Tuesday, 14 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग आठवा ( VLookup )


आजकाल आपल्या कानावर अॅडव्हान्स एक्सेल हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर पडू लागला आहे. एक्सेलच्या विषयावर चर्चा चालू आहे आणि कुणी अॅडव्हान्स एक्सेल हा शब्द वापरला नाही असे सहसा होत नाही. आणि एकदा का हा शब्द आला की मग पर्यायाने अजून एक शब्द आपल्या कानावर पडतो. व्हीलुकअप नावाचा. ( VLOOKUP ). बरे जवळपास ९०% लोकांना फक्त हा शब्दच तेवढा माहित असतो. त्याचा वापर किंवा उपयोग कुठे आणि कसा करायचा हे मात्र समजत नाही. काही जण खास पुस्तके आणून याचा आभ्यास करू लागतात. पण पहिल्या अर्ध्या तासातच पुस्तक बाजूला ठेवले जाते आणि ‘यार... ते vlookup function खूपच अवघड आहे रे... काही समजत नाही.’ हे वाक्य बोलायला मोकळे होतात. बहुतांशी लोकं फक्त ते एक खूप अवघड function आहे इतकेच धरून चालतात. पण खरंच का ते इतके अवघड आहे? मला विचाराल तर बिलकुल नाही. एकदम सोपे function आहे. मग प्रश्न हा पडतो की बहुतांशी लोकांना ते अवघड का वाटत असावे? याचे मला फक्त एकच कारण वाटते, ते म्हणजे कुणीतरी सांगितले म्हणून लोकं हे function वापरण्याचा अट्टाहास करतात. कित्येक वेळेस तर त्यांना त्याची गरजही नसते. आणि दुसऱ्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट कराल तर अवघड वाटणारच.

आजच्या लेखात आपण याच अवघड वाटणाऱ्या सोप्प्या function बद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात आधी हे आहे काय त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. लूकअप चा मराठीत अर्थ होतो पहाणे किंवा शोधणे. आणि एक्सेल मध्ये हे function हेच कार्य करत असते. म्हणजेच तुम्ही हे function वापरतात याचा अर्थ तुम्ही एका ठिकाणी साठवलेल्या माहितीतून तुम्हाला हवी असलेली तेवढीच माहिती दुसऱ्या ठिकाणी घेतात किंवा वापरतात. बस. यापेक्षा यात दुसरे काहीच नाही. मग हे लोकांना अवघड का वाटते तर लोकांना याचा उपयोग काय हेच मुळी नीटसे समजत नाही.

एक्सेल मध्ये function चे ग्रुप बनवले गेले आहेत. सगळ्यांना सोपे जावे यासाठी. त्यातील एक ग्रुप म्हणजे lookup. या ग्रुपमध्ये आपणास अनेक function दिसतात. LOOKUP, VLOOKUP, HLOOKUP, INDEX, MATCH इत्यादी. यातील जास्त वापरले जाणारे function म्हणजे VLOOKUP. थोडक्यात साठवलेल्या माहितीच्या टेबल मधून उभ्या रकान्याच्या माध्यमातून एखादी माहिती शोधणे. HLOOPUP म्हणजे साठवलेल्या माहितीच्या टेबल मधून ओळीच्या माध्यमातून एखादी माहिती शोधणे. LOOKUP मात्र याहून थोडे वेगळे आहे.

आता हे VLOOKUP कधी वापरावे? समजा एखाद्या ठिकाणी आपण एखादी माहिती साठवून ठेवतो. जी सहसा बदलत नाही. पण तीची गरज नेहमीच लागते अशावेळेस हे vlookup खूप उपयोगी पडते. आपण एक उदाहरण पाहू. समजा मी एखाद्या कंपनीत मानव संसाधन व्यवस्थापनाचे काम करतोय... ( ओह... जास्तच बोजड शब्द वापरलेत का? म्हणजे Human Resource Management - HR Manager हो. ) मग माझ्याकडे सगळ्यात मोठे काम कोणते असेल तर माझ्या कंपनीत असलेल्या कामगारांचे पगारपत्रक काढणे. अनेकांना हे काम खूप किचकट वाटते. कारण वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा Basic Pay, अधिक वेगवेगळे भत्ते, त्यातही ते भत्ते एकाच दराने असतील असे नाही. काही भत्ते तर त्या कर्मचाऱ्याच्या हुद्द्यानुसार कमी जास्त असतात. बरे त्याला देण्यात येणारा पगारही तो किती दिवस हजर होता त्यानुसार बदलणारा असू शकतो. बरोबर ना? अशा वेळेस आपल्याला VLookup खूप फायदेशीर पडते. याच गोष्टींचे आपण प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत.

सगळ्यात आधी आपण त्याचा syntax पाहू.

=VLOOKUP(lookup_value, table_array, col_index_num, [range_lookup])

या फंक्शन मध्ये काही parameter आपल्याला द्यावे लागतात. त्याबद्दल थोडेसे.

१. Lookup Value : याआधी सांगितल्याप्रमाणे VLookup Function हे आपल्याला त्याच्याकडील उपलब्ध माहितीमधून विशिष्ट माहिती देणार असते. पण आपल्याला काय पाहिजे ते त्याला नको का समजायला? त्यासाठी ही माहिती आधी आपल्याला त्याला द्यावी लागते.

२. Table Array : आपल्याला हवी असणारी माहिती त्याने कुठे शोधावी याचा पत्ता या भागात दिला जातो.

३. Column Index Number : आपण दिलेल्या टेबल मधून कोणत्या रकान्यातील माहिती त्याने आपल्याला द्यावी हे आपण या भागात सांगतो.

४. Range Lookup : हे parameter चौकोनी कंसात दिले आहे. याचा अर्थ हे ऐच्छिक ( optional ) आहे. या भागात आपल्याला False (0) किंवा True (1) यापैकी एक गोष्ट द्यायची असते. आपण काहीच दिले नाही तर त्याचा अर्थ True असा समजला जातो. काय फरक आहे या दोन्हीमध्ये? यातील False हा पर्याय निवडल्यास आपल्याला Exact Match दिले जाते. म्हणजे जर आपण शोधात असलेला शब्द / संख्या उपलब्ध माहितीच्या तक्त्यात ( टेबल हो ) दिलेल्या माहितीशी तंतोतंत जुळणारी असेल तरच आपल्याला दाखवली जाते. आणि Approximate Match या पर्याय निवडल्यानंतर आपल्याला दिली जाणारी माहिती ही आपण शोधत असलेल्या माहितीशी साधर्म्य असणारी किंवा त्याच्या जवळ जाणारी असते.

टीप : यात एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते. ती म्हणजे आपण जो टेबल माहिती साठविण्यासाठी वापरणार आहोत आणि ज्या रकान्याच्या आधारे ही माहिती शोधली जाणार आहे, ती sort असली पाहिजे. नाहीतर आपल्याला मिळणारा रिझल्ट चुकीचा येण्याची जास्त शक्यता असते. अनेक जण आपल्याला VLookup अवघड जाते हे याच एका कारणाने सांगतात. त्यांनी फंक्शन बरोबर वापरलेले असते. टेबल मध्ये माहितीही व्यवस्थित भरलेली असते आणि तरीही त्यांना पाहिजे असलेला रिझल्ट येत नसतो. त्याचे कारण चूक फंक्शन लिहिण्यात नाही तर माहिती साठविण्यात असते.


Picture 1.1













सोबतच्या चित्रात ( Picture 1.1 ) एक टेबल तयार केले आहे. ज्यात Employee No., Name, Designation, Basic Pay, D.A. %, H.R.A. %, T. A. Amount आणि Medical Allownace Amount देण्यात आले आहेत. या गोष्टी वर्षानंतरच बदलतात. पण त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे त्या एका टेबलमध्ये साठवल्या आहेत. आणि त्या टेबलाला नाव दिले आहे EmployeeDetails. हे टेबल तुम्ही त्याच Sheet मध्ये किंवा वेगळ्या Sheet मध्येही तयार करू शकता.


Picture 1.2














दुसऱ्या चित्रात हे फंक्शन कुठे आणि कसे वापरायचे हे दाखवले आहे. यातही एक टेबल बनवले आहे. टेबल मधील प्रत्येक रकान्याला ( column ) नाव देण्यात आले आहे. पहिला आहे. Emp. ID ( EmployeeDetail या टेबलमध्ये याचे नाव Employee No. असे होते. ) ही माहिती आपण द्यायची आहे. आणि हाच तो कॉलम आहे ज्याचा वापर EmployeeDetails या टेबल मधील माहिती मिळविण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यापुढील कॉलमचे नाव आहे Employee Name. आपण या आधीच आपल्याकडील employees ची नावे EmployeeDetails या टेबल मध्ये भरून ठेवलेली आहेत. आता आपल्याला फक्त ती तिथून मिळवायची आहेत. आणि म्हणून सगळ्यात पहिले VLookup Function आपण वापरणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपला कर्सर B2 या cell मध्ये न्यायचा आहे. त्यानंतर = चे चिन्ह देऊन त्यापुढे VLookup म्हणायचे आहे. त्यानंतरच्या कंसात आपल्याला A2 हा cell Address द्यायचा आहे. ( काही जण $A$2 असेही देतात. याचा अर्थ ते कॉलम आणि रो यांना फिक्स करतात. म्हणजेच जर कुणी हा address कॉपी केल्यानंतर पेस्ट करताना बदलत नाही. ) यानंतर कॉमा देऊन Table Array द्यायचा आहे. म्हणजे जिथे आपण employeeची माहिती साठवली आहे तो पत्ता. त्याला आपण EmployeeDetails हे नाव दिलेले असल्यामुळे तेच नाव आपण वापरणार आहोत. आणि त्यानंतरच्या आपण Column Index No. देणार आहोत. हा कॉलम नंबर EmployeeDetails या टेबल मधील आहे. यानुसार B2 या cell मध्ये पुढील फंक्शन असेल.

=VLOOKUP(A2,EmployeeDetails,2)

या फंक्शन मध्ये Column Index No. हा 2 देण्यात आला आहे. EmployeeDetails या टेबलमधील कॉलम नंबर 2 मध्ये Employee चे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस A2 या cell मध्ये Employee No. देऊ त्यावेळेस vlookup function आपल्याला त्या employee नाव देईल.

त्यापुढील रकान्यात हजर दिवस देण्यात आले आहेत. आणि त्यापुढील रकान्यात vlookupचाच वापर केला आहे.

=C2*VLOOKUP(A2,EmployeeDetails,4)/30

वरील फंक्शनचा विचार केल्यास C2 या सेल मध्ये हजर दिवस घेण्यात आले आहेत. गुणिले त्या employeeचा Basic Pay भागिले ३०. Employee चा बेसिक पे vlookupचा वापर करून आपण मिळवतो आहोत. ( यात संपूर्ण फंक्शन सारखेच आहे. फरक आहे तो फक्त कॉलम इंडेक्स नंबरचा. ) आणि भागिले ३० केले आहेत म्हणजे आपल्याला एका दिवसाचा पगार मिळू शकेल. अशा पद्धतीने बेसिक पे आपल्याला मिळतो. अगदी त्याच प्रमाणे इतर गोष्टीत देखील VLookup वापरण्यात आले आहे.

अजून एक गोष्ट... आपण =VLOOKUP(A2,EmployeeDetails,2) असे फंक्शन वापरले आहे. पण अनेक जण Name Define केलेले नसल्यामुळे त्याची रेंज देतात. त्यावेळेस ते फंक्शन पुढील प्रमाणे असेल. =VLOOKUP(A2,Sheet2!$A$2:$H$7,2). याचा विचार केला तर पहिले फंक्शन हे सुटसुटीत वाटते तर दुसरे काहीसे किचकट...

थोडक्यात काय तर मागील लेखात सांगितल्या प्रमाणे Define Name हे खूप फायद्याचे असते आणि VLookup मध्ये तर त्याचा फायदा जास्तच होतो.

Saturday, 11 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग सातवा ( Define Name )


मध्यंतरी माझ्या एका मित्राला विचारले... काय रे, तुझ्या व्यवसायासाठी एक्सेल इतके उपयोगी असतानाही तू त्यापासून लांब का पळतोस? आणि त्यावर त्याचे उत्तर होते... ‘यार... खरं सांगू का... त्यातील ते फॉर्म्युले डोक्याचा भुगा करतात. ते Columnचे नाव लक्षात ठेवा, Rowचा नंबर लक्षात ठेवा. आणि परत ते कॉपी पेस्ट करायचे तर मध्येच ते नावं आणि नंबर बदलून जातात. बेरीज वजाबाकी पर्यंत ठीक आहे. पण ते लांबलचक फॉर्म्युले डोकं पिकवतात.’

एका दृष्टीने त्याचे नक्कीच बरोबर आहे. मला त्याची माहिती आहे म्हणून मला ते अवघड वाटत नाही. पण ज्यांना त्याची सवय नाही त्यांना ते किचकट वाटतच असणार. पण म्हणून काय पारंपारिक पद्धत वापरत बसायचे? बिलकुल नाही. क्लिष्ट फॉर्म्युले आपण सोपे करून घ्यायचे. कसे? जास्त काही नाही त्या रेंजला किंवा सेलला योग्य असे नाव देऊन.

आपण उदाहरणच पाहू... समजा तुम्ही एक्सेलच्या एका Sheet वर माहिती साठवीत आहात, आणि दुसर्या Sheet वर त्याचे विश्लेषण करीत आहात. Consilidate च्या भागात आपण हे पाहिले होते. त्यावेळेस आपण रेंज कशी दिली होती? ‘Consolidate2!$B$2:$E$24’ – अशीच ना? यात Consolidate2 हे Sheet चे नाव होते, $B$2:$E$24 ही रेंज होती. आणि “!” ( Exclamation mark ) या चिन्हाने आपण त्यातील वेगळेपण दाखवले होते. बरे प्रत्येक Column Name आणि Row Number च्या आधी $ ( dollar sign ) लावण्यात आले आहे. ते पाहिले की टेंशन येते. ( हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो आहे. ) समजा त्या ऐवजी आपण त्या रेंजला नाव दिले तर आपले काम अगदी सोपे होईल. समजा आपण त्या रेंजला “Expenses” हे नाव दिल्यानंतर ज्या ठिकाणी ‘Consolidate2!$B$2:$E$24’ अशी रेंज दिली आहे तिथे ‘Expenses’ लिहायचे आहे. आणि आपल्याला तोच रिझल्ट मिळेल जो पहिल्या वेळी मिळाला होता. आहे की नाही सोपे? आणि आपण याला कॉपी पेस्ट करताना Column Name तसेच Row Number बदलण्याचीही काळजी करण्याचे कारण राहणार नाही. 


Picture 1.1
Name Define करणे खूपच सोपे आहे. ज्या सेल किंवा रेंजला आपल्याला नाव द्यायचे आहे. ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर नेम बॉक्स ( Address Box ) मध्ये त्याचा Address आपल्याला दिसू लागले. त्यावर क्लिक करून आपल्याला हवे ते नाव आपण देऊ शकतो. आहे की नाही सोप्पे.

सोबतच्या चित्रात आपल्याला नाव कुठे द्यायचे आहे ते दिसू शकेल.

दुसऱ्या चित्रात Name Define करण्याची दुसरी पद्धतही दिलेली आहे. यात आपण त्याची व्याप्ती ( Scope ) देखील देऊ शकतो. 

Picture 1.2
एक्सेलमधील Formulas Tab वर क्लिक केल्यानंतर आपल्याला Define Names नावाचा एक विभाग दिसू लागेल. त्यात डाव्या बाजूला Name Manager चा icon असेल. आणि उजव्या बाजूला Define Name चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या चित्रात दाखविलेला Box दिसेल. यात तुम्ही Name च्या जागी नाव द्यायचे आहे. त्याखाली Scope असेल. जिथे workbook असे लिहिलेले असेल. याचा अर्थ संपूर्ण वर्कबुक मध्ये तुम्ही ती रेंज किंवा तो सेल त्याच नावाने वापरू शकाल. ( संपूर्ण वर्कबुक म्हणजे ती एक्सेल फाईल. त्यामध्ये जितके sheet असतील त्या सगळ्या sheet मध्ये तुम्ही ही रेंज वापरू शकता. ) तुम्ही हा scope एखाद्या sheet पुरताही मर्यादित करू शकता. त्या sheet चे नाव select करून. Comment मध्ये तुम्ही या बद्दलची अतिरिक्त माहिती देऊ शकता. याचा उपयोग तुम्हाला Name Manager च्या window मध्ये होऊ शकेल. जर एकापेक्षा जास्त नावे तुम्ही तयार केलेली असतील तर Name Manager च्या विंडोत तुम्हाला नाव, त्याचा Address ( रेंज ), त्याची व्याप्ती ( scope ) आणि Comment दिसेल. ज्यामुळे समजा एखादे नाव व्यवस्थित दिले गेले नसेल तर कमेंटमध्ये तुम्हाला त्याबद्दलची अतिरिक्त माहिती मिळू शकेल. आणि सगळ्यात शेवटी Refers to : या भागात तुम्ही निवडलेल्या सेलचा Address किंवा selected range Sheet च्या नावासहित तुम्हाला दिसू शकेल. त्या box मध्ये तुमचा कर्सर ठेवून तुम्ही दुसरी एखादी रेंज देखील select करू शकता.

आता रेंजला किंवा सेलला नाव देताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 

१. नाव जस्तीत जास्त २५६ अक्षरांपर्यंत मोठे असावे.

२. नाव देताना त्यात space असू नये. म्हणजे ‘Monthly Sales’ असे नाव आपल्याला देता येणार नाही. कारण दोन शब्दात मोकळी जागा आली आहे. या ऐवजी आपण ‘MonthlySales’ किंवा ‘Monthly_Sales’ असे देऊ शकतो.

३. नाव हे कोणत्याही सेलचा address असू नये. म्हणजे आपल्याला ‘X365’ किंवा ‘XL16’ असे नाव देता येणार नाही. कारण हा cell address आहे.

४. नावाची सुरुवात अक्षरानेच करावी. ( A – Z )

५. सगळ्यात महत्वाचे. इथे दिलेली नावे Case sensitive नसतात. म्हणजेच इथे “Sales”, “sales”, “SALES” हे एकच समजले जाते. याचा वापर यापुढे खूप होणार आहे. खासकरून VLookup मध्ये जास्तच... त्यामुळे याची सवय करून घेणे कधीही चांगलेच.


Friday, 10 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग सहावा ( Nested IF )

मागील भागात आपण IF Function आणि AND Function यांचा वापर करून एखादा विद्यार्थी त्याला मिळालेल्या मार्कांवरून पास की नापास हे कसे ठरवायचे ते पाहिले. पण त्याच वेळेस मी Nested IF याबद्दलही दोन शब्द सांगितले होते. आणि असेही म्हटले होते की Nested IF वापरताना तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. तेच आज आपण इथे पाहणार आहोत. नाही नाही... घाबरू नका... इतकेही अवघड नाहीये हे. फक्त एका IF Function मध्ये परत IF Function येत असल्यामुळे ते काहीसे क्लिष्ट वाटू शकते. अर्थात वाटणे आणि असणे यात खूप फरक असतो. हे फक्त क्लिष्ट वाटते... असत नाही. चला तर मग...

Nested IF वापरण्यासाठी आपण मागील उदाहरणाचाच पुढील भाग पाहू. मागील उदाहरणात आपण काही विद्यार्थ्यांच्या तीन विषयांचे मार्क घेऊन त्यानुसार त्यांचा रिझल्ट काढला होता. म्हणजे जर ते सगळ्या विषयात पास असतील तर “पास” आणि तीन पैकी कोणत्याही एका विषयात नापास असतील तर “नापास” ठरवत होतो. पण यात दोनच गोष्टी येतात... एकतर पास किंवा नापास. पण प्रत्यक्ष निकालपत्रकात मात्र रिझल्ट बरोबरच त्यांच्या मार्कांची टक्केवारी आणि त्यावर आधारलेली ग्रेड देखील दिलेली असते. मार्कांची टक्केवारी ३५% ते ४४% असल्यास ‘Pass Class’, ४५% ते ५९% असल्यास ‘Second Class’, ६०% ते ७४% असल्यास ‘First Class’ आणि त्यापेक्षाही जास्त असल्यास ‘Dinstintion’. यासाठी आज आपण IF Functionचाच वापर करणार आहोत. पण एका पेक्षा जास्त वेळेस... आणि तेही एकात एक असलेले.

अनेकांनी महाभारत सीरिअल पाहिले असेल. त्यात द्रोणाचार्य अभिमन्यूला चक्रव्यूह रचून पराभूत करतात. इथेही हे एक प्रकारचे चक्रव्यूहच आहे. पण याची रचना माहित झाल्यावर विद्यार्थ्यांचा अभिमन्यू नाही तर अर्जुन बनतो. चक्रव्युहात जसे मध्यभागी मुख्य योद्धा असतो आणि त्याच्या भोवताली वेगवेगळे कडे बनवले जाते. आधी पहिले कडे फोडले की दुसरे, दुसरे फोडले की तिसरे... याप्रमाणे. आणि समजा पहिले कडे तुम्हाला फोडताच आले नाही तर तुम्हाला अगदी मध्यभागी जाण्याची वेळच येत नाही. तसेच हे Nested IF Function असते.
Picture 1.1

सोबतच्या चित्रात एक टेबल दाखवले आहे. ज्यात काही विद्यार्थ्यांची नावे, त्यांना तीन विषयात मिळालेले मार्क, त्या मार्कांची बेरीज, त्यांचा रिझल्ट, त्यांची टक्केवारी आणि त्यांची श्रेणी ( ग्रेड हो ) देण्यात आली आहे. यापैकी नाव, आणि त्यांच्या विषयांचे मार्क आपणच भरणार आहोत. एकूण मार्कांसाठी SUM हा फोर्मुला वापरला आहे. रिझल्ट साठी मागील भागात पाहिलेले IF AND Function वापरले आहे. त्यांच्या मार्कांची टक्केवारी काढण्यासाठी एकूण मिळविलेले मार्क भागिले एकूण असलेले मार्क गुणिले १०० हा फोर्मुला वापरण्यात आला आहे.

=(F4/300)*100 – [ 131/300*100 = 43.67 ]

इथपर्यंत काहीच अवघड नाही. त्यापुढे ग्रेडच्या रकान्यातील सेलमध्ये आपण पुढील फोर्मुला वापरणार आहोत.

=IF(G4="Fail","Fail",IF(H4<45,"Pass Class",IF(H4<60,"Second Class",IF(H4<75,"First Class","Distinction"))))

काहीसा डेंजर दिसतोय ना फोर्मुला? पण तो फक्त लांबच लांब असल्यामुळे तसा वाटतोय. आपण त्याचे विभाजन केल्यास तो तितका अवघड वाटणार नाही. मी तर त्यासाठी कॉपी पेस्टचाच जास्त वापर करतो. बाकी काही नाही हो... टाईप करण्याचे कष्ट वाचतात.

सुरुवात करू पहिल्या IF पासून. यातील logical test या भागात G4=”Fail” ही condition दिली आहे. म्हणजे G4 या सेलमधील रिझल्ट “Fail” असा असेल तर त्याच्या True Value या भागात “Fail” जसेच्या तसे लिहिले आहे. कारण जर मुलगा नापास असेल तर त्याची ग्रेड काढली जात नाही. पण समजा G4 या सेल मधील रिझल्ट “Pass” असा असेल तर IF Functionच्या False Value भागातील माहिती दाखविण्यात येईल. पण वरील फंक्शन मध्ये आपण त्या भागात कोणताही शब्द किंवा शब्दसमूह न देता तिथे अजून एक IF Function दिले आहे. ( IF Function No. 2 - चित्रात त्याची फोड केलेली तुम्हाला दिसेल. )

दुसऱ्या नंबरचे जे IF Function आहे त्यातील logical test मध्ये H4<45 ही कंडीशन दिली आहे. H4 का? कारण H4 या सेलमध्येच त्या मुलाची टक्केवारी काढण्यात आली आहे म्हणून. एक गोष्ट इथे लक्षात घ्या. पहिल्या IF मध्ये कंडीशन देताना आपण value ला अवतरण चिन्ह ( “ “ - डबल कोटेशन मार्क ) वापरले होते. दुसऱ्या IF मध्ये मात्र कंडीशन देताना value अवतरण चिन्हात दिलेली नाही. का? कारण पहिल्या value चा DataType हा Text ( शब्द ) आहे तर दुसऱ्या value चा DataType हा Numeric ( संख्या ) आहे. जर दुसऱ्या value ला देखील आपण अवतरण चिन्हात दाखवले असते तर एक्सेलने त्याला संख्या न मानता शब्द मानले असते आणि मग त्यामुळे त्याच्या सोबत कोणत्याही प्रकारचे Mathematical Calculation करणे शक्य होऊ शकले नसते. हे इथे सांगण्याचे कारण म्हणजे ही गोष्ट दिसताना अगदी लहान दिसली तरीही त्यामुळे मिळणारा रिझल्ट चुकीचा असू शकतो. असो... ज्या वेळेस एक्सेल H4<45 ही कंडीशन चेक करेल त्यावेळेस त्याला जर H4 cell मधील value 45 पेक्षा लहान दिसली तर “Pass Class” हे शब्द आपल्याला दिसू लागतील. ( इथे मी फक्त ‘<’ हेच Operator वापरले आहे. कारण या कंडीशन मध्ये 45 ही संख्या घेतली आहे. जर ती संख्या 44 असती तर ‘<’ operator बरोबरच ‘=’ हे operator देखील वापरावे लागले असते. [ H4<=44 ] ) जर H4 या सेल मधील संख्या 45 किवा त्यापेक्षा मोठी असेल तर दुसऱ्या IF Function च्या false value या सेक्शन मधील माहिती आपल्याला मिळेल. हीच गोष्ट बाकी दोन IF Function मध्येही लागू होते. आहे की नाही सोप्पं? आता अजून एक गोष्ट... या आधीच्या भागात मी असेही म्हटले होते की यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असावी लागते म्हणून. बरोबर ना? त्याबद्दल थोडेसे. इथे पहिल्या फंक्शन मध्ये रिझल्ट चेक केला आहे, दुसऱ्या मध्ये Pass Class, तिसऱ्या मध्ये Second Class आणि चौथ्या मध्ये First Class तसेच Distinction असे चढत्या क्रमाने logical test देण्यात आली आहे. समजा ती जर उतरत्या क्रमाने दिली असती तर? Function ने योग्य रिझल्ट दिला असता? पहा बरे करून... जमतंय का?

Thursday, 9 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग पाचवा ( Conditional Functions )

आजच्या भागात आपण एक्सेलमधील एक खूप सोपे पण खूप उपयोगी असे If Function पाहणार आहोत. धक्का बसला ना? कारण आपण एक्सेल शिकतो त्यावेळेस जवळपास प्रत्येकालाच हे फंक्शन कसे वापरायचे हे शिकवले जाते. आता मग मी त्यात आणखी काय नवीन सांगणार? आणि तेही अॅडव्हान्स एक्सेल या विभागात? पण नक्कीच काही जणांना आजचा भाग उपयुक्त ठरू शकेल.

आपण एरवी if function वापरतो ते फक्त एखादा प्रश्न कंडीशनल असेल तर. जसे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात ३५ मार्क असतील तर तो पास आणि नसतील तर नापास... इतके सोपे. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष व्यवहारात याचा वापर करतो त्यावेळेस हे इतकेच सोपे असेल का? नक्कीच नाही. कारण विद्यार्थी पास की नापास हे फक्त एका विषयावर ठरत नाही. एकूण सहा सात विषय असतात. त्यातील सगळ्या विषयात तो पास झाला तर त्याला पास समजले जाते पण समजा त्यातील कोणत्याही एका जरी विषयात नापास झाला तरी तो नापास ठरतो. म्हणजेच इथे कंडीशन आहेत, पण एकापेक्षा जास्त. अशा वेळेस आपल्याला नुसते if function वापरून भागणार नाही. आणि इथेच सुरुवात होते अॅडव्हान्स एक्सेलची. या केस मध्ये रिझल्ट आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे काढता येवू शकतो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे nested if ( नेस्टेड इफ ) आणि दुसरा प्रकार म्हणजे if च्या जोडीला वापरले जाणारे AND Function. सोप्या भाषेत सांगायचे तर एकाच फोर्मुल्यात एकापेक्षा जास्त इफ फंक्शन वापरणे म्हणजे नेस्टेड इफ. ज्यांना कोडींगची माहिती असते ते जास्तकरून याचा वापर करतात. कारण हे वापरताना आपली कन्सेप्ट क्लीअर असणे खूप गरजेचे असते. नाहीतर यात चुका होण्याचा जास्त संभव असतो. आणि त्यामुळेच आपण यातील दुसरा प्रकार आधी पाहणार आहोत.

आधी इफ फंक्शनचा syntax पाहू.

= if ( Condition, True Value, False Value )

यात बरोबरच्या चिन्हांनंतर आपल्याला if लिहिलेले दिसते. त्यानंतरचा कंस तीन भागात विभागलेला दिसतो. प्रत्येक भाग (,) कॉमा या चिन्हाने वेगळा केलेला असतो. पहिल्या भागात आपल्याला कंडीशन द्यायची असते. दुसऱ्या भागात कंडीशन पूर्ण झाल्यावर दाखवण्यात येणारा रिझल्ट आणि तिसऱ्या भागात कंडीशन पूर्ण न झाल्यास दाखवण्यात येणारा रिझल्ट द्यावा लागतो.

आता इफच्या बरोबरीने जे दुसरे फंक्शन पाहणार आहोत त्याबद्दल. AND Function syntax.

= AND(Logical1, Logical2,...)

या ठिकाणी बरोबरच्या चिन्हानंतर आपल्याला AND लिहिलेले दिसते. त्यानंतरच्या कंसात Logical1, Logical2, ... या गोष्टी दिसतात. यात लॉजिकल याचा अर्थ होतो कंडीशन. या फंक्शन मध्ये आपण कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त २५६ कंडीशन देऊ शकतो. जर यातील सगळ्या कंडीशन बरोबर असतील तर हे फंक्शन आपल्याला True रिझल्ट देते आणि जर यातील एक जरी कंडीशन चूक असेल तर हे फंक्शन आपल्याला False रिझल्ट देते.

या दोन्ही फंक्शनचा आपल्याला कसा वापर करता येतो हे आपल्याला सोबतच्या चित्रावरून चांगले समजू शकते. 

Table 1.1

टेबल १.१ मध्ये चार मुलांचे रिझल्ट दाखवण्यात आले आहेत. प्रत्येकाला तीन विषय दिले गेले आहेत. रिझल्ट लावताना मात्र जर तो विद्यार्थी तिन्ही विषयात पास असेल तरच पास समजला जाईल अन्यथा नापास समजला जाईल. पहिला विद्यार्थी तिन्ही विषयात पास आहे त्यामुळे त्याचा रिझल्ट पास आलेला आहे पण इतर बाकी तीन विद्यार्थी मात्र एकेका विषयात नापास असल्यामुळे नापास दाखवले गेले आहेत. आणि यासाठी खालील प्रमाणे फोर्मुला वापरण्यात आला आहे.

=IF(AND(C27>=35,D27>=35,E27>=35),"PASS","FAIL")

वरील फोर्मुलामध्ये IFच्या कंडीशन पार्ट मध्ये AND फंक्शनचा वापर केलेला दिसतो.

[ AND(C27>=35,D27>=35,E27>=35) ].

इथे AND फंक्शन मध्ये तीन कंडीशन दिल्या गेल्या आहेत. पहिली कंडीशन ‘C27>=35’ ही आहे. याचा अर्थ C27 या सेलमधील नंबर जर ३५ किंवा त्यापेक्षा मोठा असेल तर True असा रिझल्ट मिळावा आणि नसेल तर False असा रिझल्ट मिळावा. असेच पुढच्या दोन कंडीशनच्या बाबतीत सुद्धा आहे. आता AND या फंक्शन नुसार जर तिन्ही रिझल्ट True असतील तरच ते फंक्शन आपल्याला True असा रिझल्ट देईल. अन्यथा आपल्याला False असा रिझल्ट मिळेल. तसेच आपण दिलेल्या इफ फंक्शन मध्ये जर कंडीशन True असेल तर आपल्याला ते फंक्शन पास असा रिझल्ट देईल आणि नाहीतर फेल असा रिझल्ट मिळेल. म्हणजेच जर C27, D27 आणि E27 या तिन्ही सेल मधील नंबर ३५ पेक्षा मोठे असतील तरच आपल्याला “पास” असा रिझल्ट मिळेल आणि त्यापैकी कोणत्याही एका सेल मधील नंबर ३५ पेक्षा लहान असेल तर आपल्याला “फेल” असा रिझल्ट मिळेल. IF हे फंक्शन एक्सेल मध्ये सगळ्यात जास्त उपयोगी आणि वापरले जाणारे फंक्शन आहे त्यामुळे जर तुम्ही त्याचा प्रभावीपणे वापर करू शकलात तर तुमचे अनेक रिपोर्ट तुम्ही अगदी काही मिनिटात बनवू शकतात. त्यामुळे उफ न करता इफ शिकलात तर नक्कीच ते तुम्हाला खूप फायद्याचे ठरेल.

Wednesday, 8 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग चौथा ( Paste Special )

बेसिक एक्सेल ज्यांना येते त्यांना एक गोष्ट १००% माहित असते. CTRL+C हे key combination एक किंवा अनेक cell मधील मजकूर कॉपी करण्यासाठी वापरले जाते, आणि पेस्ट करताना CTRL+V हे key combination वापरले जाते. कित्ती सोपे ना? आता काही जण म्हणतील... ज्या गोष्टी माहित आहेत त्या परत का सांगत बसलाय हा माणूस? आहे... कारण आहेच. आपण इथे फक्त बेसिक एक्सेल शिकत नाही आहोत, आपल्याला शिकायचे आहे त्यापेक्षा थोडे जास्त. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत Pest Special.

ही गोष्ट खरे तर जे लोक Data Analyst आहेत त्यांच्यासाठी जास्त गरजेची आहे. किंवा मग ज्यांच्याकडे रिपोर्ट्स बनविण्याचे काम असते त्यांनाही या गोष्टीची गरज पडतेच. पण त्यांच्या बरोबरच आपल्यालाही या गोष्टी माहिती झाल्या तर त्यात काय बिघडले? उलट त्याचा आपल्याला इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी फायदाच होऊ शकेल. बरोबर ना? चला तर मग... इतरांवर प्रभाव टाकण्याची सुरुवात करू. 

ज्या वेळेस आपण कोणत्याही सेलला कॉपी करतो त्यावेळेस त्या सेलशी संबंधित सगळ्या गोष्टी कॉपी होत असतात.

Picture 01
उदा. सोबतच्या चित्रात B2 आणि C2 या सेलमध्ये अनुक्रमे 45 आणि 50 अशा संख्या आल्या आहेत. त्यानंतरच्या सेल मध्ये ( D2 ) मध्ये B2 आणि C2 ची बेरीज करणारा फोर्मुला देण्यात आला आहे. ( =B2+C2 ) त्यामुळे D2 मध्ये आपणास दोन 45 आणि 50 या संख्यांची बेरीज 95 ही संख्या दिसते आहे. ती संख्या लाल रंगात दिसत असून त्या सेलच्या सभोवती बोर्डरही देण्यात आली आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण D2 या सेलला कॉपी करू त्यावेळेस त्या सेल मधील फोर्मुला, संख्या, त्याचे Formatting अशा सगळ्याच गोष्टी कॉपी होतील. आणि जेंव्हा D3 या सेलवर जाऊन आपण त्याला पेस्ट करू त्यावेळेस तिथे आपणास लाल रंगात (0) ही संख्या दिसेल. का? कारण पेस्ट होताना इथे formatting बरोबरच त्यातील फोर्मुला पेस्ट झाला. पण त्यात थोडा बदल करून. 
Picture 02
दुसऱ्या चित्रात आपला कर्सर D3 या सेलवर आहे. आणि फोर्मुला बार मध्ये त्याचा फोर्मुला =B3+C3 असा दिसतो आहे. म्हणजेच फोर्मुलामधील कॉलमचे नाव तसेच असले तरी ओळीचा नंबर मात्र बदलला आहे. आणि B3 तसेच C3 या सेलमध्ये कोणतीची संख्या नसल्याने D3 सेलमध्ये आपणास झीरो (0) दिसत आहे.

पण ज्यावेळेस आपण एखादा रिपोर्ट बनवत असतो त्यावेळेस यातील फक्त काही गोष्टीच आपल्याला पेस्ट करायच्या असतात. उदा. एखाद्या वेळेस cell मध्ये फोर्मुला (=B2+C2) असला तरी आपल्याला फक्त त्यातील value च (95) गरजेची असते. ही गोष्ट शक्य होऊ शकते पेस्ट स्पेशल सुविधेने. 


Picture 3
Picture 3 चित्रात Right Click केल्यानंतर येणारी विंडो दिसते आहे. यात Paste Options मध्ये सहा आयकॉन दिसत आहेत. त्यातील पहिला आयकॉन आहे paste, दुसरा आहे value, तिसरा आहे formula, चौथा आहे Transpose, पाचवा Formatting आणि सहावा link. सामान्यतः या सहा प्रकारात आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात. पण समजा आपली गरज याहून जास्तीची असेल तर त्या आयकॉनच्या खाली Paste Special नावाचा जास्तीचा पर्याय देण्यात आला आहे. त्यावर आपला कर्सर गेल्यानंतर त्याच्या बाजूला असलेली विंडो दिसू लागते. यात अजून काही जास्तीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

आता एकेक करून आधी पहिल्या सहा आयकॉन बद्दल पाहू.

१. Paste (P) : यावर क्लिक करून आपण कॉपी केलेल्या सगळ्याच गोष्टी सामान्यतः पेस्ट करत असतो.

२. Value (V) : यावर क्लिक केले तर आपण कॉपी केलेल्या सेल मधील फक्त value ( Result ) तेवढीच पेस्ट करतो.

३. Formula (F) : यावर क्लिक केल्याने कॉपी केलेल्या सेल मधील फोर्मुला फक्त पेस्ट होईल. त्या सेलचे formatting पेस्ट होणार नाही. 


Picture 4
४. Transpose (T) : यावर क्लिक केल्याने ओळीत विभागलेला मजकूर कॉलममध्ये पेस्ट केला जातो. चौथ्या चित्रात दाखविल्या प्रमाणे आधी चार महिन्यांची नावे A कॉलम मध्ये १ ते ४ ओळीत भरली गेली होती. त्यानंतर ती रेंज कॉपी केली. आणि C1 या सेलवर Right Click केल्यानंतर आपल्या समोर जे पेस्टचे पर्याय आले त्यातील चौथा पर्याय निवडल्यानंतर ती चारही महिन्यांची नावे अनुक्रमे C1, D1, E1 आणि F1 या सेलमध्ये पेस्ट केली गेली. 

५. Formatting (R) : यावर क्लिक केल्याने त्या सेलचा फक्त format पेस्ट होतो. त्यातील मजकूर मात्र पेस्ट होत नाही.

६. Paste Link (N) : यावर क्लिक केल्याने त्या सेलचा Address पेस्ट केला जातो.

Paste Special वर कर्सर नेल्यानंतर उजव्या बाजूला जे पर्याय दिसू लागतात त्यातील बरेच पर्याय आपणास वर दिसले आहेत. पण त्यातील दोन पर्याय असे आहेत जे एक्सेल २००७ व्हर्जन मध्ये आपल्याला आढळून येणार नाहीत.

७. Picture (U) : यावर क्लिक केल्यानंतर कॉपी केलेली माहिती picture format मध्ये paste होते.

८. Linked Picture (I) : यावर क्लिक केल्यानंतर कॉपी केलेली माहिती picture format मध्ये paste होते पण हे Live Picture असते. म्हणजे समजा आपण कॉपी केलेल्या सेल मध्ये काही बदल झाला तर पेस्ट केलेल्या picture मध्येही आपोआप बदल होतो.

आहे की नाही मजेदार गोष्ट? याप्रमाणे CTRL+ALT+V हे key combination वापरले तर तुमच्या समोर Paste Special Dialog Box दिसू लागेल. यातही अनेक वेगवेगळ्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यातील बाकी सुविधा आपल्याला सहसा उपयोगी पडतातच असे नाही. अर्थात नवीन गोष्टी शिकण्याच्या दृष्टीने त्या करून पाहिल्या तर चांगलेच आहे.

Tuesday, 7 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग तिसरा ( Consolidate 2 )

 
आज आपल्याला consolidate याच सुविधेतील अजून काही गोष्टी पहायच्या आहेत. मागील भागात याचा वापर दैनंदिन जमाखर्च ठेवताना कसा होऊ शकतो हे पाहिले, या भागात मार्केटिंगच्या दृष्टीकोनातून काढण्यात येणारे रिपोर्ट कसे बनवावेत हे पाहणार आहोत. सोबतच्या चित्रातून आपल्याला या गोष्टी समजून घेता येतील. टेबल १.१ मध्ये तारखेनुसार कोणत्या सेल्समनने कोणत्या प्रोडक्टची किती विक्री केली याची माहिती नोंदवण्यात आली आहे. पण ही माहिती एकत्रित नाहीये. तारखेनुसार रेकॉर्ड असल्यामुळे सगळी माहिती विखुरलेली आहे. या टेबल मध्ये खूप कमी ओळी असल्यामुळे त्याचे एकत्रिकरण करणे त्या मानाने खूप सोपे आहे पण समजा जर याच ओळी शेकड्यांमध्ये असतील तर? मग मात्र त्याचे एकत्रिकरण त्रासदायक ठरू शकते. कारण आधी फक्त एकच गोष्ट पाहिली जात होती. ती म्हणजे खर्चाचा तपशील. पण इथे सेल्समन सुद्धा अनेक आहेत आणि त्यांनी विकलेले प्रोडक्ट्स देखील अनेक आहेत. बरे या सगळ्या गोष्टी विखुरलेल्या आहेत. अशा वेळेस एक्सेल मधील consolidate ही सुविधा खूप उपयोगी ठरते. सोबतच्या चित्रातही जी consolidate window आहे त्यात सगळी माहिती आधीप्रमाणेच आहे. अर्थात पहिल्या वेळेस रेंज घेताना फक्त दोन कॉलम घेतले गेले होते पण कॉलमचे नाव मात्र वगळण्यात आले होते. इथे मात्र रेंज घेताना एकूण चार कॉलम घेण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा त्या कॉलमच्या नावासह. ( 'Consolidate 2'!$B$2:$E$24 ) तसेच यात अजून एक गोष्ट जी वेगळी आहे ती म्हणजे Use labels in मधील Top Row हा चेकबॉक्सही चेक केला गेला आहे. ज्यावेळेस आपण याप्रमाणे माहिती consolidate च्या window मध्ये भरून ओकेच्या बटन वर क्लिक करू आपल्याला त्याचा रिझल्ट टेबल १.२ या प्रमाणे दाखवण्यात येईल. या टेबल मध्ये ( टेबल १.२ ) आपल्याला आपल्याकडे काम करीत असलेले सेल्समन ओळीनुसार दिसत आहेत तसेच त्यांच्यापुढे आपल्याकडील प्रोडक्ट्स कॉलमनुसार दिसत आहेत. आणि इतर सेल मध्ये आपल्याला कोणत्या सेल्समनने कोणत्या प्रोडक्टची किती विक्री केली हे दाखवले जात आहे. याचा वापर आपल्याला सेल्समनचा Performance Analysis करण्यासाठीही करता येवू शकतो.

आता या अनुषंगाने अजून काही गोष्टी. जर तुम्ही ज्या एक्सेल शीट वरून माहिती घेत आहात तिथेच ती consolidate करत असाल तर त्यात एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे consolidate window मधील Use labels in भागातील तिसरा चेकबॉक्स ( Create Link To Source Data ) तुम्हाला चेक करता येणार नाही. तो चेक केल्यास एक्सेल तुम्हाला ( Cannot create links to consolidation sheet ) एरर मेसेज देते. याचे कारण म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणावरून माहिती गोळा करीत आहात त्याच ठिकाणची लिंक एक्सेल घेत नाही. याचा एक तोटा असा की जर ओरिजिनल माहितीमध्ये तुम्ही काही बदल केल्यास त्याचा कोणताही परिणाम रिझल्टच्या टेबलमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही. असा परिणाम होण्यासाठी तुम्हाला परत एकदा consolidate प्रोसिजर फॉलो करावी लागेल. उदा. टेबल १.२ हे रिझल्ट टेबल बनवताना consolidate सुविधेने टेबल १.१ मधून माहिती घेतलेली आहे. उदा. सेल्समन अभिषेक याने प्रोडक्ट एक याची विक्री एकूण ६ वेळेस केलेली आहे. ( ५०+५०+४५+४८+४५+५६=२९४) समजा आता जर आपण टेबल १.१ च्या अभिषेक समोरील प्रोडक्ट १ मधील माहिती ५० ऐवजी ६० केली तरीही टेबल १.२ मधील अभिषेकने प्रोडक्ट १ ची केलेली एकूण विक्री ही पहिल्या इतकीच म्हणजे २९४ इतकीच दाखवली जाईल जी बदल केल्यानंतर ३०४ इतकी होणे अपेक्षित आहे. आता यात फक्त थोडाबदल केला आणि ओरीजनल माहिती वेगळ्या एक्सेल शीट वरून घेतली आणि रिझल्ट वेगळ्या शीट वर घेतला तर मात्र consolidate window मधील Create Link To Source Data हा चेकबॉक्स आपण चेक करू शकतो. त्याने फायदा असा होतो की जे काही रिझल्ट टेबल असेल त्याच्या प्रत्येक सेलमध्ये एक्सेल फार्मुलाचा वापर करते. अशा वेळेस जर आपण ओरीजनल माहितीत काहीही बदल केला तर त्याचा परिणाम तत्काळ रिझल्ट टेबलमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जर अशा वेळी सेल्समन अभिषेकने केलेली प्रोडक्ट १ ची विक्री आपण ५० ऐवजी ६० केली तर रिझल्ट शीट मध्ये आपल्याला सेल्समन अभिषेकची प्रोडक्ट १ ची एकूण विक्री ही आपल्याला लगेचच ३०४ अशी बदललेली दिसेल.

माहितीचे एकत्रिकरण करताना आपल्याला ही माहिती एकापेक्षा जास्त एल्सेल शीट मधूनही घेता येते. त्यासाठीआपल्याला रेफरन्स बॉक्स मध्ये माहितीची रेंज दिल्यानंतर Add बटनवर क्लिक करावे लागते जेणेकरून ती रेंज All References या लिस्टमध्ये add केलीजाते. समजा जर आपल्याला एक्सेलच्या दुसऱ्या फाईल मधून एखादी रेंज घ्यायची असेल तर त्यासाठी Browse या बटणावर क्लिक करा. आपल्या समोर ब्राउज विंडो उघडेल ज्यात आपल्याला एक दुसरी एखादी एक्सेल फाईल उघडता येईल आणि त्यातून माहिती घेता येवू शकेल. थोडक्यात consolidate ही सुविधा आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी पडू शकते.


Monday, 6 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग दुसरा ( Consolidate )

पहिल्या भागात आपण सेलच्या कॅटेगरी पहिल्या. आज आपल्याला जी गोष्ट पहायची आहे ती सगळ्यांनाच उपयोगी पडू शकते. अकौंटंट असो, छोटा व्यावसायिक असो वा गृहिणी असो, याचा वापर ते त्यांच्या दैनंदिन जीवनात नक्कीच करू शकतात. बरे ही गोष्ट इतकी सोपी आहे की ज्याला एक्सेल मध्ये फक्त डाटा भरता येतो तो सुद्धा याचा वापर प्रभावीपणे करू शकतो. कोणती ही गोष्ट? ही आहे एक्सेल मधील Consolidate सुविधा. एक्सेल २००७ मध्ये ही सुविधा आपल्याला Data Tab मध्ये सापडते. Data Tools या कॅटेगरीमध्ये Data Validation च्या शेजारी आपल्याला Consolidate चा आयकॉन दिसतो. सर्वात आधी ही काय भानगड आहे हे पाहू.

Consolidate म्हणजे आपल्याकडील विखुरलेली माहिती एका ठिकाणी गोळा करणे इतकेच. बरे या गोष्टी आपण एरवी करत नाही असे नाही. पण ते करताना आपण एक्सेलचा वापर सहसा करत नाही. उदा. काही लोकं आपला रोजचा जमाखर्च एका डायरीत लिहून ठेवत असतात. कोणत्या तारखेला किती पैसे मिळाले आणि त्यातील किती खर्च झाले हे बरेच जण करतात. छोटे व्यावसायिक तर करतातच करतात. रोज फक्त हा हिशोब डायरीत मांडला जातो आणि महिन्याच्या शेवटी कोणता खर्च किती झाला याचे तपशील काढले जाते. बरोबर ना? पण हे तपशील काढताना किती वेळ जातो? जर रोजची उलाढाल जास्त असेल तर महिन्याच्या शेवटी किमान एक दीड तास तर लागतोच लागतो. परत त्यातही होणाऱ्या मानवी चुका. कधी त्या लक्षात येतात तर कधी येतही नाहीत. आणि समजा त्यावर आपण आपले नियोजन करणार असलो तर तेही चुकणारच. हीच गोष्ट जर आपल्याला काही मिनिटात आणि तीही बिनचूक करता आली तर? आहे ना उपयोगी? हेच काम एक्सेल मधील Consolidate ही सुविधा आपल्यासाठी करत असते... अगदी काही मिनिटात.

आता आपण वेगवेगळ्या व्यक्तींना ही सुविधा कशी फायदेशीर ठरू शकते हे पाहणार आहोत. तसेच ती कशी वापरायची हे देखील आकृतीच्या सहाय्याने पाहणार आहोत. सुरुवात करू गृहिणींपासून.

बऱ्याच परिवारात रोजचा जमाखर्च घरातील होम मिनिस्टर पहात असतात. नोकरी करत असल्या तरी आणि नसल्या तरी. परिवारातील प्रधान सेवक आपला बाहेर जाऊन पैसा घेऊन येतो आणि होम मिनिस्टरच्या हातावर ठेवून मोकळा होतो. त्यानंतर मग तो कसा खर्च करायचा हे सर्वस्वी होम मिनिस्टर ठरवतात. थोडक्यात परिवाराचे बजेट ठरवण्याचे महत्वाचे काम त्यांना करावे लागते. मागील महिन्यात कोणता खर्च किती झाला याची साधारण माहिती असेल तर त्यावर आधारलेले बजेट यशस्वी ठरते आणि तीच माहिती व्यवस्थित नसेल तर बनवलेले बजेट कोसळते. इथेच एक्सेल मधील Consolidate सुविधा उपयोगी ठरते.

खालील फोटोत ही सुविधा कशी वापरावी हे दाखविले गेले आहे. यात आपल्याला एक टेबल दिसते ज्यात तीन कॉलम आहेत. पहिल्यात दिनांक, दुसऱ्यात तपशील आणि तिसऱ्यात रक्कम भरली गेली आहे. या टेबल मध्ये तारखेनुसार झालेल्या खर्चाचा हिशोब लिहिला गेला आहे. पण यातील कित्येक खर्च हे दोन तीन दिवसाआड रिपीट होत आहेत. उदा. पेट्रोल किंवा भाजीपाला यांचा खर्च इ. Consolidate करताना आपल्या कर्सरचा Address आहे F10. या ठिकाणी आपल्याला Petrol Expenses असे शब्द दिसत आहेत. पण हे सगळे आपले काम पूर्ण झाल्यावर येते. ते कसे दिसेल याची माहिती व्हावी म्हणून तिथे रिझल्ट दाखवण्यात आला आहे. Consolidate सुविधा वापरताना आपला कर्सर हा ज्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट दाखवायचा आहे तिथे सेट करावा लागतो. रिबन वरील Consolidate या icon वर क्लिक केल्यानंतर Consolidate window ओपन होते. यात सर्वात वर Function म्हटले गेले आहे. जिथे सध्या Sum हा शब्द दिसतो. याचा अर्थ माहितीचे एकत्रीकरण केल्यानंतर जो खर्च एकापेक्षा जास्त वेळेस लिस्टमध्ये आला असेल त्याच्या किमतीची बेरीज करण्यात येते. त्याखाली Reference चा बॉक्स दिसेल. इथे मी टेबलमधील फक्त दोन कॉलमचा रेफरन्स देतो आहे. Details आणि Amount हे ते दोन कॉलम. ( 'Consolidate 1'!$C$9:$D$29) शेजारील रेफरन्स मधील 'Consolidate 1' हा शब्द त्या एक्सेल शीटचे नाव आहे ( तुमच्या इथे ते नाव Sheet1 असू शकेल ) आणि त्यापुढील !$C$9:$D$29 ही सिलेक्ट केलेली रेंज आहे. त्यानंतर Add च्या बटणावर क्लिक करून ती रेंज All References या लिस्टमध्ये add करण्यात आली आहे. त्याखाली Use labels in असे लिहिलेले असून त्याखाली दोन चेकबॉक्स देण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे Top row आणि दुसरा Left column असे. त्यातील दुसऱ्या म्हणजे Left column या चेकबॉक्सला चेक करण्यात आले आहे. आणि त्यानंतर ओकेच्या बटणावर क्लिक केल्यानंतर दिलेल्या रेंज मधील माहितीचे एकत्रीकरण केले जाते.

consolidate रिझल्ट शीटमध्ये पेट्रोलचा खर्च ६००/- रुपये दाखवण्यात आला आहे. ( १२०/- (०१ मे) + १२०/- (०४ मे) + १२०/- (०८ मे) + १२०/- (१० मे) + १२०/- (१४ मे) = ६००/- )

पहा... आहे ना सोपे आणि उपयुक्त? या पद्धतीने अकौंटंट किंवा छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाचा डेली हिशोब नक्कीच ठेवू शकतात. यातील अजून काही गोष्टी मात्र आपण पुढील भागात पाहणार आहोत.

Sunday, 5 August 2018

अॅडव्हान्स एक्सेल : भाग पहिला ( Cell Formatting )

खरे तर मला खूप दिवसांपासून अशा प्रकारच्या पोस्ट टाकायला सुरुवात करावी असे वाटत होते पण काही ना काही कारणाने राहून जात होते. आजपासून मात्र जितके शक्य होईल तितके या उपक्रमास सुरुवात करत आहे. काही चुकल्यास सांभाळून घ्यावे आणि आपणही आपल्याकडे असलेल्या गोष्टी शेअर कराव्यात जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल.

काही वर्षांपूर्वी तुम्हाला MS Office येते हे Extra Qualification म्हणून गृहीत धरले जात होते पण नंतर काळ बदलत गेला. अनेक नवीन नवीन software येत गेले. संगणकाचे दैनंदिन कामकाजात असलेले योगदान वाढत गेले आणि Extra Qualification हे Minimum Qualification बनले. आता तर तुम्हाला MS Office येतेच असेच गृहीत धरले जाते. पण आपण किती वापरतो ते? त्या मानाने खूपच कमी. एक्सेलचा वापर माहिती साठवण्यासाठी. वर्डचा वापर कागदपत्रे ड्राफ्ट करण्यासाठी आणि आउटलुकचा वापर इमेल पाहण्यासाठी... बस... इतकेच... इतर टूल्सची आपल्याला गरजच पडत नाही. पण खरंच त्याची गरज नसते का? असते... पण आपल्याला त्याचा वापर कसा प्रभावीपणे करता येऊ शकतो हेच माहिती नसते. तेच आता या लेखमालेतून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. सुरवात करणार आहे ती एक्सेल पासून. कारण फक्त एकच. हेच टूल्स सगळ्यात जास्त सगळीकडे वापरले जाते आणि वापरले जाऊ शकते.

आज आपण सगळ्यात सोपा टॉपिक पाहणार आहोत. खरे तर ज्यांना ज्यांना एक्सेल येते त्यांना या गोष्टी माहिती असणारच आहेत. पण काही वेळेस जी गोष्ट सगळ्यात सोपी वाटते तीच आपल्याला वेळेवर आठवत नाही. एक्सेलमध्ये जशी माहिती साठवता येते तसेच त्याचा वापर हा Quick Reports बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. या रिपोर्ट मध्ये माहिती जशी आपण भरतो तशीच दिसणे गरजेचे असते आणि यासाठी गरजेची असते ती Cell Format Category.तीच आज आपण पाहणार आहोत.

Cell Format Category


Cell Format Category यालाच काहीजण डाटाबेसच्या भाषेत DataType असेही म्हणतात. सेलमध्ये भरला जाणारा डाटा कोणत्या प्रकारचा असेल ते Cell Format Category ठरवते. एक्सेल २००७ मध्ये आपल्याला एकूण १२ कॅटेगरी दिसतात. ज्यातील फक्त चार पाचच आपण दैनंदिन जीवनात जास्त करून वापरतो. ज्यावेळेस आपण नवीन एक्सेल शीट उघडतो त्यावेळेस त्यातील प्रत्येक सेलची कॅटेगरी ही General असते. म्हणजेच आपण जो डाटा त्यात भरू त्याला एक्सेल स्वतःच्या Format नुसार साठवते. फोटोमधील उदाहरणावरून हे जास्त स्पष्ट होऊ शकेल. ( टेबल १.१ ) पहा... मी डाटा भरताना पहिल्या ओळीतील सगळ्या सेल मध्ये एकच माहिती भरतो आहे... १११००० हा नंबर. पण सेलच्या कॅटेगरी नुसार तो मला वेगवेगळा दिसतो. नुसता दिसतच नाही तर तो वेगवेगळा असतो सुद्धा. General कॅटेगरी असताना तो फक्त एक नंबर म्हणून घेतला गेला. तेच Number कॅटेगरी असताना त्याच्या पुढे दोन डेसिमल जोडले गेले. कारण या कॅटेगरीच्या सब कॅटेगरीमध्ये जो Format आपण सिलेक्ट केला असेल त्याप्रमाणे आपल्याला तो नंबर दिसतो. Date ही कॅटेगरी असताना आपल्याला २७ नोव्हेंबर २००३ ही तारीख दिसते. कारण एक्सेलमध्ये प्रत्येक तारीख ही एक नंबर मात्र असते. त्यामुळेच दोन तारखेतील दिवस आपण मोजू शकतो. Accounting आणि Currency या कॅटेगरी असताना त्याचा फक्त display format बदलला गेला आहे. Text कॅटेगरी मध्ये हा नंबर जसा आहे तसा साठवला गेला आहे. पण जर आपण बारकाईने पाहिले तर त्या सेलच्या Top Left Position ला आपल्याला एक हिरव्या रंगाचा छोटा indicator दिसेल. हा indicator आपल्याला त्या सेलची कॅटेगरी Text असल्याचे सूचित करतो. तसेच त्यावर क्लिक केल्यास त्याबद्दलची इतर माहिती सुद्धा पुरवतो. Percentage कॅटेगरी असताना जो नंबर आपण देऊ त्याला तो % हे चिन्ह लावतो. इतकेच नाही तर त्याचा दुसरा अर्थ होतो, ती संख्या भागिले १००. ( टेबल १.२ ) बाकीच्या कॅटेगरी ह्या सहसा आपल्याला वापराव्या लागत नाहीत.

दुसऱ्या ओळीत मी ५/३ ही माहिती भरतो आहे पण परत इथेही काही ठिकाणी ती ३ मे अशी दिसते, काही ठिकाणी १.६७ अशी तर काही ठिकाणी १ २/३ दिसते. ज्या डाटाची सुरुवात अक्षराने होते तो मात्र कोणतीही कॅटेगरी असेल तरी सारखाच दिसेल. मग प्रश्न असा पडतो की आपल्याला प्रत्येक वेळेस त्या सेलची कॅटेगरी बदलायची का? उत्तर आहे हो... आणि नाही सुद्धा... म्हणजे कॅटेगरी बदलणे त्या मानाने खूप सोपे असते. एक्सेल रिबन मधील होम या tab वर आपल्याला ती लगेच सापडते. पण त्याला दुसरा सुद्धा एक मार्ग म्हणजे कोणत्याची डाटाच्या आधी जर ( ‘ ) ( single quotation mark ) दिले तर सेल कॅटेगरी कोणतीही असो डाटा हा टेक्स्ट स्वरूपाचा समजला जातो. उदा. टेबल १.१ मधील पाचवी आणि सहावी ओळ... पाचव्या ओळीत =45/0 असा फोर्मुला दिला आहे. Text ही कॅटेगरी सोडली तर इतर सगळ्या ठिकाणी #Div/0! ही एरर तुम्हाला दिसून येईल कारण =45/0 याला इतर सगळ्या कॅटेगरी फोर्मुला म्हणून स्विकारतात पण Text ही कॅटेगरी त्याला फक्त शब्दसमूह म्हणून स्विकारते. सहाव्या ओळीत मात्र प्रत्येक कॅटेगरीच्या सेल मध्ये ( ‘=45/0 ) फोर्मुलाच्या आधी single quotation mark दिले आहे त्यामुळे सगळीकडे त्याला फक्त शब्दसमूह म्हणूनच स्विकारले गेले आहे. सेल कॅटेगरी फक्त डाटावरच नाही तर आपण देत असलेल्या फोर्मुलावर सुद्धा इफेक्ट करते.

टेबल १.३ मध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये AUTOSUM function कशा पद्धतीचा रिझल्ट देईल हे दाखवण्यात आले आहे.

वरील सर्व बाबी लक्षात घेता एक्सेल वापरताना सगळ्यात साधी वाटणारी हि गोष्ट पुढे जाऊन खूप डोकेदुखी ठरू शकते.


Saturday, 4 August 2018

अत्युच्च आनंदाचा क्षण

प्रत्येकाच्या जीवनात जसे काही हळवे क्षण येतात तसेच काही आनंदाचेही क्षण येतात. अर्थात काही वेळेस ते लक्षात येतातच असे नाही. पण त्यातून मिळणारा आनंद हा केवळ वर्णनातीत असतो. आतापर्यंत माझ्या आयुष्यात देवाच्या कृपेने असे खुपच अत्यंत आनंदाचे क्षण आलेले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर दहावीला आपण नापासच होणार ही खात्री असूनही मी पास झालो तो क्षण. ( मार्क किती ते मात्र नका विचारू... ) माझ्या आई वडिलांनी जेंव्हा मला २/३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नववीत असताना सायकल घेवून दिली होती तो क्षण. तसेच इयत्ता दहावीमध्ये असताना शेजारच्या मुलाच्या सायकलचे पंचर रिपेअर करून मिळालेले ५० पैसे आईच्या हाती दिले तो क्षण. असे कितीतरी क्षण इथे सांगता येतील. पण कोणताही एकच क्षण सांगायचा झाल्यास माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच क्षण येतो... कोणता? थांबा... सांगतो...

अजूनही आठवतो तो दिवस. अर्थात तारीख / वार नाही सांगता येणार, पण दिवस उन्हाळ्याचे होते हे नक्की. वेळ दुपारी बारा साडेबाराची असावी. मध्यान्हीचा सूर्य अंग भाजून काढत होता आणि त्यामुळे जितके होईल तितके पाणी पिऊन शरीरात थंडावा निर्माण करावा लागत होता. सारडा सर्कलवर एका ठिकाणी नोकरीचा अर्ज द्यायचा असल्यामुळे द्वारकालाच मी बसमधून उतरलो. खरे तर माझ्याकडे सायकल असायची पण त्यादिवशी ती माझा भाऊ घेऊन गेल्यामुळे मला बसने फिरावे लागत होते. द्वारका ते सारडा सर्कल हे अंतर तसे चालत गेले तरी ५ मिनिटाचे. पत्ताही अगदीच सोपा होता, त्यामुळे लगेचच सापडला. तिथे जाऊन मी माझा अर्ज दिला आणि बाहेर पडलो. गावात फिरायचे तर प्रत्येक ठिकाणी रिक्षा करणे त्या काळी परवडणारे नव्हते त्यामुळे चालतच निघालो. एकसारखे पाणी पीत असल्यामुळे लघवी लागली होती. विचार केला... बसस्टँडवर जावे आणि मोकळे व्हावे. १० एक मिनिटात बसस्टँडवरील प्रसाधन गृहाच्या पायऱ्या चढलो, तर समोर बसलेल्या माणसाने आडवले. “रुको, सफाई चालू है..!!!” मनात म्हटलं साला यांना आताच सफाई सुचली. पण बोलून काही फायदा नव्हता. तसाच चालत चालत गोळे कॉलनीच्या सिग्नलवर आलो. वेळ जात होता तसे प्रेशरही वाढत होते. डोक्यात फक्त कुठे मोकळे होता येईल याचेच विचार चालू होते. बरे अशा वेळेस कधी न भेटणारे लोकं नेमके भेटतात. आणि त्यांच्याकडे वेळही भरपूर असतो गप्पा मारायला. हा विचार चालू असतानाच मागून खांद्यावर थाप पडली. वळून पाहिले तर सुनील हसत उभा होता. बऱ्याच दिवसांनी भेटत होता तो.

“आयला... आहेस कुठे सध्या?” सुन्याने प्रश्न केला.

“इथेच आहे यार..!!!” चेहऱ्यावर उसनं हसू आणत मी उत्तर दिलं.

“किती दिवसांनी भेटतो आहेस यार... चल समोर जावून उसाचा रस घेऊ...”

“नाही रे.. सध्या खूप घाईत आहे...” मी उत्तर दिले.

“गप रे.. चल...” माझा दंड धरून जवळ जवळ मला ओढतच तो निघाला. मनात विचार आला आधीच प्रेशर वाढलेलं आणि त्यात परत नवीन भर टाकायची? शेवटी न राहवून म्हटलं...

“यार... प्रॉब्लेम आहे... समजून घे...” हे म्हणतच मी करंगळी वर केली.

“अरे इतकंचं ना? थांब... इथे प्रधान पार्क मध्ये जाऊ. मी नेहमी तिथेच जातो गरज असते तेंव्हा.” त्याने म्हटले आणि मला अत्यानंद झाला.

“अरे चल मग... लवकर...” म्हणत आम्ही जवळपास पळतच प्रधान पार्क इमारतीत पोहोचलो. पण नशीब ज्यावेळेस बथ्थड असतं ना, त्यावेळेस सगळेच फासे उलटे पडतात. तिथे जाऊन पाहतो तर दरवाजाला कुलूप लावलेलं. एक एक मिनिट एका तासासारखा वाटत होता. शेवटी रस घ्यायचा बेत कॅन्सल करून त्याला निरोप दिला आणि पाऊले सार्वजनिक वाचनालयाच्या दिशेने वळली. तिथे मोकळे व्हायला जागा आहे. इतर काहीच सुचत नव्हते. खरं तर अगदी पळत जावे असेच वाटत होते पण अशा वेळेस पळणे सोयीचे नाही तर गैरसोयीचे ठरते. त्यातून परत “लोकं काय म्हणतील?” हाही विचार मनात आला. कसेतरी करून तिथे पोहोचलो. आता फक्त बाजूच्या रस्त्याने वाचनालयामागे जायचे आणि प्रॉब्लेम मधून सुटायचे. या सध्या विचारानेही मनाला समाधान वाटले. पण हाय रे दैवा ! वाचनालयाच्या दारातून माझ्या बहिणीची मैत्रीण बाहेर पडत होती. आमची अगदी समोरासमोर गाठ पडली.

“हाय...!!!” तिने अगदी लडिवाळपणे हाय केले. आईशप्पथ सांगतो... अगदी कलेजा खलास झाला आपला. पण काय करणार? आजची परिस्थिती अनुकूल नव्हती.

“हेल्लो... काय ठीक आहे ना?” चेहरा कसनुसा करत मी प्रश्न केला.

“हे काय रे? तुझा चेहरा असा वैतागलेला का? माझ्याशी बोलणे तुला इतके जीवावर येते?” तिने चेहऱ्यावर मिश्कील भाव आणत पुढचा प्रश्न केला आणि माझे टाळकेच सरकले. अगदी खरमरीत उत्तर द्यावेसे वाटले त्या वेळेस पण परत त्यातही वेळ गेला असता. बरे ती समोरच वाटेत उभी. तिला “चल सरक बाजूला....” असे तरी कसे सांगणार? आणि असे सांगितले तर परत आपला पत्ता कायमसाठी कट व्हायचा ही देखिल भीती. आता देवाला शरण जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. उत्तर तर द्यावेच लागणार होते.

“नाही गं... वैताग नाही... आनंद झाला आहे... इतका की तो आता पोटात मावत नाहीये... अजून काही वेळाने ओसंडून वाहायला लागेल.” खरं तर मी वैतागानेच बोललो होतो. पण ती मठ्ठ डोक्याची... सोडायला तयारच नव्हती.

“अरे आनंद म्हणतोय आणि मग चेहऱ्यावर असे १२ का वाजले आहेत?” तिचा पुढचा प्रश्न आणि माझ्या कपाळावर आठ्या आल्या. मनात म्हटले भले भविष्यासाठी दुसरी पाहू, पण किमान आत्ता तरी हिला वाटी लावू... पण तेवढ्यात देवाची कृपा झाली आणि तिची मैत्रीण तिथे आली. हिची गाडी लगेचच तिच्याकडे वळली आणि मी सुसाट सुटलो. आता मात्र धावण्याशिवाय पर्यायच नव्हता. टॉयलेटचे दर्शन झाले आणि मी सुखावलो. जीवनातील सगळ्यात मोठ्या आनंदाची अनुभूती मी ‘मोकळं’ होताना घेतली. बाहेर इतकं रटरटीत उन असतानाही मला त्यावेळेस अगदी आल्हाददायक वाटत होतं.

हाच तो क्षण आहे जो मला जीवनातील सगळ्यात मोठा आनंद देऊन गेला. सामान्य परिस्थितीत इतरांना ही गोष्ट भलेही पटणार नाही, पण ज्यावेळेस अशी वेळ येते त्यावेळेस मग यापुढे इतर सर्व गोष्टी गौण वाटू लागतात. काय म्हणता पटत नाही अजून? ठीक आहे... अनुभव हीच खात्री... जेंव्हा कधी तुमच्यावर अशी वेळ येईल तेंव्हा तुम्हाला माझे बोल प्रकर्षाने आठवतील हे नक्की...

Friday, 3 August 2018

व्यसन - २

सध्या मला एक तात्पुरते व्यसन लागले आहे. तात्पुरता हा शब्द यासाठी वापरला कारण हे व्यसन तसे येऊन जाऊन असते. आधी माझे व्यसन माझ्या बरोबरच इतरांनाही वरदान वाटायचे. पण आता मात्र त्या व्यसनाचा इतरांना नाही पण मलाच त्रास व्हायला लागला आहे. एकतर वेळ वाया जातो तो जातोच पण लोकं सुद्धा माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझी शोधक नजर सतत भिरभिरत असते. आणि एकदा का ती गोष्ट माझ्या नजरेस पडली, मनाला असुरी आनंद होतो. बरे तो झालेला असुरी आनंद माझ्या चेहऱ्यावर लोकं पाहू शकतात हो. डोळ्यात क्रूरतेची चमक आणि चेहऱ्यावर आलेले छद्मी हास्य काही केल्या लपत नाही.

आजही अशीच पहाटे जाग आली. खोलीत अंधार होता. हाताने चाचपडल्यावर लगेच मोबाईल हाती आला. त्यात पाहिले तर पहाटेचे पाच वाजले होते. म्हणजे माझा दिवस चालू झाला तर. उठून उभा राहिलो. ट्यूब लावली आणि उशाशी ठेवलेली बॅट हातात घेतली. डास मारण्याची हो. भिंतींवर पाहिले तर अनेक डास; माझे मुळातच कमी असलेले रक्त पिऊन तट्ट फुगले होते. ते पाहून भयंकर राग आला. म्हणजे पैसे आपण कमवायचे, त्यातून भाजीपाला आपण आणायचा. त्याचा स्वयंपाक आपण बनवायचा. ते खाऊन त्याचे रक्तही आपणच बनवायचे आणि हे शहाजूक... त्यांची ती टोकदार सोंड आपल्या शरीरात खुपसणार आणि आपण कष्टाने बनवलेले रक्त भसाभसा पिणार. बरे आधाशीपणालाही काही लिमिट? पार अगदी उडताही येणार नाही इतके ते आपले रक्त पिऊन फुगलेले असतात. असो... त्यांना तिथे निवांत बसलेले पाहून डोक्यात सनक आली, चेहरा भेसूर बनला, त्यावर छद्मी हास्याची एक लकेर उमटली आणि माझ्यातली चपळता पणाला लावूनच मी भिंतीजवळ पोहोचलो. बॅटचे बटन दाबून त्यात विद्युतप्रवाह खेळता केला आणि ती डासाजवळ नेली. बॅटची चाहूल लागताच तो उडाला आणि नेमका तिथेच फसला. त्याच्या पंखांचा बॅटला स्पर्श होताच ‘चट’ असा आवाज आला आणि मग एकानंतर एक चार आवाज निघाले. बॅटमधून ठिणग्या उडाल्या आणि मग तो घाणेरडा दर्प. एकतर तो वास मला बिलकुल आवडत नाही. पार अगदी डोक्यात जातो. पण असे असूनही माझा मोर्च्या इतर डासांकडे वळवला. एकानंतर एक असे अनेक डास मारले. त्या ‘चटचट’ आवाजाने भाऊही उठला.

‘झालं भो तुझं चालू... अगदी सकाळी उठल्या उठल्या पाप करायला सुरुवात होते तुझी...’ भाऊ हसत म्हणाला.

‘पाप? आणि मी?’ भिंतीवरील नजर जराही न वळवता मी प्रश्न केला.

‘हो... पापच... हे एवढेसे जीव तू किती निर्दयीपणे जाळतोस. आणि समजा ते खाली पडले तर पायाने चिरडतोस. याला पाप नाही तर काय म्हणायचे?’ त्याने विश्लेषण केले.

‘याला पुण्य म्हणतात.’ मी उत्तर दिले.

‘पुण्य? ते कसे काय?’ त्याने विचारले.

‘अरे डास या तुच्छ योनीतून मी त्यांना मुक्ती देतो. हे पुण्याचेच काम आहे. त्यांच्यासाठी मी मुक्तिदाता आहे.’ मी माझा तर्क मांडला. त्यावर तो काय बोलणार?

‘मी किचन मध्ये चहा करायला जातो आहे. तिकडे येऊ नकोस... चहात पडला एखादा डास तर मला डबल काम होईल.’ असे म्हणून तो चहा करायला निघून गेला. मी मात्र माझे पुण्याचे काम इमानेइतबारे करत राहिलो. एकेक करून चारही रूम मधील डास यमसदनाला पाठवले आणि मोर्चा प्यासेजकडे वळवला. सूर्यही चांगलाच वर आला होता. प्यासेजमध्येही फटाके फुटण्याचे आवाज येऊ लागले तसे शेजारचे काका बाहेर आले. माझा तो अवतार आणि माझे कार्य पाहून त्यांनाही आनंद झाला. ‘तो बघ तिथे, हा पहा उडाला, हा इथे...’ अशा सूचना ते देऊ लागले. मीही कधी उड्या मारून तर कधी खाली बसत डास शोधून शोधून मारू लागलो. इतक्यात काकूही बाहेर आल्या.

‘कायरे? काय करतोयस?’ त्यांनी त्यांच्या चिरक्या आवाजात विचारले. साला हे लोकं डोळे असूनही असे प्रश्न कसे काय विचारू शकतात? मनात विचार आला. एखादे खरमरीत उत्तर द्यावे पण परत तिथेही संस्कार आडवे आले. आपल्यापेक्षा वयाने, मानाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला असे उत्तर देणे योग्य नाही म्हणून मन आवरले.

‘काही नाही काकू... शिकार करतोय...’ मी उत्तर दिले. पण माझ्या वाक्यातील उपरोध काही काकूंना समजला नाही.

‘शिकार होय... छान... पण आता इथले डास संपले आहेत. आमच्या घरात ये. खूप शिकार मिळेल तुला.’ जवळपास हात धरूनच त्यांनी मला आत बोलावले. माझ्या बरोबर काकाही आत आले. परत आमच्या दोघांची शोधक नजर सर्वत्र फिरू लागली. पण एक डास दिसेल तर शपथ. जवळपास दहा मिनिटे हातात बॅट घेऊन मी डास शोधत होतो. पण व्यर्थ... शेवटी कंटाळलो आणि माझ्या घरात आलो.

‘काय रे... काकूंनी कशाला बोलावले होते?’ भावाने विचारले.

‘काही नाही रे... डास मारायला.’ मी उत्तर दिले.

‘आणि तू गेलास?’ त्याने आश्चर्याने विचारले.

‘हो... का?’ मी गोंधळलो.

‘हेहेहे... तुला एक सांगू... तुला आता हे व्यसन लागले आहे. इतके दिवस फक्त घरातले डास मारत होतास आणि आता लोकांकडेही जाऊ लागला आहेस. वेळीच यावर उपाय कर नाहीतर तुझे आडनाव बदलावे लागेल आणि तू स्वतःची ओळख मिलिंद जोशी ऐवजी मिलिंद डासमारे अशी करून देऊ लागशील.’ त्याने हसत सांगितले आणि मी विचारात पडलो. आता मी माझ्या या व्यसनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण हे डास हो... साले सारखे माझ्या जवळ येऊन गुनगुन करतात आणि माझ्या व्यसनमुक्तीमध्ये बाधा निर्माण करतात. बावळट कुठले. साल्यांना लाजही वाटत नाही गुनगुन करताना. याच जवळ... बॅट घेऊनच बसलोय मी...

Sunday, 29 July 2018

संकल्प

मी केलेल्या संकल्पांची यादी केली तर पानेच्या पाने भरतील, पण त्यातील पूर्ण किती झाले असे विचारले तर मात्र मला डोके खाजवावे लागणार हे नक्की. असे नाही की सगळेच अपूर्ण राहिले, पण १००% केलेला संकल्प पूर्ण झाला असे किमान अजून तरी घडले नाही. आणि अजूनही मी संकल्प करणे सोडलेही नाही. आजकाल मला संकल्प करण्याचं व्यसनच लागलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. म्हणजे दर दिवसाआड मी एखादा संकल्प करतो. अर्थात तो ऑफिस मधून घरी जाईस्तोवर बऱ्याचदा विसरलेलाही असतो. पण जर कधी चुकून लक्षात राहिलाच तर माझा आळशीपणा त्याला पूर्ण होऊ देत नाही. तसे पूर्ण न झालेले संकल्प सांगायचे झाले तर... मला व्यायाम करून बॉडी बनवायची होती, क्रिकेट खेळताना किमान एकदा तरी विरुद्ध टीमच्या प्लेअरचा कॅच पकडायचा होता, आयुष्यात एकदा तरी तमाशातील सवाल जवाब लाईव्ह पहायचा होता, किमान एकदा तरी शाळा / कॉलेजमध्ये असताना किमान एका विषयात तरी पहिले यायचे होते, शाळेत असताना एकदा तरी वर्गातील मुलांवर दादागिरी करायची होती... पण साला नशीबच पांडू... बरेच प्रयत्न केले पण यश काही मिळाले नाही.

आजही मी माझ्या अशाच एका अपूर्ण राहिलेल्या संकल्पाबद्दल बोलणार आहे. हा संकल्प बहुतेक विद्यार्थी त्यांच्या शाळा / कॉलेजच्या दरम्यान करतात. काही जण तर त्यानंतरही करतात. त्यातील काहींना यश येते तर काहींच्या नशिबी फक्त निराशा येते. माझ्यासारखी... हा संकल्प म्हणजे इंग्रजांच्या भाषेत फाडफाड बोलणे.

ज्या ज्या वेळेस एखादया चिकण्या पोरीला फोनवर इंग्लिश मध्ये बोलताना पाहतो, त्यावेळेस तर मला हा संकल्प हटकून आठवतो. मला अजूनही आठवते... सर्वात प्रथम हा संकल्प मी इयत्ता ९वी मध्ये केला होता. कारण होते आमच्या वर्गाची मॉनेटर. ती दिसायला जशी सुंदर होती तशीच ती खूप हुशारही होती. आता तुम्हीच सांगा, सगळेच काय एकसारखे असतात का? पण तिला हे कुणी सांगावे? ती आमच्या कडून इंग्लिशचे स्पेलिंग पाठ करून घ्यायची. तसा मी कोणत्याही शिक्षकाला घाबरत नव्हतो, पण तिला घाबरायचो. त्या दिवशी तारीख वार काय होता हे आता आठवत नाही पण आमचे इंग्रजीचे सर काही कारणांनी रजेवर होते आणि वर्गावर यायला इतर कुणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे मग आमच्या शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी तिलाच आमचा वर्ग तो पूर्ण तास सांभाळण्यास सांगितले. झाले... माकडाच्या हातात कोलीतच मिळाले. तिने लगेच एकेकाला स्पेलिंग विचारणे चालू केले. एकेकाला उभे करून स्पेलिंग विचारले जात होते. समजा त्याने बरोबर सांगितले की त्याच्या पुढच्या पासून दुसरे नाहीतर जोपर्यंत बरोबर स्पेलिंग येत नाही तोपर्यंत तेच चालत राहायचे. माझा नंबर आला आणि तिने एकदम अवघड स्पेलिंग विचारले... गर्लचे... म्हटलं बोंबला... तसचं मनातल्या मनात स्पेलिंग बनवलं आणि सांगितलं... garl.

“चूक..., जा पुढे जाऊन उभा रहा.!!!” आता न जाऊन सांगतो कुणाला? गुमान समोर जाऊन उभा राहिलो. माझ्यानंतर अजून ६ जण माझ्या शेजारी उभे राहत गेले. आणि तेवढ्यात आमचे उपमुख्याध्यापक पोळ सर वर्गावर आले. आम्ही तिथे का उभे आहोत याची त्यांनी विचारणा केली. अर्थात आम्ही कसले सांगतोय... पण तिने लगेच सांगितले...

“सर... यांना गर्लचे स्पेलिंग येत नाही...” अस्सा राग आला मला... पण बसलो शांत.

“अरे येड्यांनो... बाकी काही आले नसते तरी चालले असते रे... पण तुमचे तर गर्लशीच वावडे...” अर्थात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातील खोच काही नीटशी समजू शकली नाही.

“चला हात पुढे करा...” चांगल्या सणसणीत दोन छड्या खाल्ल्या आणि जागेवर जाऊन बसलो. माझ्या शेजारी बसणारा संदीप्या हसत होता. खूप राग आला मला त्याचा... आणि तिचा सुद्धा... लगेच ठरवले, परत अशी वेळ येवू द्यायची नाही. तसा संकल्पच केला. घरी आल्या आल्या रॅपीडेक्स इंग्लिश स्पिकिंगचे पुस्तक हातात घेतले. पहिले दोन तीन पाने वाचून झाली आणि इंग्रजीतले काळ माझ्या पुढे काळ बनून आले. झालं... सगळं अवसान गळालं... अर्थात तो पर्यंत गर्लचं स्पेलिंग मात्र पाठ केलं होतं.

दहावीला रट्टा मारून कसातरी इंग्लिश विषयात काठावर पास झालो. कॉलेजला आलो त्यावेळेस आपण पूर्वी काही संकल्प केला होता हे पूर्णपणे विसरलो होतो. १२वी पास होऊन एफ वायला आलो आणि कॉलेज सुरु झाले. काही दिवसांनी उशिरा प्रवेश घेऊन रुपाली वर्गात दाखल झाली. एकदम पहिल्या नजरेतच आवडली आपल्याला. पण ती इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी असल्याने बऱ्याचश्या वेळेस तिचे संभाषण इंग्रजीतच असे. त्यामुळे पुन्हा एकदा मला माझा संकल्प आठवला आणि अडगळीत टाकलेले रॅपीडेक्स पुन्हा डेस्कवर आले. मग मित्रांबरोबर इंग्रजीत बोलण्याचा सराव सुरु झाला. जवळ जवळ १५/२० दिवस हे सगळे सुरळीत चालू होते पण नंतर तिचे आमच्याच वर्गातील एका मुलाबरोबर अफेअर चालू झाले असे ऐकले आणि मुडच गेला. साला आपले नशीबच पांडू...

त्यानंतर टी वायला आलो. वर्षाअखेरीस तोंडी परीक्षा असते आणि त्या वेळेस बाहेरून येणारे सर इंग्रजीत प्रश्न विचारतात असे मला समजले आणि तोंडचे पाणीच पळाले. मनात म्हटले... ही इंग्रजांची भाषा काय आपल्याला धड जगू देत नाही... पण पर्याय नव्हता. त्यामुळे परत एकदा संकल्पाची आठवण झाली आणि तोंडी परीक्षेच्या ८ दिवस आधी, परत रॅपीडेक्स वर आले. पण या वेळेस मात्र पुस्तकाबरोबर त्याची फाटलेली पाने चिटकवण्यास फेविकॉलही बाहेर काढावा लागला. पुन्हा एकदा परत पहिल्या पासून अभ्यास चालू झाला. कारण फक्त इतकेच होते की जर सरांनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला तर किमान समजला तर पाहिजे. तोंडी परीक्षेचा दिवस उजाडला. माझा नंबर आला. मी जरा घाबरत घाबरतच सरांपुढे हजर झालो. माझा नंबर खुपच मागे असल्यामुळे आणि वेळही संपत आल्यामुळे सरांनीही अगदी जुजबी प्रश्न शुद्ध मराठीत विचारले आणि आवरते घेतले. झाले... परत एकदा रॅपीडेक्स पुस्तका सारखाच माझा संकल्पही अडगळीत गेला.

नंतर नोकरीच्या वेळेस इंटरव्यू साठी आणि इतर २/३ वेळेस परत संकल्पाची आठवण झाली, पण त्यापलीकडे काहीच घडले नाही. आताही मधून मधून त्याची आठवण येते. खास करून जर कुणी फेसबुकवर इंग्रजीत एखादी पोस्ट टाकली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती मुलगी असेल तर संकल्प आठवतो. मग कधी कधी फक्त लाईक करून तर कधी एखादी कमेंट कॉपीपेस्ट करून वेळ मारून नेतो. पण अजूनही मी हार मानलेली नाही... अजूनही या पूर्ण न झालेल्या संकल्पाला मनातून काढून टाकलेले नाही. आता माझ्याकडे रॅपीडेक्सचे पुस्तक नाहीये, पण त्याची जागा बऱ्याच ebook, VCD English Speaking Cources यांनी घेतलेली आहे. अजूनही मी मधून मधून त्याच्या अभ्यासाला बसतो. पण तितक्यात आठवते की जर आज साईट अपलोड झाली नाही तर पैसे मिळणार नाहीत. म्हणून परत त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कामांचा क्रम लावला जातो आणि नंतर त्या सीडी बाजूलाच पडतात. पुन्हा जेंव्हा कधी संकल्पाची आठवण येईल त्यावेळेस मदतीला धावून येण्यासाठी. अजून तरी हा संकल्प अपूर्णच आहे पण पुढे नक्कीच कधीतरी तो पूर्णत्वास जाईल अशी कुठेतरी एक आशाही आहेच.

Wednesday, 25 July 2018

डोंबारी

खूप दिवसांनी आज जरा मूड लागला होता. टिवल्या बावल्या सोडून मी चक्क पोटापाण्याचा प्रश्न सोडवत होतो... म्हणजे काम करत होतो... तेवढ्यात बाहेर ताशाचा आवाज चालू झाला. आधी साधारण वाटणाऱ्या आवाजाने चांगलाच ठेका धरला. आपसूकच नजर खिडकीतून बाहेर गेली. उन चांगलेच तापले होते. रस्ता नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. प्रत्येक गावाच्या कॉलेज रोडवर दिसणारे चित्र इथेही दिसत होते. तरुण मुले / मुली सुसाट वेगाने गाड्या चालवीत होते. तिथेच रस्त्याच्या कडेला एक डोंबारी बांबूचा त्रिकोण उभारून त्यावर दोरी बांधत होता. वय साधारण पस्तीशीचे असावे. एका बाजूला त्याची बायको आपल्या तान्ह्या बाळाला घेवून उन्हातच बसली होती. त्याचा मोठा मुलगा उभे राहून हातातील ताशावर ठेका धरत लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. बहुतेक तो आठ नऊ वर्षाचा असावा. त्याची लहान बहिण हातात काठी घेऊन आपल्या बापाच्या कामावर नजर ठेवून होती. अगदी काही वेळातच त्याने दोन बांबूचे त्रिकोण उभारून त्यावर दोरी बांधली. एकदा हाताने ती व्यवस्थित पक्की आहे की नाही याची खात्री केली आणि मग आपल्या साडेपाच सहा वर्षे वयाच्या मुलीला त्या दोरीवर चढवले. बॅलन्स सांभाळण्यासाठी हातात काठी दिली आणि त्या मुलीने दोरीवरून चालायला सुरुवात केली.

हे सगळे मी खिडकीतून पहात होतो. आताशा माझे इतर मित्रही माझ्या शेजारी येऊन उभे राहिले. ती मुलगी दोरीच्या मध्यावर आली आणि मग एकाएकी तिचे चालणे थांबले. ताशाचा आवाज जरा जास्तच जोरात येऊ लागला. काही क्षणातच त्या मुलीने त्या दोरीला हेलकावे द्यायला सुरुवात केली. क्षणाक्षणाला दोरीच्या हेलकाव्यांचा वेग वाढतच गेला. इतका वेळ कौतुकाने पहात असलेलो आम्ही, डोळे विस्फारून पाहू लागलो आणि तेवढ्यात माझा एक मित्र अगदी तोंडातल्या तोंडात बोलून गेला...

“आयला... साला थोडी जरी चूक झाली ना....” इतके बोलून त्याने वाक्य अर्धवट सोडले आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एकतर वाहता रस्ता आणि त्यातून भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्या. बरे दोरीच्या हेलकाव्यांचा वेगही बराच. आता मात्र डोके भाणाणले. नाही नाही ते विचार डोक्यात येऊ लागले. तेवढ्यात दुसरा एक मित्र बोलून गेला.

“यार... आपण इतका विचार करतोय पण तिचा बाप मात्र तिथेच उभा राहिलाय. साला त्याला असे जीवघेणे खेळ करायला काय होतंय? या लहान मुलीला काही झाले तर?” अगदी हाच विचार माझ्याही मनात आला. शेवटी आपण त्याला हे बोलायचेच हा विचार करून मी ऑफिसमधून बाहेर पडलो. रस्त्यावर आलो त्यावेळेस ती मुलगी त्या दोरीवर एक सायकलच्या चाकाची रिंग ठेवून त्यावर कसरत करत होती. काही वेळ तिथेच तिच्या कसरती पहात उभा राहिलो. खरे तर तीच्या कसरती पाहण्यापेक्षा जर काही प्रॉब्लेम झाला तर लगेच त्यानुसार हालचाल करणे सोपे जावे हाच मनात हेतू होता. हळूहळू तिथे लोक जमू लागले. अर्थात त्यात शाळेच्या मुलांचीच गर्दी जास्त होती. दोनचार वयस्कर व्यक्तीही होत्या. तेवढ्यात त्या डोंबाऱ्याने त्या मुलीच्या हातात दोन स्टीलच्या डिश दिल्या. काठीच्या आधारे बॅलन्स सांभाळत तिने त्या दोरीवर ठेवल्या आणि त्या डिशमध्ये पाय ठेवून परत तिच्या कसरती चालू झाल्या. इतका वेळ तळपायाने दोरी धरणे शक्य होते पण आता मात्र ते सगळे अशक्यप्राय वाटत होते. ती मुलगी मात्र अगदी निर्भयपणे तिच्या कसरती मन लावून करत होती.

आपण मध्येच काही बोललो आणि ती मुलीचे लक्ष विचलित झाले तर? हा विचार करून मी अगदी शांत उभा राहिलो. जवळपास ५/७ मिनिटात तिचा खेळ संपला आणि त्या डोंबाऱ्याने तिला खाली उतरवले. ती खाली उतरली तशी बरीचशी मंडळी आपापल्या दिशेने निघून गेली. जसे आपण त्या गावचेच नाही. ती मुलगी जेव्हा थाळी घेवून समोर आली त्यावेळेस मी जरासा भानावर आलो. अगदी नकळत हात खिशात गेला. हाताला आलेली नोट थाळीत टाकली. काहीही न बोलता ती मुलगी शेजारच्या व्यक्तीसमोर जाऊन उभी राहिली. एक शब्दही न बोलता जवळपास तिने १०/१२ नोटा गोळा केल्या आणि मग त्या तिच्या आईच्या हातात नेवून दिल्या. तो पर्यंत डोंबारी बांधलेली दोरी सोडून मोकळाही झाला होता.

तेवढ्यात मला आठवले. मी त्या डोंबाऱ्याला बोलायला म्हणून खाली आलो होतो. कोणतीही भीडभाड न बाळगता त्या डोंबाऱ्याजवळ गेलो.

“क्या यार... इतनी छोटी बच्चीसे ऐसे काम करवाते हो?” काहीशा नाराजीने मी म्हटले. त्याने आधी माझ्याकडे पाहिले आणि नंतर फक्त ओशाळल्यासारखे हसला. बोलला काहीच नाही. त्याच्या नजरेतील भाव मात्र मला काही केल्या समजले नाहीत.

“एक छोटीसी गलती भी बहोत भारी पड सकती है...” मी माझे बोलणे चालूच ठेवले. यावरही त्याने काहीही उत्तर दिले नाही. शेवटी मी तरी काय बोलणार? तसाच माघारी वळलो आणि ऑफिसमध्ये आलो. येताना मात्र मनात एक प्रकारचे समाधान होते. मनात आलेली गोष्ट बोलून दाखविल्याचे.

“काय रे... झाली का तुझी समाजसेवा?” एका मित्राने टोमणा मारला. अस्सा राग आला त्याचा.

“साला... तुमच्यासारखे लोकं असतात ना, त्यांचा मला भयंकर राग येतो... स्वतः तर काही करत नाहीतच पण जे दुसरे करतात त्यांनाही टोमणे मारतात.” मी रागात बोलून गेलो. मी भडकलेला पाहून त्याने जरा नमते घेतले.

“अरे पण त्या डोंबाऱ्याला काय म्हणत होतास तू?” त्याने विचारले.

“काय म्हणजे? मी त्याला बोलून टाकले... लहान मुलीकडून असले काम करून घेताना तुला काहीच वाटत नाही का म्हणून...”

“मग? काय म्हणाला तो?” मित्राने विचारले.

“काय बोलणार? गप्पं बसून फक्त माझ्याकडे पाहून विचित्र हसला...” मी वैतागुन उत्तर दिले.

“तुला काही प्रश्न विचारू?” काही वेळ थांबून मित्राने मला विचारले.

“हो... विचार ना...”

“तू त्या लहान मुलीला किती पैसे दिलेस?”

“माहिती नाही... हातात नोट आली ती तिच्या थाळीत टाकली.” मी उत्तर दिले.

“का?”

“अरे एवढीशी पोर ती... दिवसातून किती वेळेस जीवघेणा खेळ करते आपल्या कुटुंबासाठी. आणि तो तिचा बाप... हिला थोड्या थोड्या वेळाने मृत्युच्या खाईत लोटतो. हरामखोर साला... काहीच कसे वाटत नाही त्याला?” मी चिडून बोलत होतो.

“समजा हा खेळ त्या माणसाने केला असता तर तू त्याला इतके पैसे दिले असतेस?” मित्राचा पुढचा प्रश्न आला आणि मी विचारात पडलो. खरंच... दिले असते का मी इतके पैसे?

“अरे बोल ना...” मी काहीच उत्तर देत नाही हे पाहून मित्राने परत विचारले.

“नाही... नसते दिले...” मी प्रामाणिकपणे उत्तर दिले.

“मिळाले उत्तर तुला? तू त्या डोंबाऱ्याला विचारलेल्या प्रश्नाचे?” मित्र हसत हसत म्हणाला आणि मी गोंधळलो.

“असंच असतं... तो डोंबारी याचमुळे हसला. त्या छोट्या मुलीला असे जीवघेणे खेळ खेळावे लागतात ते तुझ्या सारख्या मानसिकतेच्या लोकांमुळे. मी त्या मुलीला पैसे दिले नाहीत कारण तिला पैसे मिळाले तर ते काम तिला कायमच करावे लागेल म्हणून. ती मोठी झाली की तिची लहान बहिण तिची जागा घेईल. याचाच अर्थ त्या चिमुरड्यांकडून असले जीवघेणे खेळ करून घेतले जातात त्यात तिच्या बापापेक्षा जास्त दोषी तुझ्यासारखे लोकं आहेत. जर हाच खेळ त्या डोंबाऱ्याने केला असता तर मात्र मी त्याला नक्कीच पैसे दिले असते. तू पाहिली ती नाण्याची एक बाजू आणि मी पाहिली ती नाण्याची दुसरी बाजू आहे.” मित्र बोलून गेला आणि मलाच अपराधी वाटू लागले. खरंच काही गोष्टी जशा दिसतात, त्या तशाच असतील असे नाही.

Tuesday, 24 July 2018

फोन

आजकाल माझी कानपूर लाईन जरा विक झालेली आहे. त्यातूनही जर कुणी फोनवर बोलत असेल तर अजून जरा जास्तच. त्यामुळे आजकाल मला माहित नसलेल्या नंबरवरून फोन आला की उगाचच घाबरायला होतं. सगळ्यात पहिली भीती म्हणजे कुणी थकलेले बिल तर मागत नाही ना? ही. अर्थात मी त्या बाबतीत जरा निर्ढावलो आहे. असा फोन आला कि मी सरळ सांगून टाकतो.

“हे पहा... माझ्या स्वतःच्या मालकीची फक्त एक गोष्ट आहे. माझा फोन. पाच वर्षांपूर्वी घेतला तेंव्हा त्याची किंमत अडीच हजार रुपये होती. पाहिजे तर जो पर्यंत मी बिल भरत नाही, तोपर्यंत तुम्ही तो घेऊन जा. बिल भरल्यावर मला परत करा... म्हणजे पैशांचा तकादा लावणाऱ्या लोकांच्या तावडीतून मीही सुटेल आणि माझी वस्तू जप्त करून योग्य कारवाई केली म्हणून तुम्हीही सुटालं... काय?”

माझे हे उत्तर ऐकून खूप जणांनी आता मला फोन करणे सोडले आहे. त्यामुळे ती भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. आता दुसरी भीती म्हणजे समोरची व्यक्ती माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलू लागली तर? अर्थात यासाठी ही मी एक नवीन उपाय शोधला आहे. फोनवर मी “हेल्लो” न म्हणता “रामराम” म्हणतो. अपोआपच समोरची व्यक्ती मराठी किंवा हिंदीत स्वतःच बोलू लागते... हेहेहे... आता उरलेली तिसरी भीती म्हणजे समोरच्या व्यक्तीने बोललेले मला नीट ऐकू आले नाही तर? किंवा नीट समजले नाही तर? या भीतीवर मात्र अजून मला उपाय सापडलेला नाही.

काल असेच झाले. कॉम्प्युटरवर काम चालू होते. ( हो... कधी कधी फेसबुकमधून वेळ मिळाला तर काम देखील करतो मी. ) कामात अगदी तल्लीन झालो होतो आणि इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. मोबाईलवर नजर टाकली. अनोळखी नंबर होता. मनात जरा धडकी भरली. फोन उचलावा कि उचलू नये याचा विचार केला, पण मोबाईलची रिंग काही केल्या बंद होईना. शेवटी धारिष्ट्य केले आणि फोन रिसीव्ह केला. पलीकडून आवाज आला.

“हेल्लो... मिलिंद सर?” कुणीतरी अगदी बारीक आवाजात बोलत होती. म्हणजे ते इतर कुणाला समजू नये म्हणून कुजबुजतात ना... तस्सेच.

“हो... बोलतोय...”

“ते आपलं केलं का?” पलीकडून प्रश्न विचारला गेला. आता या प्रश्नाचा जर संदर्भ माहिती नसेल तर काय काय अर्थ निघू शकतात? त्यातून आवाज असा अगदी बारीक... कुजबुजल्या सारखा. मी गोंधळलो.

“आपलं काही आहे? मग मला कसं नाही माहित?” साला एका पोरीने मला अगदी हळू आवाजात, कुजबुजल्या सारखा, अनोळखी नंबर वरून असा प्रश्न विचारला तर माझा काय समज होणार?

“हो तर... आहेच मुळी... मी आपल्या नेहमीच्या कामाबद्दल विचारते आहे.” तिने तितक्याच हळू आवाजात सांगितले. आता मात्र मी चक्रावलो. खरंच काही वेळेस माणसे असे संदिग्ध का बोलत असावेत?

“नेहमीचे काम? आणि आपण दोघे मिळून करतो?” मी आश्चर्यचकित झालो.

“अहो... हो... आपणाला दोघांना मिळूनच करावे लागते... कुणा एकट्याला शक्य नाहीये...” संभ्रम वाढतच होता.

“काय बोलताय तुम्ही? समजतंय का तुम्हाला?” मी वैतागलो.

“खरे तेच बोलतेय मी... पण तुम्ही असे का विचारीत आहात?” समोरून अगदी थंड आवाजात मला उलट प्रश्न विचारला गेला. शेवटी मनात म्हटलं नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.

“हेल्लो... तुम्ही कोण बोलताहेत ते सांगता का?” शक्य तितक्या सौम्य आवाजात मी विचारले.

“मी प्रिया बोलतेय... xxx कंपनी मधून... माझा आवाज नाही का ओळखला तुम्ही?” तिने असे सांगितले आणि मग माझी ट्यूब पेटली. माझ्या क्लाईन्टच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या म्याडमचा तो फोन होता. आणि त्या म्हणाल्या तसे आम्हाला दोघांना मिळूनच काम करावे लागत होते. साईटवर काय अपडेट करायचे हे त्या सांगत होत्या आणि मी ते बदल करत होतो.

“ओके ओके म्याडम... मेल पाहतो आणि चेंजेस करतो...” असे म्हटले आणि फोन ठेवला. एरवी अशा लहानसहान गोष्टी मी मनावर घेत नाही पण काल मात्र ठरवले, म्याडमसोबत याबद्दल बोलायचेच.

संध्याकाळची वेळ होती. मी म्याडमच्या ऑफिसला पोहोचलो. मी सहसा काम असल्याशिवाय जात नाही त्यामुळे मला पाहून तिथे काम करणाऱ्या स्मिता म्याडमने मला येण्याचे कारण विचारले.

“बोला सर... काय काम आहे?”

“प्रिया म्याडमला भेटायचे आहे.” मी उत्तर दिले.

“ती बँकेत गेली आहे. येईलच १० मिनिटात... मी काही मदत करू शकते का?” त्यांनी आदबीने विचारले.

“नाही... खाजगी काम आहे त्यांच्याकडेच... मी वाट पहातो.” आता खाजगी काम म्हटल्या बरोबर स्मिता म्याडमची उत्सुकता ताणली गेली.

“काही विशेष?” त्यांनी जरासे बिचकत बिचकत विचारले.

“हो... त्यांना एक गोष्ट विचारायची आहे.” मी उत्तर दिले. तितक्यात प्रिया म्याडम तिथे आल्या. त्यांचा ऑफिस मध्ये प्रवेश होतो न होतो तोच स्मिता म्याडमनी त्यांना ओरडून सांगितले.

“प्रिया... तुला भेटायला सर आलेत. तुझ्याकडे काही खाजगी काम आहे त्यांचे...” हे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील मिश्कील हसू माझ्यापासून लपू शकले नाही. स्मिता म्याडमच्या या वाक्यातील खोचकपणा प्रिया म्याडमच्याही लक्षात आला. त्यांनी डोळ्यांनीच स्मिता म्याडमला दटावले.

“बोला सर...”

“एक प्रश्न विचारायचा होता...” मी मुद्दामच जरा हळू आवाजात विचारले.

“हो... विचारा ना...”

“इथे विचारला तर चालेल? जरा खाजगी आहे.” मी सुद्धा आता असेच बोलत होतो ज्याने संभ्रम निर्माण होईल.

“मी बाजूला जाऊ का?” काहीसे मिश्किलपणे स्मिता म्याडमने प्रिया म्याडमला विचारले.

“ए... गप बसं गं...” तिच्याकडे पाहून प्रिया म्याडमने उत्तर दिले. नंतर त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला.

“हे पहा सर... काय विचारायचे ते इथेच विचारा.” त्यांनी जरा मोठ्या आवाजात मला सांगितले.

“पहा हं... तुम्हाला राग तर नाही ना येणार?” मी.

“ते प्रश्न काय आहे त्यावर अवलंबून आहे.” त्यांनी उत्तर दिले.

“ठीक आहे तर. नंतर मला दोष देऊ नका.”

“आता विचारताय की मी सरांना फोन करून सांगू?” त्यांनी मला सरळ सरळ दमच दिला. त्यांचा चेहराही जरासा तापल्यासारखा वाटत होता. आता जास्त ताणने योग्य नव्हते.

“तुम्ही फोनवर इतक्या हळू आवाजात आणि कुजबुजल्या सारखे का बोलतात?” मी माझा प्रश्न विचारला. आधीच त्या बाहेरून वैतागून आल्या होत्या आणि त्यात मी त्यांना असा पांचट प्रश्न विचारला. त्यांचा पारा चढला.

“मी कशीही बोलेन... तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?” त्यांनी चिडून विचारले.

“अहो प्रॉब्लेम काय म्हणून काय विचारता? एकतर तुमचा आवाज इतका बारीक आणि नाजूक. माझ्या सारख्याला फोनवर व्यवस्थितपणे तो ऐकू येत नाही. बरे समजा ऐकू आला तरी जर तो ओळखू आला नाही तर तुमच्या बोलण्याचा मला संदर्भच लागत नाही.” मी आता खरे ते सांगितले.

“आज सकाळी देखील तुमचा फोन आला. अनोळखी नंबर वरून आणि तुम्ही म्हणालात काय कि, ‘ते आपलं केलं का?’ आता मला जर तुमचा आवाजच ओळखू आला नाही तर संदर्भ कसा लागणार? आणि संदर्भ लागला नाही तर या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं?” मी मनातले बोलून टाकले. माझ्या या प्रश्नांवर स्मिता म्याडम मात्र मनसोक्त हसत होत्या. प्रिया म्याडमलाही त्यांचे काय चुकले हे समजून आले.

“तुम्ही माझा आवाज खरंच नाही ओळखला?” प्रिया म्याडमने हसत हसत विचारले.

“अहो... इतक्या हळू आवाजात अमिताभ बच्चन जरी बोलला तरी आपल्याला फोनवर ओळखू येणार नाही...” मी.

“म्हणजे फक्त हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आले होते?” स्मिता म्याडमने मला विचारले.

“हो... बाकी काही नाही... फक्त एवढ्या साठीच...” मी उत्तर दिले.

“अहो सर... मग मला स्पष्ट सांगायचं ना...” प्रिया म्याडम हसत हसत म्हणाल्या.

“अरे वा... असं कसं? तुम्ही हळू बोलतात ते चालतं, तुमचं बोलणं संदर्भ लागला नाही तर समजत नाही हेही चालतं. पण मी मात्र स्पष्ट बोलायचं... वा रे वा... भले बहाद्दर...” मी डायरेक्ट बोलून टाकले आणि मग त्यांच्याकडूनच फुकटचा चहा पिऊन घरी आलो.

आज सकाळी सकाळीच फोन वाजला. मी अर्धवट झोपेत होतो. परत अनोळखी नंबर... फोन उचलला. पलीकडून कुणी मुलगी बोलत होती. आवाज मात्र खूप गोड वाटला फोनवर.

“सर... आज येवू का?”

आयला... आता हे काय नवीन लफडं? पण इतक्या गोड आवाजाला नाही तरी कसे म्हणणार? ‘ये’ म्हणून सांगितलं... पण ती कोण आणि का येणार हे मात्र ती आल्यावरचं समजेल.

Saturday, 21 July 2018

स्वभाव

माझा आजचा स्वभाव आणि काही वर्षांपूर्वीचा स्वभाव यात बराच फरक पडलेला आहे. खास करून जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना तर माझ्यातील हा बदल खास करून जाणवतो. अगदी शुल्लक कारणही मला चिडचिड करण्यासाठी पुरेसं असायचं. हेच नाही तर मी कधी कुणाला चेष्टेत काय बोलून जाईल हे मलाही समजत नव्हतं. ज्यावेळेस लक्षात यायचं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असायची. बरे त्यासाठी माफी मागायची म्हटली तर माझा इगो आड यायचा. या कारणावरून माझे आणि वडिलांचे तर जवळपास दिवसाआड खटके उडत. इतकेच काय तर यासाठी जवळपास ७/८ वेळेस माझी ‘ग्रहशांती’ही केली आहे. पण माझ्यात काहीच फरक पडत नव्हता. घरचेही काहीसे वैतागले होते. त्यात काही जणांनी माझ्या आईला सांगितले की, तो वृश्चिक राशीचा असल्यामुळे त्याच्यात बदल होणे खूप कठीण आहे. त्यामुळे तिनेही आधी त्यावर विश्वास ठेऊन मला सुधारण्याचा प्रयत्न काहीसा पुढे ढकलला.

माझे कॉलेज संपले आणि आम्ही नाशिकला आलो. इथेही माझ्या वागण्यात फारसा फरक पडला नव्हता. पण नोकरीला लागल्यामुळे माझे घरात थांबणे कमी झाले होते. त्यातच माझ्या हाती शरद उपाध्ये सरांचे ‘राशीचक्र’ नावाचे पुस्तक आले. जोपर्यंत इतर राशींची स्वभाववैशिष्ट्ये वाचत होतो, पुस्तक छान वाटत होते. पण वृश्चिक राशीची सुरुवात झाली आणि माझी अस्वस्थता वाढू लागली. त्याचा भडका उडाला तो त्या पुस्तकातील एक वाक्य वाचून. त्यात असे वाक्य होते की, ‘मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा खूप क्रूर ग्रह असल्यामुळे या राशीमध्ये जन्मणारे लोकं धाडसी वृत्तीचे असतात. त्यातील मेष राशीचा व्यक्ती पोलीस असेल तर वृश्चिक राशीचा व्यक्ती गुंड किंवा अतिरेकी असतो.’ माझे डोके फिरायला इतके कारणही पुरेसे होते. माझ्यात असा अचानक झालेला बदल आईच्या लक्षात आला.

“काय रे? पुस्तक वाचता वाचता इतका का चिडलास?” आईने विचारले.

“मी कशाला चिडू?” अर्थात हे शब्दही मी चिडूनच उच्चारले होते त्यामुळे आईला हसू आले.

“काय हसतेस?” माझा पुढील प्रश्न आणि तिचे हसणे वाढले.

“तू आधी सांग... काय झाले ते... मग मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईन...” आईने सांगितले.

“अगं या पुस्तकात शरद उपाध्ये बघ काय म्हणताहेत... म्हणे वृश्चिक राशीचे लोकं अतिरेकी असतात. थांब आताच्या आता त्यांना पत्र लिहितो आणि देतो त्यांच्या पत्त्यावर पाठवून... ते असे कसे म्हणू शकतात?” माझा स्वर चिडकाच होता.

“आधी शांत हो... मला एक सांग, समजा तू त्यांना पत्र पाठवून जाब विचारलास आणि त्याचे उत्तर त्यांनी पाठवलेच नाही तर? तुझी चिडचिड अजूनच वाढणार ना? आणि समजा... त्यांनी तुझी अगदी माफी जरी मागितली तरी त्याचा तुला काय उपयोग? फक्त दोन मिनिटाचे समाधान... इतकेच?” आईने प्रश्नांचा भडीमारच केला.. अर्थात तीच्या कोणत्याच प्रश्नांचे उत्तर किमान त्यावेळेस तरी माझ्याकडे नव्हते.

“अगं पण... ते असे कसे म्हणू शकतात?”

“अरे ते त्यांचे मत आहे ना. त्यांना जसे अनुभव आले असतील; त्यावरून त्यांचे मत बनले असू शकतेच ना?”

“तू माझी आई आहेस की त्यांची?” मी जास्तच वैतागलो आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यामुळे तर मी जास्तच भडकलो. शेवटी तिनेच हसू आवरले.

“तुझीच आई आहे म्हणूनच तुला सांगते आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे देशील का?” तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला असे मला वाटले.

“हं...”

“मला सांग... शरद उपाध्ये देव आहेत की माणूस?”

“हा काय प्रश्न झाला? माझ्या दृष्टीने ते माणूस आहेत! अगदी सामान्य माणूस!! अतिसामान्य माणूस..!!!” मी काहीसे रागातच उत्तर दिले.

“बरं... कृष्ण देव आहे की माणूस?” तिचा पुढील प्रश्न.

“तो तर देवमाणूस आहे. काही देव मानतात, काही माणूस... माझ्या दृष्टीने तो देवच.”

“मग मला सांग, कोणी सांगितलेली गोष्ट जास्त महत्वपूर्ण?"

“कुणाची म्हणजे? कृष्णाचीच गोष्ट जास्त महत्वपूर्ण आहे.”

“ऐक तर मग, शरद उपाध्ये त्यांच्या पुस्तकात लिहितात की, माणूस त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागतो. पण गीतेत कृष्ण सांगतात की माणसाचे कर्म त्याच्या हातात आहे. जर प्रत्येक राशीचे व्यक्ती त्यांच्या राशीनुसार वागले असते तर त्यांना ओळखणे किती सोपे झाले असते? पण तसे घडते का? नाही ना? म्हणजेच स्वभाव बदलणे माणसाच्याच हाती आहे. ज्यावेळेस त्याला स्वतःला बदलायचे नसते; त्यावेळेस तो कोणते तरी कारण शोधत असतो. त्यातलेच एक प्रमुख कारण म्हणजे राशीस्वभाव. प्रत्येक राशींची काही ठळक वैशिष्ट्ये असतात असे राशीचक्र सांगते; पण ती पूर्णपणे बदलणे आपल्या हातात असते असे गीतेत सांगितले आहे. तुला जर इतकेच वाईट वाटत असेल तर तू ‘त्या पुस्तकाला’ खोटे ठरव की. त्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या अगदी विरुद्ध वर्तन करून. मला माहिती आहे. ही गोष्ट बोलायला सोपी असली तरी कृतीत उतरवणे अवघड आहे. पण हेच तर तुला करायचे आहे. लेखकाची माफी तुला क्षणाचे समाधान देईल. पण तुझे वागणे तुला कायम साथ देणारे मित्र मिळवून देईल. उद्या मी असेल, नसेल पण तुझे मित्र आणि तुझा स्वभाव कायम तुझ्यासोबत असेल.” आई सांगत होती आणि मी फक्त ऐकत होतो.

त्यानंतर काहीही झाले तरी चिडायचे नाही हे मी ठरवले. कितीही विरोध असला तरी शब्द वापरताना काळजीपूर्वक वापरायला लागलो. ज्या ज्या वेळेस मला राग यायचा, आई फक्त एकच शब्द उच्चारायची... ‘स्वभाव...’ त्यानंतर माझ्या वागण्यात बराच बदल होत गेला. याचे सगळे श्रेय आईलाच. माझा स्वभाव पूर्णतः बदलण्यासाठी जवळपास ३ ते ४ वर्ष लागले. या काळात ती मला कायम कधी गीतेतील, कधी भागवतातील, कधी शिवपुराणातील वेगवेगळ्या कथा सांगून रागाचा परिणाम कसा वाईट होतो आणि चांगले वर्तन कसे उपयोगी पडते हे सांगयची. अनेकदा आम्ही दिवसातून दोन दोन तास गप्पा मारायचो. लोकांना वाटत असेल हे मायलेक काय इतके बोलत असतात? पण आमचे विषय बरेचशे अशा गोष्टींवर असायचे.

आपले संत सांगून गेलेत, ‘वाट दाखवी तो परमगुरु’, आई माझ्यासाठी परमगुरु ठरली. कारण तिने मला माझ्या पुढील जीवनाची वाट दाखवली. मी जरी लोकांची वाट लावणारा असलो तरी माझी आई मात्र वाट दाखवणारी होती हे निर्विवाद सत्य आहे. एक दिवस तर मी तिला विचारलेही होते.

“आई... जर माणसाचा स्वभाव त्याच्या हाती असतो असे गीतेत सांगितले आहे, मग तुम्ही ‘मी लहान असताना’ माझ्या ग्रहांच्या शांती का केल्या होत्या?” खरे तर हा प्रश्न मी मुद्दाम तिला विचारला होता. मला तिला चिडवायचे होते. काय आहे ना... चोर चोरी से जाए पर हेराफेरीसे कैसे जाए?

“कारण त्यावेळेस मी गीता वाचलेली नव्हती. जेंव्हा वाचली तेंव्हा त्याचा सगळ्यात पहिला प्रयोग मी तुझ्यावरच केला. माझ्या मते तू गिनिपिग आहेस... हेहेहे...” तिने हसतच उत्तर दिले आणि मग मलाही हसू आले. काय आहे ना? माझीच आई ती, माझ्यापेक्षा २३ पावसाळे तिने जास्त पहिले आहेत. तिला हेही माहित होते... ‘आपलं पोरगं फार डँबीस आहे. आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय ते काही गप्पं बसायचं नाही.’