे तिनेही आधी त्यावर विश्वास ठेऊन मला सुधारण्याचा प्रयत्न काहीसा पुढे ढकलला.

माझे कॉलेज संपले आणि आम्ही नाशिकला आलो. इथेही माझ्या वागण्यात फारसा फरक पडला नव्हता. पण नोकरीला लागल्यामुळे माझे घरात थांबणे कमी झाले होते. त्यातच माझ्या हाती शरद उपाध्ये सरांचे ‘राशीचक्र’ नावाचे पुस्तक आले. जोपर्यंत इतर राशींची स्वभाववैशिष्ट्ये वाचत होतो, पुस्तक छान वाटत होते. पण वृश्चिक राशीची सुरुवात झाली आणि माझी अस्वस्थता वाढू लागली. त्याचा भडका उडाला तो त्या पुस्तकातील एक वाक्य वाचून. त्यात असे वाक्य होते की, ‘मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा खूप क्रूर ग्रह असल्यामुळे या राशीमध्ये जन्मणारे लोकं धाडसी वृत्तीचे असतात. त्यातील मेष राशीचा व्यक्ती पोलीस असेल तर वृश्चिक राशीचा व्यक्ती गुंड किंवा अतिरेकी असतो.’ माझे डोके फिरायला इतके कारणही पुरेसे होते. माझ्यात असा अचानक झालेला बदल आईच्या लक्षात आला.

“काय रे? पुस्तक वाचता वाचता इतका का चिडलास?” आईने विचारले.

“मी कशाला चिडू?” अर्थात हे शब्दही मी चिडूनच उच्चारले होते त्यामुळे आईला हसू आले.

“काय हसतेस?” माझा पुढील प्रश्न आणि तिचे हसणे वाढले.

“तू आधी सांग... काय झाले ते... मग मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईन...” आईने सांगितले.

“अगं या पुस्तकात शरद उपाध्ये बघ काय म्हणताहेत... म्हणे वृश्चिक राशीचे लोकं अतिरेकी असतात. थांब आताच्या आता त्यांना पत्र लिहितो आणि देतो त्यांच्या पत्त्यावर पाठवून... ते असे कसे म्हणू शकतात?” माझा स्वर चिडकाच होता.

“आधी शांत हो... मला एक सांग, समजा तू त्यांना पत्र पाठवून जाब विचारलास आणि त्याचे उत्तर त्यांनी पाठवलेच नाही तर? तुझी चिडचिड अजूनच वाढणार ना? आणि समजा... त्यांनी तुझी अगदी माफी जरी मागितली तरी त्याचा तुला काय उपयोग? फक्त दोन मिनिटाचे समाधान... इतकेच?” आईने प्रश्नांचा भडीमारच केला.. अर्थात तीच्या कोणत्याच प्रश्नांचे उत्तर किमान त्यावेळेस तरी माझ्याकडे नव्हते.

“अगं पण... ते असे कसे म्हणू शकतात?”

“अरे ते त्यांचे मत आहे ना. त्यांना जसे अनुभव आले असतील; त्यावरून त्यांचे मत बनले असू शकतेच ना?”

“तू माझी आई आहेस की त्यांची?” मी जास्तच वैतागलो आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यामुळे तर मी जास्तच भडकलो. शेवटी तिनेच हसू आवरले.

“तुझीच आई आहे म्हणूनच तुला सांगते आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे देशील का?” तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला असे मला वाटले.

“हं...”

“मला सांग... शरद उपाध्ये देव आहेत की माणूस?”

“हा काय प्रश्न झाला? माझ्या दृष्टीने ते माणूस आहेत! अगदी सामान्य माणूस!! अतिसामान्य माणूस..!!!” मी काहीसे रागातच उत्तर दिले.

“बरं... कृष्ण देव आहे की माणूस?” तिचा पुढील प्रश्न.

“तो तर देवमाणूस आहे. काही देव मानतात, काही माणूस... माझ्या दृष्टीने तो देवच.”

“मग मला सांग, कोणी सांगितलेली गोष्ट जास्त महत्वपूर्ण?"

“कुणाची म्हणजे? कृष्णाचीच गोष्ट जास्त महत्वपूर्ण आहे.”

“ऐक तर मग, शरद उपाध्ये त्यांच्या पुस्तकात लिहितात की, माणूस त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागतो. पण गीतेत कृष्ण सांगतात की माणसाचे कर्म त्याच्या हातात आहे. जर प्रत्येक राशीचे व्यक्ती त्यांच्या राशीनुसार वागले असते तर त्यांना ओळखणे किती सोपे झाले असते? पण तसे घडते का? नाही ना? म्हणजेच स्वभाव बदलणे माणसाच्याच हाती आहे. ज्यावेळेस त्याला स्वतःला बदलायचे नसते; त्यावेळेस तो कोणते तरी कारण शोधत असतो. त्यातलेच एक प्रमुख कारण म्हणजे राशीस्वभाव. प्रत्येक राशींची काही ठळक वैशिष्ट्ये असतात असे राशीचक्र सांगते; पण ती पूर्णपणे बदलणे आपल्या हातात असते असे गीतेत सांगितले आहे. तुला जर इतकेच वाईट वाटत असेल तर तू ‘त्या पुस्तकाला’ खोटे ठरव की. त्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या अगदी विरुद्ध वर्तन करून. मला माहिती आहे. ही गोष्ट बोलायला सोपी असली तरी कृतीत उतरवणे अवघड आहे. पण हेच तर तुला करायचे आहे. लेखकाची माफी तुला क्षणाचे समाधान देईल. पण तुझे वागणे तुला कायम साथ देणारे मित्र मिळवून देईल. उद्या मी असेल, नसेल पण तुझे मित्र आणि तुझा स्वभाव कायम तुझ्यासोबत असेल.” आई सांगत होती आणि मी फक्त ऐकत होतो.

त्यानंतर काहीही झाले तरी चिडायचे नाही हे मी ठरवले. कितीही विरोध असला तरी शब्द वापरताना काळजीपूर्वक वापरायला लागलो. ज्या ज्या वेळेस मला राग यायचा, आई फक्त एकच शब्द उच्चारायची... ‘स्वभाव...’ त्यानंतर माझ्या वागण्यात बराच बदल होत गेला. याचे सगळे श्रेय आईलाच. माझा स्वभाव पूर्णतः बदलण्यासाठी जवळपास ३ ते ४ वर्ष लागले. या काळात ती मला कायम कधी गीतेतील, कधी भागवतातील, कधी शिवपुराणातील वेगवेगळ्या कथा सांगून रागाचा परिणाम कसा वाईट होतो आणि चांगले वर्तन कसे उपयोगी पडते हे सांगयची. अनेकदा आम्ही दिवसातून दोन दोन तास गप्पा मारायचो. लोकांना वाटत असेल हे मायलेक काय इतके बोलत असतात? पण आमचे विषय बरेचशे अशा गोष्टींवर असायचे.

आपले संत सांगून गेलेत, ‘वाट दाखवी तो परमगुरु’, आई माझ्यासाठी परमगुरु ठरली. कारण तिने मला माझ्या पुढील जीवनाची वाट दाखवली. मी जरी लोकांची वाट लावणारा असलो तरी माझी आई मात्र वाट दाखवणारी होती हे निर्विवाद सत्य आहे. एक दिवस तर मी तिला विचारलेही होते.

“आई... जर माणसाचा स्वभाव त्याच्या हाती असतो असे गीतेत सांगितले आहे, मग तुम्ही ‘मी लहान असताना’ माझ्या ग्रहांच्या शांती का केल्या होत्या?” खरे तर हा प्रश्न मी मुद्दाम तिला विचारला होता. मला तिला चिडवायचे होते. काय आहे ना... चोर चोरी से जाए पर हेराफेरीसे कैसे जाए?

“कारण त्यावेळेस मी गीता वाचलेली नव्हती. जेंव्हा वाचली तेंव्हा त्याचा सगळ्यात पहिला प्रयोग मी तुझ्यावरच केला. माझ्या मते तू गिनिपिग आहेस... हेहेहे...” तिने हसतच उत्तर दिले आणि मग मलाही हसू आले. काय आहे ना? माझीच आई ती, माझ्यापेक्षा २३ पावसाळे तिने जास्त पहिले आहेत. तिला हेही माहित होते... ‘आपलं पोरगं फार डँबीस आहे. आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय ते काही गप्पं बसायचं नाही.’


कडकलक्ष्मी

प्रत्येक माणसात बऱ्याचदा परस्पर विरोधी गुणधर्म असतात. म्हणजे अनेक धाडसी कृत्य करणारा माणूस पाल किंवा झुरळांना घाबरताना आपल्याला दिसतो. अनेकदा घाबरट म्हणून ओळखला जाणारा मनुष्य धाडसी कृत्य करून जातो. हे का घडते? तर माणूस अनेकदा वेळेनुरूप आपल्यातील क्षमता वापरतो. कित्येकदा तर आपल्यात अशी क्षमता होती हेही अनेकांना माहित नसते.

माझी आई देखील काहीशी अशीच. तिला बोटीत बसायची भीती वाटायची, लिफ्टमध्ये बसायला ती भयंकर घाबरायची. इतकेच काय तर पाल आणि कुत्रे दिसले तरी त्यांच्यापासून १० फुट दूर जायची. पण सगळ्यात भयानक प्राणी... माणूस... याठिकाणी मात्र ती चांगलीच शूर होती. तिच्या मते आपण या प्राण्याला जितके जास्त घाबरतो, तितका हा प्राणी प्रबळ होतो. आणि या प्राण्याला वेळीच आवर घातला नाही तर याचे परिणाम वाईटही होऊ शकतात.

हा किस्सा आहे तिच्या शालेय जीवनातील. त्यावेळेस माझी आई मॅट्रिकला होती. त्यासाठीच तिने नाशिकच्या ‘गायकवाड क्लासेस’ मध्ये प्रवेश घेतला होता. तिला नवनवीन फॅशनची भारी हौस. त्याकाळी “आम्रपाली” हाराची चांगलीच क्रेझ होती. त्यामुळे ती नेहमी तो हार घालूनच क्लासला जायची. तिच्या क्लासमध्ये एक मुलगा होता. तो तिला त्या हारामुळे आम्रपाली म्हणू लागला. इथपर्यंत ठीक होते. आईने त्याकडे दुर्लक्ष केले. पण दिवसेंदिवस त्याची मजल वाढत गेली. आई जिथे दिसेल तिथे तो तिच्यावर शेरे मारू लागला. इतकेच काय पण आई आणि आजी बरोबर कुठे जात असतील तरी त्याची शेरेबाजी चालू झाली. आजी सोबत असल्यामुळे तिला शांत बसणे भाग होते. पण एक दिवस ते आजीच्या लक्षात आले.

“बेबी... तो मुलगा तुझ्या ओळखीचा आहे का?” आजीने विचारले.

“कोणता मुलगा?” खरे तर आईने आधीच त्या मुलाला पाहिले होते.

“तो बघ... त्या मुलांच्या घोळक्यात उभा आहे तो...” त्या मुलाकडे इशारा करत आजीने विचारले.

“नाही गं आई... मी नाही ओळखत त्याला.”

“मग तो तुझ्याकडे पाहून का आम्रपाली म्हणतोय?”

“ते मला काय माहित? आणि माझे नाव काय आम्रपाली आहे का?” आईने वेळ मारून नेली.

“बघ हं... आज मी सोबत असताना देखील तो मुलगा तुला चिडवतोय... उद्या त्याची मजल वाढत जाईल तेंव्हा मात्र हे प्रकरण जास्तच वाढलेले असेल.” आजीने आता तिला सावध केले.

“आई... तू नको उगाच काळजी करत बसू... चल... आपल्याला उशीर होतोय...” म्हणत तिने चालण्याचा वेग वाढवला. पण त्याला योग्य धडा शिकविण्याचे त्याच वेळेस ठरवले.

दुसऱ्या दिवशी जेंव्हा ती क्लासला आली त्यावेळेस ‘तो मुलगा कुठे दिसतोय’ हेच शोधत होती. पण त्या दिवशी तो मुलगा गैरहजर होता. तरीही तिने ही गोष्ट गायकवाड सरांच्या कानावर घालायचे ठरवले. क्लास सुटला तशी ती सरांसमोर हजर झाली.

“सर... माझी एक तक्रार आहे.”

“तक्रार? कशाबद्दल?” सरांनी विचारले.

“आपल्या क्लासला एक मुलगा आहे. तो मला कायम चिडवतो. इतके दिवस मी दुर्लक्ष केले. पण हळूहळू त्याची मजल वाढते आहे. काल माझी आई माझ्या सोबत असताना त्याने शेरेबाजी केली. आणि कित्येकदा क्लासमध्येही तो मला आम्रपाली म्हणून चिडवतो.” आईने एका दमात सगळे सांगून टाकले.

“अस्सं... थोडं आधी तर सांगायचं मला! आताच चांगली कानउघाडणी केली असती त्याची.” सर म्हणाले.

“आज तो आला नाहीये...”

“ठीक आहे... जेंव्हा येईल तेंव्हा मला दाखव तो मुलगा...”

“हो सर... नक्कीच...” इथवर संभाषण थांबले.

दोन तीन दिवसांनी तो मुलगा क्लासला आला. क्लास सुटला तशा मुली बाहेर पडू लागल्या. तेवढ्यात तिला मुलांच्या रांगेतून “आम्रपाली” हा शब्द ऐकू आला. तो इतक्या मोठ्याने होता की सरांनी देखील तो आवाज ऐकला. आईच्या मैत्रिणी बाहेर पडल्या पण आई मात्र दारातच उभी राहिली. सरही तिच्या जवळ येऊन उभे राहिले. सर्व मुली बाहेर पडल्यावर एकेक करून मुले बाहेर पडू लागले. क्लासला एकच दरवाजा असल्यामुळे त्या मुलाला देखील तेथूनच जाणे भाग होते. त्या मुलाने आईला दारात उभे राहिलेली पाहिल्यामुळे तो तोंड लपवत तेथून जाऊ लागला. पण आईचे लक्ष होतेच. तिने त्याच्याकडे बोट दाखवून सरांना सांगितले आणि सरांनी त्याला बाजूला बोलावले. सर्व मुले निघून गेल्यावर सरांनी सुरुवात केली.

“काय रे? नाव काय तुझे?”

त्याने नाव सांगितले.

“तू इथे मुलींना चिडविण्यासाठी येतो की पास होण्यासाठी?”

“काय झालं सर?” त्या मुलाने आपल्याला काहीच माहिती नाही अशा अविर्भावात विचारले आणि सरांनी कोणताही विचार न करता त्याच्या श्रीमुखात भडकवली.

“हे बघ... तू किंवा तुझ्या मित्रांपैकी कुणीही कोणत्याही मुलीला इथे किंवा बाहेरही चिडवले किंवा त्यांच्यावर काही शेरेबाजी केली तर सगळ्यांना हाताला धरून बाहेर काढेन. मला गरज नाही अशा विद्यार्थ्यांची. माझ्या विद्यार्थिनींच्या बाबतीत अशी कोणतीच गोष्ट मी खपवून घेणार नाही. समजलं?” सरांनी दम भरला आणि तो मुलगा काही न बोलता तेथून चालता झाला.

त्यानंतर जो पर्यंत क्लास चालू होता कुणीही आईला चिडविण्याची हिंमत केली नाही.

एक दिवस आई तिच्या मैत्रिणींबरोबर जात असताना पुन्हा “आम्रपाली” म्हणून आवाज आला. आईने पाहिले तेंव्हा तो मुलगा त्याच्या एका मित्राबरोबर गल्लीच्या कडेला उभा राहून हसत होता. क्लास संपल्यामुळे सरांचा धाकही संपला होता. आवाजाबरोबर आई थांबली तशा तिच्या मैत्रिणी तिला ‘चल इथून’ असे म्हणू लागल्या. पण आई तशीच वळली आणि त्या मुलाच्या समोर जाऊन उभी राहिली.

“तू मगच्या आळीत गायधनी वाड्यात राहतोस ना? तुझी आईही भद्रकाली मंदिरात दर्शनाला येत असते. जर तू सुधारला नाहीस तर या गोष्टी तुझ्या आईला जाऊन सांगेन. समजलास?” इतके बोलून त्याच्या प्रत्युत्तराची वाटही न पाहता ती मागे वळली.

दोन तीन दिवसांनी परत त्याच रस्त्याने माझी आई तिच्या मैत्रिणींबरोबर जात असताना तिला तो मुलगा २/३ मित्रांबरोबर गप्पा मारताना दिसला. तेवढ्यात त्याच्या एका मित्राने तिला पुन्हा “आम्रपाली” म्हणून चिडवले.

“ए भो... ती आम्रपाली नाही... कडकलक्ष्मी आहे. बोलाल तुम्ही आणि घरच्यांचा मार खाईन मी...” आईने काही बोलण्याच्या आधीच त्या मुलाने मित्रांना गप्पं केले आणि आईच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आणि तिच्या मैत्रिणींना मात्र माझ्या आईला चिडविण्यासाठी एक नवीन नाव मिळाले... कडकलक्ष्मी...

काळ कोणताही असो, किशोर वयात मुलींना मुलांच्या अशा शेरेबाजीला नेहमीच सामोरे जावे लागते. अशी शेरेबाजी सुरुवातीला अगदीच सौम्य आणि साधी वाटते. पण याला वेळीच आवर घातला नाही तर मात्र याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

पती परमेश्वर

सध्याच्या काळातील माझ्या आईचे आवडते चित्रपट म्हणजे ‘हम आपके है कौन’ आणि ‘कभी ख़ुशी कभी गम’. हम आपके चित्रपटाबद्दल मी समजू शकतो पण मला नेहमी प्रश्न पडायचा, अशी कोणती गोष्ट असेल ज्यामुळे ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपट तिला आवडला असावा? 

“आई... तुला ‘कभी ख़ुशी कभी गम’ हा चित्रपट इतका का आवडतो?” शेवटी एक दिवस मी तिला विचारलेच.

“अरे चांगला आहे की चित्रपट...” तिने मोघम उत्तर दिले. 

“नाही... काहीतरी खास गोष्ट नक्कीच असणार.” मी मुद्द्याला चिकटूनच राहिलो.

“खरं सांगायचं तर मला त्या चित्रपटातील जया भादुरीचे व्यक्तिमत्व आवडते.”

“का? काय खास आहे त्यात?”

“खास म्हणजे... ती अमिताभला चक्क सांगते... ‘पती कितनी गलती करता है, परमेश्वर तो गलती नही करता, फिर पती परमेश्वर कैसे हुवा?’ आणि अमिताभकडे तिच्या या प्रश्नाला उत्तर नसते.” तिने सांगितले आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

“काय रे? का हसलास?” तिने विचारले.

“का म्हणजे काय? तू इतकी धार्मिक पुस्तके वाचतेस आणि तरी म्हणतेस की पती परमेश्वर नसतो म्हणून?” 

“हो... नसतोच मुळी. इतकेच काय पण जे लोक स्त्री कडून अशी अपेक्षा करतात ते फक्त पुरुषप्रधान संस्कृतीचा टेंभा मिरवण्याचा प्रयत्न करतात.” तिने ठासून सांगितले.

“आयला... असं कसं?” मी बुचकळ्यात पडलो.

“असंच आहे. थांब तुला याबद्दलचाच एक किस्सा सांगते.” तिने म्हटले आणि मी कान देऊन ऐकू लागलो. कारण तिची कोणत्याही गोष्टी सांगण्याची कला अगदी अफलातून होती. 

“तुला बाबाजी तर माहितीच आहेत. त्यांच्या एक सेवेकरी होत्या. सीताबाई नावाच्या.”

“हो... तुझ्या बोलण्यात अनेकदा त्यांचा उल्लेख आला आहे.” मी म्हटले आणि आईने किस्सा सांगायला सुरुवात केली.

“हा किस्सा आहे सीताबाईच्या सुनेचा... विमल वहिनींचा. सीताबाई जरी बाबाजींची सेवा करीत असल्या तरी त्या स्वभावाने खूप तामसी होत्या. त्यांचा मुलगा तर कहरच. बाई, बाटली आणि जुगार ही तिन्ही व्यसने त्याला होती. त्याची बायको मात्र खूप साधी, सोज्वळ आणि शांत. दर चार सहा दिवसांनी तो दारू पिवून यायचा आणि विमल वहिनींना मारझोड करायचा. तसे सीताबाईनी त्याला बऱ्याचदा समजावले होते. दोन चार वेळेस बाबाजींनी त्याला धाकही दाखवला पण त्याच्यात काहीही फरक पडला नाही. त्यामुळे विमल वहिनी मात्र खूपच दुःखी असायच्या. एक दिवस मी शाळेतून घरी येत असताना रस्त्यातच त्या भेटल्या. खूप आनंदात होत्या. पहिल्यांदाच मी त्यांना मनमोकळेपणाने हसताना पाहिले.”

---------------

“बेबी... चल पिक्चरला जाऊ आपण.” वहिनींनी म्हटले.

“पिक्चरला? पण माझ्याकडे तर पैसे नाहीयेत.” मी सांगितले.

“अगं... बाबांनी दिले आहेत दोघींचेही पैसे... त्यांनीच सांगितले तुला बरोबर घेऊन जायला.”

“ठीक आहे. पण तुम्हाला माझ्या बरोबर घरी यावे लागेल. आईची परवानगी काढण्यासाठी. कारण मी पिक्चरचे नाव काढले तरी ती भडकेल. तुम्ही विचारले तर मात्र नक्कीच परवानगी देईल.”

“चल तर मग...” विमल वहिनी आणि मी घरी गेलो. आता बाबांनीच पैसे दिले म्हटल्यावर आईने परवानगी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. त्या दिवशी आम्ही पिक्चर पाहिला. हॉटेलात गेलो. मनसोक्त हिंडलो. विमल वहिनी खूप बोलक्या स्वभावाच्या आहेत हे त्या दिवशी मला समजले.

“वहिनी एक विचारू?” 

“हो... विचार की...”

“आज तुम्ही इतक्या आनंदांत कशा?”

“कारण आज मी मोकळी होणार आहे. सगळ्या बंधनातून. आणि यापुढे मी माझ्यासाठी जगणार आहे.” त्यांनी सांगितले.

“म्हणजे?” मी बुचकळ्यात पडले.

“म्हणजे आज संध्याकाळीच मी माहेरी जाणार आहे. कायमची. परत कधीही मी इथे येणार नाही.” त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि मी अवाक् झाले. इतकी शांत आणि साधीभोळी बाई या निर्णयाप्रत जाते हेच माझ्यासाठी खूप आश्चर्याचे होते. 

“वहिनी... हा निर्णय तुम्ही घेतला?” मी विचारले.

“खरे तर हा माझा नाही बाबाजींचा निर्णय म्हणता येईल. त्यांनीच मला सांगितले. तू इथून निघून जा आणि आता यापुढे स्वतःसाठी जग.” वहिनींनी सांगितले आणि मला जास्तच आश्चर्याचा धक्का बसला.

“बाबांनी?”

“हो... काल माझ्या नवऱ्याने पुन्हा एकदा मला मारले आणि मी आज सकाळी बाबांकडे गेले. वाटले त्यांना सगळे सांगावे आणि किमान मन मोकळे करावे. मी त्यांच्यासमोर गेले मात्र आणि त्यांनी म्हटले... ‘और कितना सहेगी तू? वो कभी नही सुधरेगा.’ त्यांनी म्हटले.”

“लेकीन वो मेरा पती है, शायद यही मेरे भाग्य मे लिखा है.” मी बाबांना म्हणाले.

“तेरे नसीब मे सिर्फ उससे शादी करना लिखा था. क्योकी वो तेरे मांबापने कराई थी. उस वक्त तुम्हारे हाथमे कुछ नही था. लेकीन अब ऐसा नही है. जब वो इतनी तकलीफ देता है, फिर भी तू सिर्फ सहती है, इसे नसीब नही कमजोरी कहते है... अब उसे छोड दे और अपने बारे मे सोचना चालू कर. निकल जा इस नरक से. मेरा आशिर्वाद हमेशा तेरे साथ रहेगा.” हे त्यांचे शब्द होते.

“त्यांनीच मला घरी जाण्यासाठीही पैसे दिले आहेत. आणि त्यामुळेच मी आता जी जाणार ती परत कधीही न येण्यासाठीच. तिथे माझे आईवडील आहेतच. पण त्यांच्यावर तरी मी का बोझ बनू? मी माझ्यापुरते कमाऊ शकते. आणि चांगले स्थळ आले तर लग्नही करून मोकळी होणार आहे.” 

--------------------

विमल वहिनींनी जे आईला सांगितलेले ते तिने मला जसेच्या तसे सांगितले.

“आता तूच सांग मला... बाबाजींनी विमल वहिनींना जे सांगितले त्यात काय चूक होते? आणि अशा पतीला परमेश्वर म्हटले तर सैतान कुणाला म्हणावे?” आईने मला प्रश्न केला. अर्थात मी तरी काय बोलणार यावर?

“खरंय आई... शेवटी पती असला तरी तो माणूसच असतो आणि माणसात चांगुलपणा आणि वाईटपणा असणारच. त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याशी जसे वर्तन करेल तसेच त्याला उत्तर द्यावे लागणार. तू म्हणते ते काही खोटे नाही. पती बिलकुल परमेश्वर असत नाही.”

भोंदूगिरी

बऱ्याच वेळेस बाबाजी आप्पांशी ( माझे आजोबा ) गप्पा मारण्यासाठी घरी यायचे. आप्पा पेन्शनर असल्यामुळे कायम घरीच असायचे. त्यामुळे मग त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी बाबाजीही येऊन बसत. तसा आप्पांचा देवावरील विश्वास असून नसून सारखाच. त्यांचा बाबा, बुवांवर किंवा भविष्यावरही फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे बाबाजींशी त्यांच्या गप्पाही अगदी जनरल असायच्या. इतकेच काय पण आप्पांनी त्यांना नमस्कार केलेलाही माझ्या आईच्या तोंडून मी कधी ऐकले नाही. आप्पांनी कधी बाबाजींना त्यांचे कुळ / मूळ विचारले नाही आणि बाबाजींनीही कधी ते सांगितले नाही. आप्पांना बाबाजी ‘मास्टरजी’ म्हणत. 

बहुतेक ते वर्ष असावे १९७२. त्या दिवशीही बाबाजी असेच घरी आले होते. वेळ सकाळी साडेअकरा बाराची असावी. आईची शाळा सुटली आणि ती अगदी घाईतच घरात आली. घरात बाबाजी बसलेच होते. बाबाजींना पाहताच तिने त्यांना नमस्कार केला. त्यांनीही लगेच तिला प्रती नमस्कार केला. बाबाजींनी कधीच माझ्या आईचा नमस्कार स्वीकारला नाही. त्याचे कारण मात्र तिला कधीच समजले नाही. 

“आई... मला आधी काहीतरी खायला दे... खूप घाई आहे...” आईने आजीला सांगितले.

“क्यू महारानी... इतनी जल्दी क्या है?” बाबांजींनी विचारले.

“बाबा... भद्रकाली मंदिरात गजानन महाराज आले आहेत. त्यांच्याच दर्शनाला जायचे आहे.” आईने घाईतच सांगितले.

“यहां गजानन आया है?” बाबाजींनी आश्चर्याने विचारले.

“हो... बाबाजी... आताच माझी मैत्रीण भेटली होती. तिने सांगितले मला...” आईने सांगितले आणि बाबाजींनी अगदी क्षणभरच डोळे मिटले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

“बाबा... का हसताय तुम्ही?” आईने विचारले.

“महारानी... मत जाव वहां... वो कोई गजानन नही है. एक छोटा बच्चा है, जो न ठीक से बोल पाता है, ना चल पाता है...” बाबांजींनी सांगितले.

“नाही बाबा... आम्ही सगळ्या मैत्रिणी जाणार आहेत दर्शनाला...” आईने तिचा निर्णय सांगितला.

“ठीक है... जाव... वैसे भी वो कल चला जायेगा...” काहीसे शून्यात पहात बाबाजी म्हणाले आणि परत त्यांनी आप्पांशी गप्पा मारायला सुरुवात केली.

आईने जेवण उरकले आणि ठरल्या वेळी सगळ्या मैत्रिणी भद्रकाली मंदिरात गजानन महाराजांच्या दर्शनाला हजर झाल्या. मंदिरात गजानन महाराज म्हणून आलेला लहान मुलगा अगदीच खुळा दिसत होता. त्याच्या गळ्यात ३/४ फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. दर्शनाला लोकांनी दोन रांगा लावल्या होत्या. प्रत्येक जण त्या मुलाच्या पायावर डोके ठेवत होते. त्याला फुलांची माळ घालून, नमस्कार करून बाजूला होत होते. त्यातील अनेक जण तिथेच जवळ ठेवलेल्या तबकात आपापल्या इच्छेनुसार पैसे टाकत होते. त्याच्या बाजूलाच त्याचे वडील बसले होते. मुलाच्या गळ्यात घातले जाणारे हार काढून ते बाजूला ठेवत होते. तो मुलगा फक्त खुळ्यासारखे डोके हलवत होता. आईचा नंबर आला. तिनेही त्या मुलाच्या पायावर डोके ठेवले. मनोभावे नमस्कार केला आणि घरी आली. तो पर्यंत बाबाजी निघून गेले होते.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आई शाळेत गेली. तेथील शिक्षिका एकमेकीत गप्पा मारत होत्या. 

“अहो... गजानन महाराज तर अजून ३ दिवस राहणार होते ना? मग असे अचानक कसे काय निघून गेले?” एकीने विचारले. 

“अहो बाई... असे लोक त्यांच्या मनाचे राजे असतात. त्यांच्या मनात कधी काय येईल हे काय सांगावे? जाऊ द्या... मी कालच त्यांचे दर्शन घेऊन आले म्हणून बरे झाले बाई... सुदैवच म्हणायचं माझं.” दुसरी शिक्षिका म्हणाली. ते ऐकून आईला बाबाजींचे शब्द आठवले. 

दुपारी आई शाळा सुटून घरी आली त्यावेळेस बाबाजी बसलेच होते. 

“क्यू महारानी... आज नही जाना गजाननका दर्शन लेने?” त्यांनी आई दारात असतानाच तिला विचारले.

“बाबा... ते काल रात्रीच निघून गेले...” आईने सांगितले आणि बाबाजींनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आप्पांनी मात्र कुतूहल म्हणून त्यांना याबद्दल विचारले.

“मास्टरजी... वो कोई गजानन नही है ! छोटा बिमार बच्चा है, और उसका इलाज हो सके, इसलिये उसके बापने उसे गजानन बनाया है. जब से वो गजानन बना है, अच्छी कमाई हो रही है. कल मैनेही दो लोगोंको उसके यहां भेजा था, और उसको मेरे यहां बुलाया. पहेले तो उसने अनाकानी की, लेकीन रात मे दोनो आये थे... फिर मैने ही उस आदमी से कहा, ‘अबतक जितना मिला है उतनेमे ही संतोष कर और अपने बच्चे का इलाज करा. कल अगर तुम दोनो यहां रुके तो मै खुद वहां आ जाऊंगा... और हां... तुने ऐसे ही लोगोंको ठगने का काम चालू रखा तो तुझे पैसा तो मिलेगा, लेकीन तेरा बेटा कभीभी ठीक नही हो पायेगा...’ शायद मेरी बात उसके समझ मे आ गयी और वो रात को ही यहां से चले गये.” बाबाजींनी सांगितले. त्यानंतर ते आईकडे वळले.

“महारानी... किसी भी मंदिरमे भगवान के सामने सर झुकाओगी, तो वो भी नमस्कार गजाननको मिल जायेगा... ऐसे भोंदू लोग तो हर ढाई तीन साल बाद मिल ही जाएंगे... लेकीन किसपर कितना विश्वास करना है इसका निर्णय तो तुम्हे ही लेना होगा. और वो भी अपना दिमाग खुला रखकर...”

या घटनेने एक गोष्ट मात्र झाली. कितीही प्रसिद्ध बाबा, बुवा, स्वामी असले तरीही माझ्या आईने एका ठराविक मर्यादेपर्यंतच त्यांचा सन्मान केला. पण ती त्यांच्या आहारी कधीही गेली नाही. तिच्या मते शोषण करणाऱ्या पेक्षा आंधळा विश्वास ठेवून शोषण करून घेणारा जास्त दोषी असतो.

वचनपूर्ती

माझ्या आईला एक सवय होती. एक तारखेला माझ्या वडिलांचा पगार होण्याच्या आधी तिची महिनाभरात लागणाऱ्या वस्तूंची आणि खर्चाची यादी तयार असायची. पैसा हातातही आलेला नसायचा आणि तिची वाटणी पूर्ण झालेली असायची. बरे एकदा का वाटणी झाली, की मग ती रक्कम त्याच खर्चासाठी वापरली जायची. त्यात सहसा बदल झालेला मला तरी आठवत नाही. अपवाद फक्त तिला महिन्याला तिच्या खर्चासाठी मिळणाऱ्या पैशांचा. ते पैसे कधी तृप्ती कधी मकरंद तर कधी मी, आमच्यासाठीच राखीव असल्यासारखे होते. 

तिची तीच सवय बरीचशी माझ्यातही आलेली आहे. भले पैसे कितीही असोत. ते ज्यासाठी ठरवले आहेत त्यासाठीच खर्च करायचे हेच मी करत आलो आहे. पण ही सवय तिला काय किंवा मला काय, उपजत नव्हती. त्यासाठी तिच्या आयुष्यात घडलेली एक घटना कारणीभूत होती. तीच घटना आज इथे सांगणार आहे.

माझ्या आईला चित्रपट पाहण्याचा खूपच नाद होता. अगदी नोकरी करत असताना आणि नसतानाही. हातात पैसे आले की त्यातील बरेच पैसे तिचे चित्रपटाच्या तिकिटातच खर्च होत. त्यावेळेस नाशिकमध्ये चित्रपटाचे तिकीट दर होते १ रुपया दहा पैसे. 

त्या दिवशी गुरुपोर्णिमा होती. आईची शाळा साडेअकरा वाजता सुटली. तिच्या पर्समध्ये एक रुपया होता. तिने मनात ठरवले की आधी बाबाजींकडे जावे. त्यांना दक्षिणा म्हणून हा एक रुपया द्यावा आणि मग घरी जावे. तिने शाळेच्या पायऱ्या उतरल्या आणि तेवढ्यात तिला तिची मैत्रीण मंगल मावशी भेटली.

“अगं तुझ्याकडेच येत होते मी...” मंगल मावशी म्हणाली.

“का?” आईने विचारले.

“अगं... दामोदरला राजेश खन्नाचा पिक्चर लागलाय... चल जाऊ...”

“नाही गं... एकतर माझ्याकडे फक्त एक रुपया आहे. आणि तो मला बाबाजींना द्यायचा आहे.” आईने असमर्थता दर्शवली.

“ए... काय गं तू पण? बाबाजींना तू नंतर दे पैसे. तसेही तू त्यांना कुठे कबुल केले आहेस? माझ्याकडे माझ्या तिकिटाचे पैसे आहेत. उरला प्रश्न फक्त १० पैश्यांचा. ते माझ्या मावशीकडून घेऊ... चल...” मंगल मावशीने म्हटले आणि आईच्या मनात आले. ‘खरंच... बाबाजींना काय माहित असणार? आपण उद्या परवा देऊ त्यांना पैसे आणि आज पिक्चर पाहून येऊ.’ 

“बरं... चल... फक्त आधी घरी जाऊन आईला सांगावे लागेल.” आई तयार झाली. दोघीही आजीला सांगण्यासाठी घरी निघाल्या आणि वाटेतच कुठूनशे बाबाजी त्यांच्यासमोर दत्त म्हणून हजर झाले.

“महारानी... मेरा पैसा देव...” त्यांनी हसत म्हटले. त्यांना समोर पाहताच आई गोंधळली. तिला काय बोलावे हेच समजेना. तसेही तिने फक्त मनात ठरवले होते. प्रत्यक्षात ती असे काही म्हणाली नव्हती.

“क्यू... तुमको चित्र देखने जाना है?” बाबाजींनी पुढचा प्रश्न केला.

“हो बाबाजी...” काहीशा नापसंतीनेच तिने सांगितले.

“मुझे वो कूछ पता नही... मुझे मेरा पैसा दो...” बाबाजींनी आपले टुमणे चालूच ठेवले. मंगल मावशी तर अगदी गप्पच होती. शेवटी आईने एकदा मंगल मावशीकडे पाहिले आणि अगदी नाखुषीनेच पर्स मधून १ रुपया काढून बाबाजींच्या हातात दिला.

“क्यू महारानी... नाराज हो?” बाबाजींनी विचारले.

“नाही बाबाजी...” आईने म्हटले. बाबाजींनी खिशात हात घातला. खिशातून १० पैसे काढले आणि १ रुपया १० पैसे आईच्या हातात ठेवले.

“लो... मुझे मेरा पैसा मिल गया, अब ये तुम्हारे लिए... जावो चित्र देखो... लेकीन एक बात हमेशा याद रखो. अगर किसीको कुछ कबूल करो तो उसे निभाओ... बात बहोत छोटी है, पर है बडे कामकी... जावो...” असे म्हणत बाबाजी जसे अचानक आले तसेच अचानक निघूनही गेले. 

त्या दिवसांपासून आईला ही सवय लागली. आणि तिने सांगितलेल्या या घटनेने माझ्यातही ती सवय हळूहळू रुजली. अर्थात मला प्रत्येक वेळेस असे करणे शक्यच होते असे नाही. पण तरीही माझा प्रयत्न मात्र तोच असतो. जी गोष्ट ज्याला कबूल केली, ती त्याला द्यायचीच. प्रसंगी आपल्या फायद्याशी तडजोड करावी लागली तरी चालेल पण वचनपूर्ती झालीच पाहिजे.

शिवाशिव

माझी आई खूप धार्मिक होती. पण जेंव्हापासून मला समजायला लागले तेंव्हापासून मी तिला कधीही सोवळेओवळे पाळताना पाहिले नाही. इतकेच काय पण आमच्या घरी गौरीचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच झाला पाहिजे असेही काही बंधन नव्हते. गौरीची सवाष्णही ब्राम्हणेतर असायची. लहान असताना तर काही समजायचे नाही. पण जसजसा मोठा होत गेलो. हळूहळू एकेक गोष्टी समजत गेल्या आणि एक दिवस मी आईला विचारलेच. 

“तू इतका देवधर्म करतेस, तरी तू सोवळेओवळे पाळत नाहीस... असे का?”

त्यावर तिने तिच्या तरुणपणातला एक किस्सा सांगितला. पूर्वी बऱ्याच ठिकाणी चार दिवसांची शिवाशिव पाळली जात होती. माझे आजोळही याला अपवाद नव्हते. त्यावेळेस नाशिकमध्ये हनुमान बाबा ( बाबाजी ) नावाचे एक अवलिया पुरुष रहात होते. ते फक्त पाच घरी भिक्षा मागत. त्या पाच घरांमध्ये माझे आजोळही येत होते. कित्येक वेळेस बाबाजी घरात येत. एक दिवस असेच ते घरी आले त्यावेळेस त्यांना बाहेरच्या खोलीत एक चादर अंथरलेली दिसली. त्यामुळे त्यांनी लगेच त्यावरच फतकल मारली. माझी आजी स्वयंपाकघरात होती. बाबाजींची चाहूल लागताच ती बाहेरच्या खोलीत आली. तिला बाजूला अंथरलेल्या चादरीवर बाबाजी बसलेले दिसले. ती चादर माझ्या आईच्या चार दिवसांसाठी अंथरलेली होती, आणि त्यावरच बाबाजी बसल्यामुळे माझी आजी गोंधळली. मनातून बरीचशी घाबरली देखील. 

“बाबाजी... वहां मत बैठो...” काहीसे घाबरतच तिने बाबांजींना सांगितले.

“क्यू महारानी?” त्यांनी प्रश्न केला.

“वो... बेबीके लिए है...” बाबाजींना ही गोष्ट कशी सांगायची म्हणून तिने मोघम उत्तर दिले. पण आजीच्या चेहऱ्यावरील भाव बाबाजींनी ओळखले. आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

“क्यू... मै क्यू नही बैठ सकता?” त्यांनी उलट प्रश्न केला. पण त्यावर काय बोलावे हेच आजीला समजेना. त्यामुळे ती गप्पंच बसली. आजी काहीच बोलत नाही हे पाहून बाबाजींनीच सुरुवात केली.

“देखो महारानी... मै ये कूछ नही मानता. भगवान का बनाया हुवा ये शरीरधर्म है, फिर ये गलत कैसे हुवा? मेरी मानो तो तुम भी ये कुछ मत मानो...”

बाबाजींच्या या बोलण्यावर आजी तरी काय बोलणार? काही वेळ बाबाजी बसले, चहा घेतला आणि जसे अचानक आले तसेच निघूनही गेले. काही वेळाने आई घरी आली. आजीने सगळा किस्सा तिला सांगितला. 

“बघ आई... आता तर बाबाजीही माझ्या बाजूने आहेत. ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्यासाठी अवडंबर का म्हणून?” आईने आजीला प्रश्न केला. 

“हे बघ बेबी... तू मानत नाहीस ते ठीक आहे. पण उद्या तुला सासरी जायचे आहे. ते कसे मिळते काय माहित? समजा तिथे शिवाशिव पाळली जात असेल तर?”

त्यानंतर आईचे लग्न झाले आणि आजी म्हणाली होती तसेच झाले. आमचे घराणे म्हणजे धार्मिक बाबतीत एकदम कट्टर. त्यातून एकत्र कुटुंबपद्धती. माझे वडील सगळ्यात लहान. त्यामुळे तिथे आईला तिची मते चालवणे शक्यच नव्हते. कालांतराने बदलीच्या निमित्ताने वडिलांनी नाशिक सोडले आणि ते आपोआपच विभक्त झाले. त्यानंतर मात्र आईला तिची मते आचरणे जास्त सोपे झाले आणि आमच्या घरातील शिवाशिव हद्दपार झाली. लहान असताना जेंव्हा कधी नाशिकला मोठ्या घरी येत होतो, त्यावेळेस भिंतीच्या कडेला अंथरली जाणारी चादर श्रीरामपूरला आमच्या घरी मात्र कधीच अंथरली गेली नाही. तसेच श्रीरामपूरचे कावळेही कधी आमच्या घरातील स्त्रियांना शिवल्याचे मला स्मरत नाही.

Friday, 20 July 2018

सामाजिक परिणाम

गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात अनेक गोष्टी घडत आहेत. कधी असहिष्णुतेचा मुद्दा तर कधी मंदिरात महिलांना केला जाणारा मज्जाव तर कधी इतर अनेक राजकीय नाट्य. एकंदरीत काय तर आपला समाज ‘जिवंत’ असल्याचे पदोपदी जाणवते आहे. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनेत एक घटना अशीही होती की त्याबद्दल बरीच उलट सुलट चर्चा झाली. प्रत्येकाने आपले मत मांडले पण त्याचा परिणाम मात्र समाजातील काही घटकांवर जास्तच झाला. ती घटना म्हणजे अनेक वर्षांपासून चालू असलेल्या खटल्यातून झालेली सलमान खान याची सुटका.

खरे तर माझ्या मते सलमान खान निर्दोष सुटणे ही गोष्ट कायदेशीर बाब आहे. सलमान गाडी चालवत होता का? त्यावेळेस तो दारूच्या नशेत होता का? गाडीचा अपघात हा टायर फुटल्यामुळे झाला की संतुलन सुटल्यामुळे? तपास यंत्रणेने योग्य तपास केला का? असे अनेक प्रश्न या केसमुळे उपस्थित झाले. पोलीस यंत्रणेने तपास करून सलमानवर खटला दाखल केला. त्यानंतर एका न्यायालयात त्याला दोषी ठरवले गेले. वरच्या न्यायालयात त्याला निर्दोषही ठरवले गेले. आता सरकार त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात देखील जावू शकेल. पण तिथेही न्याय मिळेल का? मिळेल तर कुणाला? माझ्या मते हे अपयश तपास यंत्रणेचे आणि तपासात राहिलेल्या त्रुटींचे आहे. पण मला त्यावर भाष्य करायचे नाहीये. कारण या खटल्यातील सगळ्याच गोष्टी मला वर्तमानपत्र आणि न्यूज चँनलवरील बातम्या पाहून समजल्या आहेत. त्यात किती तथ्य आहे हेही मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. मला बोलायचे आहे ते या खटल्याच्या निकालानंतर त्याचा समाजावर झालेल्या परिणामाबद्दल.

परवा एका मित्राकडे गेलो होतो. निघण्याच्या वेळेस तिथेच जवळच राहणारे मनोहर काका भेटले. मनोहर काकांचे वय जवळपास ७०च्या दरम्यान असावे. आम्हाला पाहून काका थांबले. दोन मिनिटे एकमेकांची विचारपूस झाली आणि काका पुढे निघाले. मी आणि मित्र परत आमच्या गप्पात रंगलो. इतक्यात मोठा आवाज झाला. आवाजाच्या दिशेने पाहिले तर एका दुचाकीने काकांना मागून उडवले होते. गाडी चालवणारा १६/१७ वर्षांचा मुलगा असावा. काका ज्या गतीने चालत होते आणि गाडीने त्यांना ज्या पद्धतीने उडवले, त्यावरून चूक सर्वथा त्या गाडी चालकाची होती हे लक्षात येत होते. काकांना जास्त लागले नाही म्हणा... थोडेसे खरचटले. थोड्या अंतरावर तो मुलगा सुद्धा गाडीसहित पडला होता. त्यालाही जास्त लागलेले दिसत नव्हते. काकांच्या हातातील सामान मात्र रस्त्यावर पसरले होते. आम्ही काकांना मदत करण्यासाठी त्यांच्या दिशेने धावलो. मी, माझा मित्र तसेच अजून ३/४ जण काकांचे रस्त्यावर पसरलेले सामान गोळा करायला लागलो. एकदोन जण गाडी उचलून रस्त्याच्या बाजूला घेत होते. काका जसे उठले तसे त्या मुलाजवळ गेले आणि काही विचार न करता त्यांनी त्या मुलाच्या कानाखाली खेचली. त्या पोराने एकदा आजूबाजूला पाहिले आणि त्यानेही मग कोणताही विचार न करता काकांच्या श्रीमुखात भडकवली. आमच्या सगळ्यांसाठी हे मात्र नवीनच होते. एकतर १६/१७ वर्षाचं ते पोर. त्याचीच चूक आणि वरून ही मिजास... आम्ही तिथे पोहोचेपर्यंत घाईघाईत त्याने गाडी गाठली आणि तिथून पसार झाला. आम्ही काकांजवळ जमून त्यांना इतर कुठे जास्त लागले तर नाही ना हे पाहू लागलो. काही वेळातच तो मुलगा एका त्याच्याच वयाच्या मुलाला घेऊन परत तिथे आला. काही जण काकांना पोलिसकेस करा म्हणून सल्ला देत होते. तो मुलगा डायरेक्ट काकांसमोर गाडीसाहित उभा राहिला आणि म्हणाला... ‘सॉरी... लागलं असल तर... पण ते पोलीस केस करायची असेल तर खुशाल करा... पोलीस माझे काहीच वाकडे करू शकणार नाहीत. माझ बाप मला हातही लागू देणार नाही. तुमचा मात्र पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्यात चांगला वेळ जाईल...’ आणि मग चक्क छद्मीपणे हसत अगदी भरधाव वेगाने निघूनही गेला. आम्ही सगळे पुतळे बनलो होतो. मनात म्हटले... आपण पांढरपेशे लोकं... कुठे गुंडांच्या नादी लागणार? परत प्रश्न वेळेचाही येतो. आपल्याकडे आहे का तितका वेळ या सगळ्या गोष्टी करायला? खरे तर माझ्या या पांढरपेशा विचारांची नंतर मला लाजही वाटली. पण मी आता कोडगा झालो आहे. या गोष्टी मी मनावरच घेत नाही. असो...

दोघे तिघे जण मात्र काकांनी पोलीस केस करावी यावर ठाम होते आणि तेवढ्यात एकजण म्हणाला... ‘काका... जाऊ द्या... कुठे चिखलात दगड मारून शिंतोडे अंगावर उडवून घेता? तो सलमान तर राजरोसपणे अपघात करून माणसे मारतो आणि नंतर निर्दोष देखील सुटतो. तुम्हाला तर फक्त खरचटले आहे. पोलीस मनावर सुद्धा घेणार नाहीत तुमची केस. त्यांना काय इतर कामे कमी आहेत? तुम्हाला राग येईल माझ्या बोलण्याचा पण माणसाने व्यावहारिक विचार केला तर तो सुखी राहतो. आपण आता फक्त इतकीच काळजी घ्यायची की आपली मुले अशी कुणाला त्रासदायक ठरणार नाहीत.’

मनात विचार केला... खरंच ती व्यक्ती जे बोलली त्यात काय खोटे होते? सलमान एखाद्या वेळेस निर्दोष असेलही पण त्याच्या निर्दोष सुटण्याने समाजाचे काही प्रमाणात नुकसानच नाही का झाले?

देवत्व

आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्यात मोठा बहुमान कोणता असेल तर देवत्व बहाल करण्याचा. एखाद्याने चांगले कार्य केले की लगेच त्याला देवत्व बहाल केले जाते. पण जर त्या व्यक्तींच्या बाजूने विचार केला तर मात्र हा त्यांच्यावर सगळ्यात मोठा केला गेलेला अन्याय असतो असे मला वाटते. श्रीराम असो वा शिवाजी महाराज, श्रीकृष्ण असो वा बाबासाहेब आंबेडकर. या सगळ्यांना लोकांनी देवत्व बहाल केले आणि मग त्यांचे विचार बाजूलाच पडले असे दुर्दैवाने दिसून येते.

रामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर चांगला मुलगा कसा असावा, चांगला राजा कसा असावा, अगदी एका वस्त्रांनिशी घराबाहेर पडूनही आपल्या कर्तुत्वाने आणि जिद्दीने माणूस अगदी समुद्रावरही सेतू बांधू शकतो हे त्याने दाखवून दिले. पण त्याला देवत्व बहाल केले गेले आणि मग त्याचा पराक्रम, जिद्द, नितीमत्ता, राजनीती हे सगळेच गुण झाकोळले गेले. बरे जे लोकं देवाला मानत नाहीत ते राम किती चांगला राजा होता यापेक्षा तो किती सामान्य पती होता हेच दाखविण्यात धन्यता मानू लागले.

श्रीकृष्णाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने अनेक लढाया केल्या. त्याला पराजय काय असतो हेच माहिती नव्हते. पण १७ वेळेस लढाईत हरवून ही जेंव्हा जरासंध अठराव्या वेळेस लढाईला सिद्ध झाला, त्यावेळेस श्रीकृष्णाने आपल्या प्रजेचा विचार करून मथुरा सोडली आणि द्वारका नगरी वसवून आपल्या प्रजेला सततच्या युद्धांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. आणि यासाठी त्याला नावं काय मिळाले तर ‘रणछोड’. महाभारताच्या युद्धाच्या वेळीही त्याने समेट घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण युद्धानंतर गांधारीने त्यालाच शाप दिला... का? कारण तो देव होता, त्याला हे युद्ध टाळणे शक्य होते असा तिचा दृढ समज होता. राजनीती, प्रजापालन, कर्म सिद्धांत, पराक्रम या सगळ्यात खरे तर तो अगदी निष्णात होता पण तरीही लोकांनी त्याचे गुण अंगिकारण्यापेक्षा त्याची पूजा करण्यातच स्वतःला धन्य मानले. इतकेच काय तर कित्येक जण त्याला ‘कर्मयोगी’ मानण्यापेक्षा ‘भोगी’ मानण्यातच आपण किती हुशार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात.

हीच गोष्ट अगदी अलिकडील काळातील शिवाजी महाराज यांच्या बाबतीतही आपल्याला दिसून येते. शिवाजी महाराजांनी कधीही उच्च नीच असा भेद पाळला नाही. कोणत्याही धर्माचा त्यांनी दुस्वासही केला नाही आणि कोणत्या एका जातीला खूप महत्वही दिले नाही. त्यांनी युद्ध केले ते रयतेला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून. त्यामुळेच त्यांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माची माणसे होती. तसेच त्यांनी लढताना समोरच्या व्यक्तीकडे पाहिले, त्याच्या जातीकडे किंवा धर्माकडे नाही. त्यांच्यातील पराक्रम, युद्धनीती, नितीमत्ता, निर्णयक्षमता असे कितीतरी गुण अभ्यासण्याजोगे आहेत. पण त्यांच्याही बाबतीत दुर्दैवाने हीच गोष्ट झाली. त्यांनाही देवत्व बहाल करण्यात आले आणि त्यांच्या नावाचा वापर फक्त एकमेकांवर कुरघुडी करण्यासाठी होऊ लागला.

स्वातंत्रोत्तर भारताचा विचार केला तर सगळ्यात पुढे जे नाव येते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या व्यक्तीने सर्व समाज एकत्र कसा येईल आणि समाजाची निकोप वाढ कशी होईल यासाठी आपले जीवन वेचले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात समाजातील उच्चनीच भेद, जातीव्यवस्था संपुष्टात आणणे आणि देशाच्या विकासासाठी सर्व समावेशकता असणे गरजेचे आहे हा विचार मांडणे हे त्यांच्यातील दूरदृष्टीपणाचे द्योतक आहे. सर्वांगीण प्रगतीवर कोणत्याही एका समाजाची मक्तेदारी नाही हे समजण्यासाठी लोकांना शिक्षण असणे जितके गरजेचे आहे, तितकेच जातींमधील अन्याय्य उतरंड कायमची संपुष्टात आणणेही गरजेचे आहे हे त्यांनी सगळ्याना सांगण्याचा प्रयत्न केला. पण आज होते काय आहे? त्यांचा विचार हा फक्त विचारच उरला आहे. काही जण त्यांचे पुतळे उभारण्यातच धन्यता मानतात आणि काही जण त्यांच्या नावाने राजकारण करण्यात स्वतःला धन्य समजतात.

माझ्या मते याच काय पण अशा इतरही सगळ्या महापुरुषांची पूजा करण्यापेक्षा त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आचरण करणे देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी जास्त गरजेचे आहे. लोकांनी तसेच राज्यकर्त्यांनी राममंदिर उभारण्यापेक्षा रामातील प्रजादक्ष गुण अंगिकारून प्रजेला न्याय, समता, सुरक्षा देणे जास्त गरजेचे आहे. कृष्णाने सांगितलेला कर्मयोग सिद्धांत अंगिकारून त्यानुसार आचरण करणे जास्त योग्य आहे. शिवाजी महाराजांमधील ‘प्रथम समाजाचे कल्याण’ हा गुण अंगिकारून त्यानुसार आपले वर्तन ठेवावे. आणि बाबासाहेबांमधील ‘जातीव्यवस्था निर्मुलन आणि त्यायोगे सामाजिक विकास’ ह्या गुणाचा अंगिकार करावा असे मला वाटते. ज्या दिवशी या गोष्टी अस्तित्वात येतील त्या दिवशी आपला देश खऱ्या अर्थाने पुढारला आहे असे म्हणता येऊ शकेल.

पाठवणी... मुलींचीच का?

सध्या आपण देशापुढील प्रश्न पाहिले तर सर्वात जास्त महत्वाचा आणि तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे स्त्रीवर होणारे अत्याचार. मग तो हुंड्यासाठी छळ असो, किंवा पारिवारिक हिंसा असो वा स्त्री भ्रूणहत्या. आता पर्यंत यांवर खूप जणांनी खूप विचार मांडले आहेत. याची खूप समीक्षाही झालेली आहे. बऱ्याच जणांनी त्यासाठी समाजाचे प्रबोधन करायलाही सुरुवात केली आहे. सरकारने अनेक कायदेही केलेले आहेत. पोलीस यंत्रणा याकडे खुपच संवेदनशीलपणे पहातही आहे आणि तरीही हा प्रश्न जसाच्या तसा आहे. रोजच कुठे आजीने नातीची हत्या केल्याच्या बातम्या तर कुठे उकिरड्यावर स्त्रीभ्रूण मिळाल्याच्या बातम्या, कुठे पतीने मारझोड केली तर कुठे हुंड्यासाठी सुनेची हत्या. वर्तमान पत्राच्या पहिल्या काही पानांवर या बातम्या असणारच. नावे आणि गावे वेगवेगळी असली तरी घटना मात्र बहुतांशी सारख्याच असतात. 

काय कारण असेल यामागे? आपण जेंव्हा याचा विचार करतो त्यावेळेस डोके भंडावून जाते. खरे आहे जेंव्हा अडाणी लोकं असे कृत्य करतात त्यावेळेस आपण समजू शकतो, पण हे कृत्य करणारे लोकं चांगले सुशिक्षित असतात. उच्च वर्गातले असतात आणि तरीही अशी कृत्ये करतातच. मध्यंतरी जे लोकं यात पकडले गेले त्यांचा व्यवसाय, शिक्षण पाहिले तर आपल्याला असे आढळेल की हे लोकं नुसते उच्चशिक्षितच नाहीत, तर समाजात प्रतिष्ठा असलेले आहेत. मग ते असे का वागतात? जराही माणुसकी नाही का त्यांच्यात? समस्येचे विश्लेषण अनेक लोकांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार आणि अनुभवानुसार केलेच आहे. पण आता नुसते विश्लेषण करून चालणार नाही तर त्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील याचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे.

या बद्दल जेंव्हा कधी माझ्या घरात चर्चा व्हायची त्यावेळेस माझी आई यावर एक उपाय मांडायची. अनेकांना तो काहीसा वेगळा किंवा विचित्र वाटेल पण मला मात्र तो पूर्णतः पटतो. तोच विचार मी इथे फक्त शब्दबध्द करतो आहे. तिच्या मते या सगळ्या प्रकारामागे फक्त एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेत स्त्रीचे असलेले स्थान. मी समाज हा शब्द यासाठी वापरतो आहे कारण हा प्रश्न काही फक्त एका धर्माचा नाही तर भारतातील प्रत्येक धर्माचा आहे. अगदी जो स्वतःला निधर्मी मानतो, त्याचा देखील. कारण आपण कोणत्याही जाती धर्माचे असलो तरीही आपल्या काही कृती ह्या अगदी सारख्या आहेत. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे “मुलगी सासरी जाणे.” माझी आई नेहमी म्हणायची, “जो पर्यंत मुलीला सासरी पाठवण्याची प्रथा आपण पाळतो आहोत तो पर्यंत पुरुष प्रधान संस्कृती नष्ट होणे कदापी शक्य नाही.” आता याला खुपच जणांचा विरोध असेल. कारण काहीही असो. कुणी त्याला धार्मिक कारण देईल तर कुणी वैज्ञानिक तर कुणी भावनिक. पण एकदा जरा त्रयस्थपणे विचार करून पहा तुम्हाला तिच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य वाटेल. मी असे नाही म्हणत की फक्त हे एकच कारण आहे स्त्री भ्रूणहत्ये मागे. इतरही अनेक कारणे आहेतच पण माझ्या मते सगळ्यात मोठे कारण हेच आहे. 

आपल्या भारतात पहा, तुम्ही कोणत्याही धर्माचे असला तरी तुमचे लग्न झाले की, तुम्ही स्त्री असाल तर पतीच्या घरी जातात आणि पुरुष असाल तर पत्नीला आपल्या घरी आणतात. का? तर तशी परंपरा आहे. म्हणजे पुरुष बायकोच्या घरी वर्षातून एकदा गेला तरी विशेष, पण इतर दिवस बाईनेच पतीच्या घरी राहायचे. जावई मंडळी सासूला पाहिजे ती नावे ठेवणार पण बायकोने मात्र आईबद्दल अवाक्षरही काढलेले त्या माणसाला चालत नाही. अजूनही ८०% कुटुंबात पुरुष साधा चहा देखील बनवीत नाही, पण बाईने मात्र घरातले सगळे काम करून वरती कुठेतरी नोकरीही करावी अशी त्याची अपेक्षा असते. का? कशासाठी? आज बाईचा हुंड्यासाठी छळ होतो. तिचा बळी घेतला जातो. कारण ती सासरी एकटी असते. पण त्या पुरुषाचे सगळेच कुटुंबीय त्याच्या सोबत असतात. आणि हेच कारण असते की माणसाला मुलगी पेक्षा मुलगा हवा असतो. कारण मुलगी सासरी जाणार असते, पण मुलगा घरीच राहणार असतो. कित्येक जण मुलगी नको याचे काय कारण देतात तर तिला कुणी त्रास दिलेला आम्हाला बघवणार नाही. आता जर मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर कायम राहिली तर त्या लोकांचा हा मुद्दाही निकाली निघेल. त्यामुळेच माझी आई म्हणायची तसे आता कायद्याने किमान काही वर्षे तरी मुलीऐवजी मुलाला सासरी पाठवावे. ह्या एका गोष्टीमुळे स्त्रियांवर होणारे अनेक अत्याचार नियंत्रणात येती.

एक वर्ष देशासाठी

मला वाटते भारतात काही गोष्टी सक्तीच्या कराव्या लागणार आहेत. त्यातील प्रमुख गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भारतीय सैन्यात किमान एक वर्ष देणे. भारतीय सैन्यात अनेक विभाग आणि अनेक कामे आहेत. त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार त्याला ती कामे देण्यात यावीत. त्याने काही गोष्टी आपोआप साध्य होऊ शकतील.

१. १८ ते २२ हे वय असे असते की त्या वयात प्रत्येक जण काहीसा बंडखोर असतो. त्याच्यात एक उर्जा तयार होत असते आणि ती व्यवस्थित खर्च झाली नाही तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला दिसू लागतो. कित्येक मुले याच यावात रस्त्यावर मारामाऱ्या करणे, भांडणे करणे, घरात चिडचिड करणे आणि आता फेसबुक / ट्विटर अशा ठिकाणी अत्यंत प्रक्षोभक विधाने करणे अशा गोष्टी करतात. त्याने समाजात फक्त तेढ निर्माण होऊ शकते. पण याच वयात जर त्यांना सैन्यात सामील केले गेले तर आपोआप त्यांच्यातील उर्जेला एक योग्य दिशा मिळू शकते.

२. या काळात त्या मुलांना महिना १००० रुपये दिले तर त्यांना पैशाचे महत्व समजू शकते. जे पैसे आपण बेकारीभत्ता म्हणून तरुणांना देतो तो जर अशा गोष्टीमधून त्यांना मिळाला तर ते देशासाठी चांगलेच आहे.

३. प्रत्येक जण देशाच्या सैन्यात राहून आलेला असल्यामुळे आणि प्रत्येकाने आपले एक वर्ष देशासाठी दिलेले असल्यामुळे ती व्यक्ती सहसा देशविघातक कृत्य करण्यास प्रवृत्त होत नाही. यामुळे बरेच गुन्हे आपोआप कमी होऊ शकतात.

४. भारतीय सैन्यात सैनिक हा हिंदू / मुस्लीम / इसाई नसतो तर फक्त भारतीय असतो. जातीयवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या यामुळे अगदी कमी होऊ शकतात. आज कित्येक लोकं इतर धर्माच्या लोकांना तुम्ही देशप्रेमी आहात हे सिद्ध करा असे म्हणतात. स्वतः देश विघातक कृत्ये करून देखील. या गोष्टीलाही बराचसा आळा बसू शकेल.

५. प्रत्येकाला सैनिकी शिक्षण दिल्यामुळे त्या मुलांमध्ये आपोआपच देशप्रेम जागृत होऊ शकेल तसेच त्यांच्यात शिस्तही निर्माण होईल. याच माध्यमातून मग देशासाठीच्या योजना चांगल्या रीतीने कार्यरत होऊ शकतील.

मी हे म्हणत नाही की यामुळे सगळेच प्रश्न सुटतील. काही जण तर त्यानंतर देखील गुन्हे करू शकतील, विचित्र वागू शकतील पण त्यांचे प्रमाण आजच्या पेक्षा कैकपटीने कमी असेल. माझ्याच बद्दल बोलायचे झाले तर माझे देशप्रेम हे फक्त कुणी देशाला नावे ठेवलीत तर फेसबुकवर त्याला शिव्या देण्यापुरते मर्यादित झाले आहे. आणि त्यामुळेच माझा वापर कुणीही देशाचे नाव घेऊन पाहिजे तसा करू शकतो. कित्येक वेळेस अशा गोष्टीमुळे एकतर मी व्यक्तिपूजक बनतो किंवा एखाद्याच्या हातातील बाहुले बनतो. देशाचा विचार मात्र बाजूलाच राहतो. देशासाठी मी काय करतो आहे हे विसरून राजकीय पक्षांनी काय केले यावर मोठमोठ्या चर्चा करतो. ज्याचा काडीचाही उपयोग देशाला होत नाही. पण तेच जर मला १ वर्ष सैन्यात काढावे लागले असते तर मी आज जो आहे त्यापेक्षा खचितच वेगळा असतो. आणि म्हणूनच मला प्रत्येकाने किमान १ वर्ष सैन्यासाठी देणे हे जास्त जरुरीचे वाटते.

मांत्रिक

मी एक साधा वेब डेव्हलपर आहे. मागील काही वर्षांपासून. त्याआधी अकौंटंट होतो. आजपर्यंत मला कधीही भूत / हडळ / खवीस / ब्रह्मराक्षस / वेताळ किंवा तत्सम व्यक्ती भेटलेल्या नाहीत. अगदी स्वप्नातही त्यांनी मला कधी दर्शन दिलेले नाही. काही वर्षांपासून मी फक्त माझ्या मनोरंजनासाठी कथा लिहितो. त्याही पूर्ण काल्पनिक असतात. त्यामुळे जर कुणाला असे वाटत असेल की मी या विषयातील जाणकार व्यक्ती आहे तर तो पूर्णपणे त्यांचा गैरसमज आहे.
आता तुम्ही म्हणाल, मी हे का सांगतो आहे? अहो आजकाल सांगावेच लागते. कोण कोणत्या गोष्टीचा कोणता अर्थ काढेल हे त्या ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही. म्हणून हे आधीच सांगावे लागते. खरं नाही वाटत? थांबा... माझा अनुभवच सांगतो.
दोन दिवसांपूर्वी मला एक फोन आला. नंबर अनोळखी होता. अनोळखी नंबर दिसले की माझा फोनवर बोलण्याचा टोन आपोआपच खूप मृदू होत असतो. कारण एकतर समोरच्या व्यक्तीवर आपण किती सभ्य आणि सुसंस्कृत आहोत याची छाप पडावी, आणि समजा एखादा घेणेकरी असेल तर तोही काहीसा शांत होऊन आपल्याशी सभ्यपणे बोलतो.
“मिलिंद जोशी बोलताय का?” पलीकडून विचारणा झाली.
“होय... बोलतोय...” मी अगदी सौम्यपणे उत्तर दिले.
“नमस्कार साहेब... मी संजय पाटील बोलतोय.” पलीकडून आवाज आला आणि मी विचारात पडलो. एकतर संजय पाटील या नावाचे किमान तीन जण तरी माझ्या मित्र यादीत आहेत. त्यापैकी हे कोण? अर्थात त्या तिघांपैकी एकाच्याही बोलण्याची पद्धत यांच्याशी जुळत नव्हती. बरे यापैकी एकही जण मला साहेब म्हणणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.  
“अगदी मोठ्या कष्टाने तुमचा नंबर मिळवला मी...” मी विचारच करत होतो तेवढ्यात पलीकडून आवाज आला. म्हणजे हे माझ्या मित्र यादीतील नव्हते तर.
“ओके सर... बोला... मी आपली काय मदत करू शकतो?” त्यांनी फोन कशासाठी केला आहे हे न समजल्यामुळे मी प्रश्न केला.
“ते तर मी नंतर सांगेनच पण मला आधी सांगा... कापालिक, मुक्ती, कर्मभोग या कथा तुम्ही लिहिल्या आहेत का?” त्यांनी माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याआधी त्यांचा प्रश्न फेकला.
“हो... मीच लिहिल्या आहेत. तुम्ही वाचल्या का? कशा वाटल्या?” मी आनंदाने विचारले. ज्या अर्थी त्यांनी माझ्या कथांची नावे उच्चारली म्हणजे नक्कीच ते माझे वाचक होते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे... कोणत्याही लेखकासाठी वाचक हाच देव असतो. तसे फेसबुकवर मला भरपूर अभिप्राय आले होते. पण त्यासाठी फोन येण्याची ती पहिलीच वेळ होती.
“वा... म्हणजे मी अगदी योग्य व्यक्तीला फोन केला तर...” त्यांच्या स्वरातून त्यांना हायसे वाटल्याचे दिसत होते.
“खूपच सुंदर लिहितात तुम्ही. अगदी अफलातून... आणि खूपच माहिती आणि अभ्यासपूर्ण...” त्यांनी अभिप्राय दिला आणि मी काहीसा चक्रावलो. चांगले लिहितो हे ठीक आहे पण अभ्यासपूर्ण? काल्पनिक कथेत कसली आलीये माहिती आणि अभ्यास? ते फक्त काही वेळापुरते मनोरंजन असते. मी हा विचारच करतच होतो तो पुढील शब्द कानावर पडले.
“अगदी जबरदस्त अभ्यास आहे तुमचा. आणि तो तुमच्या लिखाणातून लगेचच समजतो. तुम्ही अगदी पोहोचलेले असणार अशा गोष्टीत...” त्याने वाक्य पूर्ण केले आणि मी बुचकळ्यात पडलो. साला कल्पनेचे घोडे दामटायला अभ्यासाची गरजच काय? आणि त्या कथेत त्यांना अशी कोणती गोष्ट दिसली ज्यात माझा अभ्यासूपणा त्यांच्या लक्षात आला?
“सॉरी सर... पण मी नाही समजलो. ‘अशा गोष्टीत’ म्हणजे कशा गोष्टीत?” मी विचारले.
अहो हेच की.., ते आपलं... अघोरी विद्या, काळी जादू, टोणा टोटका... अशा... आयला..!!! मी गारच पडलो. तोंडातून एक शब्द फुटेना... १५/२० सेकंद असे शांततेत गेल्यावर परत पलीकडून आवाज आला.
साहेब... ऐकताय ना?” पलीकडून विचारणा झाली आणि मी भानावर आलो. उगाच त्याचा जास्त गैरसमज नको म्हणून म्हटलं...
... तुम्हाला कुणी सांगितलं असं?” यावेळेस मात्र माझ्या आवाजातील मार्दव कुठल्या कुठं पळालं होतं आणि त्याची जागा घेतली होती वैतागाने.
अहो... सांगायला कशाला पाहिजे कुणी? तुमचं लिखाणचं बोंब मारतंय ना... ओह... सॉरी... तुमच्या लिखाणातून ते अगदी स्पष्ट दिसतं असं म्हणायचं होतं मला...” पलिकडील आवाजात ठामपणा दिसत होता.
अहो... नाही हो... एकतर अशा गोष्टींवर माझा स्वतःचा बिलकुल विश्वास नाही. मी आपलं फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी लिहिलं... त्यावेळेस जे मनात आलं ते... बसं... बाकी काही नाही.” आता माझा स्वर वैतागाचा नाही तर काकुळतीचा होता.
खोटं नका बोलू साहेब... एकेक पूजा तुम्ही अगदी पूर्णपणे डोळ्यासमोर उभी केली. हे कुणी असंच लिहितं होय? या गोष्टी, त्याचा सखोल अभ्यास असल्या शिवाय शक्यच नाहीत.” त्याच्या या युक्तिवादावर काय बोलावं हेच मला सुचेना.
हे पहा साहेब... मी अगदी शपथेवर सांगतो... खरंच मला यातली काहीच माहिती नाही.” मी आवाजात शक्य तितका शांतपणा आणून एकेका शब्दावर जोर देत सांगितले.   
बरं..! ऱ्हायलं..!! तुम्हाला नसंल कबूल करायचं तर मला त्यात काही प्रॉब्लेम नाहीये... ते जाऊ द्या... एक काम होतं तुमच्याकडं...” त्याने माघार घेत म्हटले. आता हा काय काम सांगतो याचा मी विचार करू लागलो...
काम? आणि माझ्याकडं?”
हो... तुमच्याचंकडं... आणि हे फक्त तुम्हीच करू शकता... कराल का?” त्याने काकुळतीला येऊन विचारलं.
जर शक्य असेल तर नक्कीच करेन. आधी सांगा तर खरं...” मी अगदी मोघम उत्तर दिलं.
आपल्याला ना.., पैशाचा पाऊस पाडायचा आहे... त्यासाठी कोंबडं... बकरु... कशाचाही बळी द्यायला तयार आहोत आपण...” त्याने हे म्हटले मात्र आणि माझे डोळे पांढरे पडायचीच वेळ आली. तुम्हाला सांगतो... मला मी पेक्षा आपण हा शब्द खूप आवडतो... सगळ्यांना सोबत घेणारा हा शब्द खरंच सगळ्यांनी वापरावा असं नेहमी मला वाटतं. पण आज मला त्याच्या या आपण शब्दाची एक प्रकारची भीतीच वाटली हो...
अहो काय बोलताय तुम्ही? हे असं कधी असतं का?” आता माझं डोकंच फिरलं. आवाजातला सौम्य पणा, शांत पणा कुठल्या कुठे गायब झाला.
हो... मला माहिती आहे... मी बरोबर तेच बोलतोय...” त्याने तितक्याच शांतपणे उत्तर दिले.
हे पहा... मी असलं काहीही करत नाही...”
नाही नका म्हणू साहेब... खूप नड आहे हो मला पैशाची... असं करा... ६०% तुमचे... मला फक्त ४०% द्या... जास्त नाही पाहिजे आपल्याला...” त्याने स्वतःचे म्हणने पुढे रेटले.
बास... खूप झाले आता... शेवटचे सांगतो... मी असले धंदे करत नाही... ठेवा फोन...” मी चिडून उत्तर दिले.
विचार करा साहेब... काही घाई नाही... दीड तासाने परत फोन करतो...” त्याचा पलीकडून आवाज आला आणि मी त्यावर काही बोलण्याच्या आतच फोन कट झाला.  मी पूर्ण वैतागलो होतो. तेवढ्यात माझे वडील तिथे आले.
काय रे... कुणाचा होता फोन?”
काही नाही हो... असाच...”
हं... पण काय रे... तो काय लाच मागत होता का कामाबद्दल?” त्यांचा पुढचा प्रश्न... मी काय उत्तर देणार? कप्पाळ? त्यांना कोणत्या तोंडाने सांगणार होतो की तो लाच मागत नव्हता तर ६०% शेअर म्हणून मलाच लाच देण्याचा प्रयत्न करत होता म्हणून. शेवटी महत्प्रयासाने मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवले.
नाही हो... असाच होता फोन... बिगर कामाचा...” बहुतेक त्यांना वाटले असावे की मी मुद्दाम सांगत नाहीये त्यामुळे मग तेही शांत बसले.
एक तासानंतर परत त्याचाच फोन... आणि नंतर नंतर दर एक तासाने फोन येऊ लागला... तो ही वेगवेगळ्या नंबर वरून. मी पुरता भंडावलो.   
तुम्हाला म्हणून सांगतो... आत्ता... अर्ध्या तासापूर्वी परत फोन वाजला. परत अनोळखी नंबर... एखाद्या वेळेस क्लाईंटचा असू शकतो म्हणून भीत भीत उचलला.
हेल्लो...” आवाज वेगळा होता... मनात म्हंटले... चला... “तोनाहीये... परत आवाजात मृदुता आणली.
हेल्लो... कोण बोलतंय?
एं... आपण भाई बोलतोय...” आवाजही राकटच होता.
अं... कोण भाई?आता हा भाई कोण असावा असा विचार करून गोडीत विचारलं.
तो... ठोकणारा भाई... आख्ख्या शहराचा भाई...” मनात म्हटले च्यायला... आपल्या लिखाणाबद्दल अजून पैसे मिळायलाही सुरुवात झाली नाही आणि भाई लोकं खंडणीसाठी फोनही करू लागले?
चल... ते सोड... आता त्या आपल्या माणसाच्या कामाचं काय झालं ते सांग...” त्याने डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला.
अं... कसलं काम? कोण तुमचा माणूस?” मी परत वैतागलो.
आपला संज्या... दोन दिवसांपासून फोन करतोय त्यो आपला माणूस हाय... अन काम म्हणजे त्ये... पैशाचा पाऊस..!!!त्याने सांगितले आणि मला घेरी येण्याचीच बाकी राहिली...
अहो... खरंच हो... मला त्यातलं काहीच समजत नाही... शप्पथ..!!!मी आता अगदी रडवेल्या स्वरात सांगितले...
ते मला काय म्हाईत नाई... तुला काही जमत नसल तर ज्याला जमतं त्याला शोध आणि आपलं काम करून दे... काय? आपल्याला नाई ऐकायला आवडत नाई... समजलं? चल ठेव फोन... उद्या मी परत फोन करतो...आणि फोन कट झाला.
आता मला प्रश्न पडला आहे... असा मांत्रिक कुठे शोधायचा? तुम्हाला कुणाला माहिती आहे का हो अशा मांत्रिकाचा पत्ता??? आता मलाच खूप गरज आहे त्याची??? प्लीज...

मिलिंद जोशी,