Saturday, 4 August 2018

अत्युच्च आनंदाचा क्षण

प्रत्येकाच्या जीवनात जसे काही हळवे क्षण येतात तसेच काही आनंदाचेही क्षण येतात. अर्थात काही वेळेस ते लक्षात येतातच असे नाही. पण त्यातून मिळणारा आनंद हा केवळ वर्णनातीत असतो. आतापर्यंत माझ्या आयुष्यात देवाच्या कृपेने असे खुपच अत्यंत आनंदाचे क्षण आलेले आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर दहावीला आपण नापासच होणार ही खात्री असूनही मी पास झालो तो क्षण. ( मार्क किती ते मात्र नका विचारू... ) माझ्या आई वडिलांनी जेंव्हा मला २/३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नववीत असताना सायकल घेवून दिली होती तो क्षण. तसेच इयत्ता दहावीमध्ये असताना शेजारच्या मुलाच्या सायकलचे पंचर रिपेअर करून मिळालेले ५० पैसे आईच्या हाती दिले तो क्षण. असे कितीतरी क्षण इथे सांगता येतील. पण कोणताही एकच क्षण सांगायचा झाल्यास माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच क्षण येतो... कोणता? थांबा... सांगतो...

अजूनही आठवतो तो दिवस. अर्थात तारीख / वार नाही सांगता येणार, पण दिवस उन्हाळ्याचे होते हे नक्की. वेळ दुपारी बारा साडेबाराची असावी. मध्यान्हीचा सूर्य अंग भाजून काढत होता आणि त्यामुळे जितके होईल तितके पाणी पिऊन शरीरात थंडावा निर्माण करावा लागत होता. सारडा सर्कलवर एका ठिकाणी नोकरीचा अर्ज द्यायचा असल्यामुळे द्वारकालाच मी बसमधून उतरलो. खरे तर माझ्याकडे सायकल असायची पण त्यादिवशी ती माझा भाऊ घेऊन गेल्यामुळे मला बसने फिरावे लागत होते. द्वारका ते सारडा सर्कल हे अंतर तसे चालत गेले तरी ५ मिनिटाचे. पत्ताही अगदीच सोपा होता, त्यामुळे लगेचच सापडला. तिथे जाऊन मी माझा अर्ज दिला आणि बाहेर पडलो. गावात फिरायचे तर प्रत्येक ठिकाणी रिक्षा करणे त्या काळी परवडणारे नव्हते त्यामुळे चालतच निघालो. एकसारखे पाणी पीत असल्यामुळे लघवी लागली होती. विचार केला... बसस्टँडवर जावे आणि मोकळे व्हावे. १० एक मिनिटात बसस्टँडवरील प्रसाधन गृहाच्या पायऱ्या चढलो, तर समोर बसलेल्या माणसाने आडवले. “रुको, सफाई चालू है..!!!” मनात म्हटलं साला यांना आताच सफाई सुचली. पण बोलून काही फायदा नव्हता. तसाच चालत चालत गोळे कॉलनीच्या सिग्नलवर आलो. वेळ जात होता तसे प्रेशरही वाढत होते. डोक्यात फक्त कुठे मोकळे होता येईल याचेच विचार चालू होते. बरे अशा वेळेस कधी न भेटणारे लोकं नेमके भेटतात. आणि त्यांच्याकडे वेळही भरपूर असतो गप्पा मारायला. हा विचार चालू असतानाच मागून खांद्यावर थाप पडली. वळून पाहिले तर सुनील हसत उभा होता. बऱ्याच दिवसांनी भेटत होता तो.

“आयला... आहेस कुठे सध्या?” सुन्याने प्रश्न केला.

“इथेच आहे यार..!!!” चेहऱ्यावर उसनं हसू आणत मी उत्तर दिलं.

“किती दिवसांनी भेटतो आहेस यार... चल समोर जावून उसाचा रस घेऊ...”

“नाही रे.. सध्या खूप घाईत आहे...” मी उत्तर दिले.

“गप रे.. चल...” माझा दंड धरून जवळ जवळ मला ओढतच तो निघाला. मनात विचार आला आधीच प्रेशर वाढलेलं आणि त्यात परत नवीन भर टाकायची? शेवटी न राहवून म्हटलं...

“यार... प्रॉब्लेम आहे... समजून घे...” हे म्हणतच मी करंगळी वर केली.

“अरे इतकंचं ना? थांब... इथे प्रधान पार्क मध्ये जाऊ. मी नेहमी तिथेच जातो गरज असते तेंव्हा.” त्याने म्हटले आणि मला अत्यानंद झाला.

“अरे चल मग... लवकर...” म्हणत आम्ही जवळपास पळतच प्रधान पार्क इमारतीत पोहोचलो. पण नशीब ज्यावेळेस बथ्थड असतं ना, त्यावेळेस सगळेच फासे उलटे पडतात. तिथे जाऊन पाहतो तर दरवाजाला कुलूप लावलेलं. एक एक मिनिट एका तासासारखा वाटत होता. शेवटी रस घ्यायचा बेत कॅन्सल करून त्याला निरोप दिला आणि पाऊले सार्वजनिक वाचनालयाच्या दिशेने वळली. तिथे मोकळे व्हायला जागा आहे. इतर काहीच सुचत नव्हते. खरं तर अगदी पळत जावे असेच वाटत होते पण अशा वेळेस पळणे सोयीचे नाही तर गैरसोयीचे ठरते. त्यातून परत “लोकं काय म्हणतील?” हाही विचार मनात आला. कसेतरी करून तिथे पोहोचलो. आता फक्त बाजूच्या रस्त्याने वाचनालयामागे जायचे आणि प्रॉब्लेम मधून सुटायचे. या सध्या विचारानेही मनाला समाधान वाटले. पण हाय रे दैवा ! वाचनालयाच्या दारातून माझ्या बहिणीची मैत्रीण बाहेर पडत होती. आमची अगदी समोरासमोर गाठ पडली.

“हाय...!!!” तिने अगदी लडिवाळपणे हाय केले. आईशप्पथ सांगतो... अगदी कलेजा खलास झाला आपला. पण काय करणार? आजची परिस्थिती अनुकूल नव्हती.

“हेल्लो... काय ठीक आहे ना?” चेहरा कसनुसा करत मी प्रश्न केला.

“हे काय रे? तुझा चेहरा असा वैतागलेला का? माझ्याशी बोलणे तुला इतके जीवावर येते?” तिने चेहऱ्यावर मिश्कील भाव आणत पुढचा प्रश्न केला आणि माझे टाळकेच सरकले. अगदी खरमरीत उत्तर द्यावेसे वाटले त्या वेळेस पण परत त्यातही वेळ गेला असता. बरे ती समोरच वाटेत उभी. तिला “चल सरक बाजूला....” असे तरी कसे सांगणार? आणि असे सांगितले तर परत आपला पत्ता कायमसाठी कट व्हायचा ही देखिल भीती. आता देवाला शरण जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. उत्तर तर द्यावेच लागणार होते.

“नाही गं... वैताग नाही... आनंद झाला आहे... इतका की तो आता पोटात मावत नाहीये... अजून काही वेळाने ओसंडून वाहायला लागेल.” खरं तर मी वैतागानेच बोललो होतो. पण ती मठ्ठ डोक्याची... सोडायला तयारच नव्हती.

“अरे आनंद म्हणतोय आणि मग चेहऱ्यावर असे १२ का वाजले आहेत?” तिचा पुढचा प्रश्न आणि माझ्या कपाळावर आठ्या आल्या. मनात म्हटले भले भविष्यासाठी दुसरी पाहू, पण किमान आत्ता तरी हिला वाटी लावू... पण तेवढ्यात देवाची कृपा झाली आणि तिची मैत्रीण तिथे आली. हिची गाडी लगेचच तिच्याकडे वळली आणि मी सुसाट सुटलो. आता मात्र धावण्याशिवाय पर्यायच नव्हता. टॉयलेटचे दर्शन झाले आणि मी सुखावलो. जीवनातील सगळ्यात मोठ्या आनंदाची अनुभूती मी ‘मोकळं’ होताना घेतली. बाहेर इतकं रटरटीत उन असतानाही मला त्यावेळेस अगदी आल्हाददायक वाटत होतं.

हाच तो क्षण आहे जो मला जीवनातील सगळ्यात मोठा आनंद देऊन गेला. सामान्य परिस्थितीत इतरांना ही गोष्ट भलेही पटणार नाही, पण ज्यावेळेस अशी वेळ येते त्यावेळेस मग यापुढे इतर सर्व गोष्टी गौण वाटू लागतात. काय म्हणता पटत नाही अजून? ठीक आहे... अनुभव हीच खात्री... जेंव्हा कधी तुमच्यावर अशी वेळ येईल तेंव्हा तुम्हाला माझे बोल प्रकर्षाने आठवतील हे नक्की...

No comments:

Post a Comment